मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ स्वातंत्र्याच्या इतिहासातील हरवलेली स्त्री-पाऊलवाट… दुर्गा भाभी – लेख क्र. ८ ☆ मंजिरी येडूरकर ☆

दुर्गा भाभी – – 

यांचा जन्म अलाहाबाद येथे गुजराथी कुटुंबात झाला. अकराव्या वर्षी त्यांचा विवाह, भगवती चरण वोहरा, या सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन च्या सदस्याशी झाला. त्यांची दुर्गा ही पत्नी, म्हणून त्या सर्वांच्या दुर्गाभाभी झाल्या. त्या असोसिएशन बरोबरच त्या नौजवान भारत सभेच्या पण सक्रिय कार्यकर्त्या होत्या.

दिल्लीला पतीसोबत हिमालयीन टॉयलेट्स नावाचा बॉम्ब बनविण्याचा कारखाना चालवला. बॉम्ब बनविणे, ते हव्या त्या ठिकाणी पोचते करणे, क्रांतिकारकांना संदेश पोचविणे, राजस्थानातून पिस्तुले आणून देणे अशी अनेक जोखमीची कामे करीत होत्या. भगवती चरण व्होरा यांनी एकदा बॉम्ब बनविल्यानंतर त्याचे परीक्षण करत असताना तो त्यांच्या हातातच फुटला, या अपघातात त्यांचे निधन झाले. दुर्गा भाभींनी लाहोर व कानपूर येथे जाऊन पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. भगतसिंग व बटुकेश्वर जेव्हा विधानसभेवर बॉम्ब टाकण्यासाठी निघाले तेव्हा दुर्गा भाभी व सुशीला मोहन यांनी आपले बोट कापून त्या रक्ताचा टिळा त्यांच्या कपाळावर लावला.

 नौजवान भारत सभेचे प्रमुख, लाला लजपत राय, यांनी नोव्हेंबर १९२८ मध्ये सायमन कमिशन च्या विरोधात अहिंसक मोर्चा काढला. त्यावेळी लाहोर पोलिस अधिक्षक जेम्स स्कॉट यांनी लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. त्यात वैयक्तिकरीत्या लाला लजपत राय यांच्यावर हल्ला झाल्याने ते मृत्युमुखी पडले. मृत्यूनंतर भगतसिंग व इतरांनी स्कॉट यांना मारण्याचा प्रयत्न करताना चुकून सँडर्स यांची हत्या झाली. त्यामुळे भगतसिंग, जतिनदास यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्यावेळी कैद्यांना अमानूष वागणूक दिली जात होती. त्याच्या विरोधात जातीनदास यांनी उपोषण सुरू केले. उपोषण फार दिवस चालले त्यामुळे ६३ व्या दिवशी जातिनदास यांचा मृत्यू झाला. त्यांच्या लाहोर ते कलकत्ता अंत्ययात्रेचे नेतृत्व दुर्गा भाभींनी केले. पाठोपाठ झालेल्या या अत्याचारामुळे लोक चिडले होते. प्रचंड जनसमुदाय यात सामील झाला होता.

लाहोर रेल्वे स्थानक, पोलिसांचा कडक पहारा, क्रांतिकारकांना दिसता क्षणी गोळी घालण्याचे आदेश!  अशात एक उंच साहेब, त्याची पत्नी, कडेवर एक छोट्या मुलाला घेऊन, सामान घेऊन येणारा एक सोबत नोकर, प्रथम श्रेणीच्या डब्यात चढले. नंतर नोकर समान ठेऊन तिसऱ्या श्रेणीच्या डब्यात बसला. साहेब रणजितासिंग, पत्नी सुजातादेवी यांची चौकशी करण्यासाठी इंग्रज अधिकारी आले. ते काही विचारणार इतक्यात सुजातादेवी कडेवरचे बाळ इंग्रज अधिकाऱ्याच्या हातात देऊन म्हणाल्या, ” याला जरा सांभाळता का? ” अधिकारी बावचळले. कुणीतरी मोठे अधिकारी आहेत असे वाटून सॉरी म्हणाले आणि निघून गेले. हे दुसरे तिसरे कोणी नव्हते तर भगतसिंग, दुर्गा भाभी त्यांच्या बाळा घेऊन ( खरे कुटुंब वाटावे म्हणून), नोकर म्हणजे राजगुरू!  भगतसिंग व राजगुरू यांना लाहोर मधून कलकत्त्याला पळून जाता यावे यासाठी केलेलं नाटक!  क्रांतिकारकांना कुठल्याही प्रकारची मदत करण्यासाठी कायम धाडसाने पुढे असायच्या.

१९३० मध्ये मुंबईच्या लॅमिंग्टन रोडवरील पोलिस स्टेशन जवळ एका ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडून पसार झाल्या. त्याच दरम्यान भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशीची शिक्षा देणाऱ्या लॉर्ड हॅलीवर गोळीबार केला, सुदैवाने तो वाचला पण एक अधिकारी जखमी झाला. आता दुर्गा भाभींच्या मागे पोलिस लागले. काही दिवसात त्या पकडल्या गेल्या व तीन वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. त्या खटल्यात आपल्या साथीदारांना सोडविण्यासाठी त्यांनी स्वतःचे दागिने विकले.

१९३५ ला तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांना एकाकी वाटू लागले. त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचे ठरवले. दरम्यान काँग्रेसच्या कार्याची पद्धत न रुचल्याने त्यांनी काँग्रेस सोडली. १९३७ पासून त्या शिक्षकी पेशात गेल्या. नंतर त्यांनी शाळा काढली व त्यातच त्या रमल्या. 92 वर्षाचे आयुष्य त्यांना लाभले. अशा धाडसी, शूर दुर्गाभाभींना मानाचा मुजरा!!

– क्रमशः भाग ८  

© मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted