वीणा कुलकर्णी
इंद्रधनुष्य
☆ नवरात्र विशेष – लक्षवेधी ललना : सामान्य स्त्रिया : असामान्य जगणे – लेख क्र. ६ ☆ वीणा कुलकर्णी ☆
“ स्टेअरिंगवाली दुर्गा
समोर सहज लक्ष गेलं आणि पाय थबकले.
… चिमुकल्यांना शाळेत घेऊन जाणार्या व्हॅनमध्ये “ती” दिसली, हातात स्टेअरिंग घेऊन बसलेली.
.. चक्क पुरुष ड्रायव्हरच्या जागेवर ती बसली होती.
क्षणभर आश्चर्य वाटते. पण तिच्या हातातील स्टिअरिंगपेक्षा तिच्या खांद्यावर असलेली चिमुकल्यांची मोठी जबाबदारी.
… व्हॅनमध्ये कितीतरी निरागस बालके बसली होती. प्रत्येकाच्या घरातून निघताना आई बाबांनी
काळजीपूर्वक केलेल्या सूचना, विश्वासाने तिच्यावर सोपवलेली जबाबदारी हे खरोखरच विचार करण्यासारखे होते. किती वेगळा व नवीन मार्ग स्वीकारून स्त्री अधिक जबाबदार्या आपल्या खांद्यावर पेलणार आहे हे चकित करण्यासारखे आहे.
शहरात असलेल्या अधिक वाहनांची गर्दी, वाहतुकीची कोंडी, अनपेक्षित अडथळे आणि वेळेचे बंधन यांवर मात करत “ती” प्रत्येक बालकाला सुरक्षितपणे त्याच्या शाळेत पोहोचवायचे काम शांतपणे करत असते. तिच्यासाठी ती केवळ व्हॅन नसते, तर ती अनेक कुटुंबांच्या विश्वासाची गाडी असते.
तिच्या घरात स्वत:च्या अनेक जबाबदाऱ्या असतात. तिच्या मुलांचे संगोपन व घरातील इतर सर्व कामे तीच करत असते. तरीही रोजच्या गरजा भागवण्यासाठी अपुरा पडणारा पैसा तिचा संसाराचा गाडा ढिला करतो. पण ती डगमगत नाही, स्वतःच्या कष्टाने उभे राहण्याचा निर्णय घेते. तेही कोणाच्या दयेवर नव्हे, तर आपल्या कर्तृत्वावर जगण्याचा मार्ग निवडते.
तिच्या या साध्यासुध्या कामाला कदाचित मोठ्या व्यासपीठावर प्रसिद्धी मिळणार नाही. तिच्या नावाचे कौतुकाचे फलकही कुठे लागणार नाहीत. पण ती समाधानी असते. कारण तिच्या व्हँनमधून एखादे मूल जेव्हा उतरते ना तेव्हा ते तिला हसून ‘बाय’ करते तो सुखद क्षण ती एन्जॉय करते. जेव्हा पालक थोड्या वेळासाठी का होईना विश्वासाने आपल्या मुलाला तिच्या स्वाधीन करतात, तो क्षण तिला
हवाहवासा वाटतो… हेच ती तिच्या कामाचे मोल समजते.
तिचे काम करताना ती केवळ चालक नसते तर ती असते एक कर्तव्यदक्ष स्त्री व आत्मनिर्भर महिला.
“त्रिशूळ” ऐवजी हातात स्टेअरिंग घेतलेल्या या अनामिक दुर्गेचा सन्मान करू या.
तिच्यातही एक दुर्गा आहे!!
लेख क्र. ६
☆
© वीणा कुलकर्णी
संपर्क : G.503 ऋतुरंग श्रावण सोसायटी। अरण्येश्वर, पुणे 411 009 मो 98605 33934
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



