श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “मायेची फुंकर” – इंग्रजी लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद – श्री संभाजी बबन गायके ☆
न्यायमूर्ती रजनी रंगा
मनाच्या जखमेवर मायेची फुंकर घालणा-या न्यायाधीश!
जुलै महिन्याची २३ तारीख होती आणि वर्ष होतं २०२३. ती त्यावेळी अवघ्या सात वर्षांची होती. तिच्या वडिलांचा मित्र नेहमीच घरी यायचा. तिच्याही खेळायचा…! एक दिवस असा उगवला की तिचं बालपण हिरावून घेतले त्या ‘काकाने’! ती त्याला काकाच म्हणायची… तिच्या वडिलांच्या वयाचाच तर होता तो. अर्थात, त्या कृतींचा अर्थ त्या कोमल हृदयाला उमगला नाही तेंव्हा. पण काहीतरी निराळं घडलं आहे, याची जाणीव तिला झाली आणि तिने झाला प्रकार तिच्या आईच्या कानांवर घातला. मोठा गदारोळ झाला. मुलीची जात.. तिचीच बदनामी होईल, पुढे तिचं लग्न कसं होणार? नका पोलिसांच्या भानगडीत पडू… असे सल्ले देणारेही कमी नव्हते! पण आईने मुलीला न्याय मिळवून देण्याचा निर्धार केला आणि कायद्याच्या दारात उभी राहिली.
गुन्हेगाराने स्वत:ला निर्दोष सिद्ध करायचे असते. तसे प्रयत्न त्याने केलेच. वैद्यकीय तपासणी स्पष्टपणे त्याचा गुन्हा सिद्ध करीत होती. पण आणखी एक महत्त्वाचा घटक असतो अशा खटल्यांमध्ये. पिडीतेची साक्ष. तीन वर्ष खटला सुरु होता. त्या मुलीला न्यायाधीशांसमोर उपस्थित करण्यात आले. अर्थात हे खटले in camera अर्थात बंद दाराआड, गुप्त रीतीने चालवले जातात. पिडीतेला गुन्हेगाराची ओळख पटवायला सांगितले. त्या पोरीने जराही न घाबरता त्या काकाकडे बोट दाखवून म्हटले… ”म्हातारा होईतोवर बाहेर सोडू नका या काकाला! ” आणि तिने न्यायालयात तिच्यावर गुदरलेला सर्व प्रसंग इत्यंभूत कथन केला… ही बाब खटल्याच्या निकालासाठी खूप महत्त्वाचा ठरली. मे, २०२६ उजाडले. हे लेकरू दहा वर्षांचे झालं. न जाणो कोणत्या शारीरिक, मानसिक यातनांना सामोरं गेलं असेल ती तिचं तिलाच ठाऊक. Special POCSO न्यायलयात अतिरिक्त सत्र न्यायाधीश रजनी रंगा यांनी आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावताना निकालपत्राच्या अखेरीस पिडीतेला उद्देशून एक भावपूर्ण संदेश लिहिला. या संदेशाची भाषा कायद्याची क्लिष्ट भाषा नव्हती.. एका महिलेच्या हृदयातून आलेला तो भावनेचा अस्सल आवेग होता!
न्यायमूर्ती रजनी रंगा लिहितात… “बेटा! मी तुझ्याशी काही बोलायचंय… केवळ एक न्यायाधीश म्हणून नव्हे… न्यायाच्या, कायद्याच्या भाषेतही नव्हे. मी तुझा आवाज ऐकला, तुझ्या शब्दांमागच्या भावना जाणून घेतल्या! माझं हृद्य तू दाखवलेल्या असीम धैर्याने अगदी हेलावून गेलं आहे!
“बाळा! जेंव्हा तू म्हणालीस ना की, ”जोपर्यंत हे ‘काका’ म्हातारा होत नाही, तोपर्यंत त्यांना तुरुंगाबाहेर सोडू नका! ” तुझं हे म्हणणं न्यायालयानं ऐकलं आणि मान्यही केलंय.
“तू ज्याला तुझा ‘काका’ म्हणतेस, तो आता यापुढे आयुष्यभर तुरुंगाच्या बाहेर पडू शकणार नाही. तो शेवटपर्यंत तुरुंगातील त्या पिंज-यातच खितपत पडेल आणि मरेपर्यंत तिथंच राहील. तो तुला, तुझ्या बहिणीला यापुढे कधीच काहीही करू शकणार नाही, त्रास देऊ शकणार नाही!
“मी पाहिलेली सर्वांत शूर मुलगी म्हणजे तू आहेस, बेटा! तू न्यायालयात आलीस, तुला त्रास दिलेल्या माणसाला तू बरोबर ओळखलंस आणि तू सगळं खरं खरं सांगितलंस.. न भिता!
तुझा ‘काका’ तुझ्याशी खूपच वाईट वागला. पण तू गप्प नाही बसलीस. तू ते सगळं तुझ्या आईला सांगितलंस. खरं बोलण्यात तू दाखवलेल्या हिंमतीमुळे आता यापुढे त्या माणसाला दुस-या कोणत्याही मुलीला त्रास देता येणार नाही. त्याला जन्मभर तुरुंगातच ठेवण्याचा आदेश दिला आहे मी. तो माणूस आता आयुष्यात कधीही स्वतंत्र माणूस म्हणून दिवसाचा सूर्य पाहू शकणार नाही.
मी तुला तुझं बालपण परत देऊ नाही शकणार. पण तुझं म्हणणं मात्र निश्चित ऐकून घेईन. “बेटा! जा… जग तुझं जीवन आनंदाने. शाळेत जा. मित्र-मैत्रिणी मिळव. खेळ. स्वप्नं पहा… हे न्यायालय तू दाखवलेलं असाधारण धैर्य नेहमीच स्मरणात ठेवील! ”
पुढे त्या गुन्हेगाराने दिल्ली उच्च न्यायालयात त्याला सुनावल्या गेलेल्या शिक्षेविरोधात दाद मागितली. न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंग, न्यायमूर्ती दिनेश भट यांनी उपलब्ध वैद्यकीय पुरावा, पिडीतेची साक्ष ग्राह्य मानून pocso court ने सुनावलेली शिक्षा योग्य ठरवली. या न्यायमूर्तीच्या निदर्शनास न्यायमूर्ती रजनी रंगा यांनी निकालपत्राच्या अखेरीस लिहिलेला तो संदेशही आला. आणि त्या संदेशाचा सन्मान राखीत सदर दोन्ही न्यायमूर्तीनी न्यायमूर्ती रजनी रंगा यांनी लिहिलेल्या संदेशातील मजकूर प्रिंट करून सदर मुलीपर्यंत पोहोचवावा असा आदेश दिला! याच बरोबर आरोपीकडून वसूल काही रक्कम वसूल करून ती रक्काम पिडीतेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचाही आदेश देण्यात आलेला आहे.
न्यायमूर्तीनी थेट पिडीतेसाठी असा संदेश लिहिणं ही एक आजवर ऐकिवात न आलेली गोष्ट आहे. प्रत्यक्ष न्यायालयात न्यायमूर्ती पिडीत मुली, महिलांशी संवाद साधतातच. किंबहुना खटल्याच्या तपास कामासाठी नेमले गेलेले पोलिस कर्मचारीही यात वडीलकीचे नाते निभावताना दिसतात बरेचदा. एका बलात्कार पिडीत बालिकेने न्यायालयात सर्व काही योग्य प्रकारे सांगावे आणि त्यामुळे आरोपीस शिक्षा व्हावी, यासाठी प्रार्थना करणा-या आणि तसे घडल्यावर अश्रूंना वाट मोकळी करून देणा-या एका ज्येष्ठ पोलिस कर्मचा-याविषयी मागे एकदा वाचले होते.
बालिकांवरील लैंगिक अत्याचार हे समाज म्हणून आपले अपयश आहे. गुन्हेगारांस विनाविलंब कठोर शासन मिळेल याचीही तजवीज कमी पडते आहे. एखाद्या गुन्हेगारास शिक्षा सुनावली गेल्यावर खरं तर असे गुन्हे करू पाहणा-यास वचक बसणे अपेक्षित आहे. मात्र दुर्दैवाने तसे घडताना दिसत नाही. याचाच अर्थ आपली दिशा चुकली आहे… आणि त्यामुळेच आपल्या मुली कायमच गुन्हेगारांच्या नजरेत राहतात! गुन्ह्याबद्दल गुन्हेगारास शिक्षा दिल्याने ज्याच्या बाबतीत सदर गुन्हा घडला आहे, त्याला न्याय मिळतो का? हाही एक अनुत्तरीत प्रश्न आहे. पण शिक्षा अशी पाहिजे की इतरांना जरब बसावी. छत्रपती शिवरायांनी बलात्का-याचा चौरंग करण्याची आज्ञा देऊन ती प्रत्यक्षातही आणली होती! किमान बालिकांवरील अत्याचारासाठी अधिक कठोर शिक्षा देण्यात आल्या पाहिजेत… अन्यथा सध्याची परिस्थिती आपण पाहतो आहोतच. असो.
न्यायमूर्ती रजनी रंगा… तुम्ही तुमच्या कृतीने मन जिंकून घेतले आहे. तुमच्या सारख्या मनाच्या लोकांची गरज आहे सध्या… तुमच्या शब्दांनी जखमेवर मायेची फुंकर घातली जाईल, हे निश्चित! तुम्हाला मानाचा मुजरा!
इंग्रजी लेखक : अज्ञात
मराठी अनुवाद : श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






