वीणा कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ?

☆ नवरात्र विशेष – लक्षवेधी ललना : सामान्य स्त्रिया : असामान्य जगणे – लेख क्र. ९ ☆ वीणा कुलकर्णी ☆

नवजात बाळाची मालीशवाली मावशी : आजची दुर्गा 

घरात सगळ्यात आनंदाचा दिवस कोणता विचाराल तर एकमुखाने उत्तर येते

… घरात नव्या चिमुकल्याचा प्रवेश होणार तो.

खरोखर आनंदाला उधाण आलेले असते. घरभर उत्साहाचे वातावरण असते. बाळाच्या आगमनाने

प्रत्येकाला एक नवे नाते मिळणार असते याचा आनंद असतो. एकीकडे संभाव्य कामाच्या जबाबदार्‍या वाटपकेल्या जातात. या कामाच्या वाटप यादीत नवे नाव घेतले जाते ते म्हणजे…

“मालीशवाली मावशीचे”.

.. ही मावशी तर आहे आजची दुर्गा.

 

“ती” या कामात अनुभवी असते, बाळाला हाताळण्याचे कौशल्यही असते तिच्याकडे. पहिल्यांदाच आई झालेल्या मुलींना बाळाला उचलताना भिती वाटते. अशावेळी “तिच्या” अनुभवी हातांचा आणि आश्वासक बोलण्याचा खूप आधार वाटतो.

“ताई घाबरू नकोस गं! होईल हळूहळू सवय, आता हे करू नको, ते कर, ” या तिच्या सूचना नवीन मुलींचा आत्मविश्वास वाढवतात.

 

बाळाची मालीश करताना “ती” त्याच्याशी गोड गप्पा मारते, त्याला हसवते. तिच्या कामात एक प्रकारची

आत्मीयता असते. मायेचा स्पर्श असतो.

बाळाला मालीश करता करता आईशी संवाद चालूच असतो. त्यात विश्रांती, योग्य आहार आणि डॉक्टर सांगतील तशी काळजी घेण्याची कशी गरज असते, नाहीतर पुढे कसे हाल होणार असे अनुभवाचे बोल देत असते.

बाळाच्या आईला आता ही मावशी सर्वेसर्वा वाटते. दैनंदिन कामांचा भार हलका करणारी मावशी तिच्यासाठी मोलाची ठरते.

 

इतके दिवस हे काम आपण हलके समजत होतो पण ते नक्कीच हलके नाही हे पटते. शिवाय जाण होते

याची की रोज येणार्‍या या “तिच्याकडे” आहे शरीर संपदा व ताकद, मेहनत करण्याची तयारी, कामाचे कौशल्य, संयम आणि जबाबदारीची जाणीव.

… हे एक काम संपवून याच कामासाठी या घरातून दुसऱ्या घरात धावपळ करत “ती” जाते.

 

या कामातून मिळणारा मोबदला हेच तिचे उदरनिर्वाहाचे साधन. तिच्या या कामावर अनेक कुटुंबे खुष असतात.

 

तिला स्वतःचा घर-संसार असतो. मुलांचे शिक्षण असते. कौटुंबिक आजारपण, आर्थिक चणचण आणि

स्वतःच्या कुटुंबाची काळजी असते. कामाच्यावेळी ती हे सगळे विसरून इतरांच्या घरात जाऊन आपले

काम मनापासून करते. तिच्या कामाचा मोबदला देताना तो आपल्याला जास्त वाटतो, पण तो असतो

तिच्या वेळेची किंमत, अनुभव, कौशल्य याचा.

 

हा मोबदला म्हणजे तिच्या श्रमांचा सन्मान म्हटले तरी वावगे ठरणार नाही कारण तिच्याही कामाला

इतर सेवांसारखी “प्रतिष्ठा” आहे… चाकोरीबाहेरची कागदाविना मिळवलेली पदवी आहे..

“मालीशवाली मावशी”

 

आजच्या दिवशी देवीच्या चरणी नतमस्तक होताना आपण “तिलाही” मनोभावे वंदन करू या!

– – तिच्यातही दुर्गा आहे

– लेख क्र. ९

☆

© वीणा कुलकर्णी

संपर्क : G.503 ऋतुरंग श्रावण सोसायटी। अरण्येश्वर, पुणे 411 009 मो 98605 33934

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted