सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “पंढरीची वारी…” ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

घण घण घण नभ वाजे.. रुणू झुणू रुणू पवन गाजे

गुणगुणत मनी माझ्या.. भोळी मम भक्ती साजे……

*

आतुर विठू- भेटीला.. ज्ञानराज हे जाती

अवतीभवती त्यांच्या मन माझे दुडदुडे……

*

फिकीर नाही देहाची.. लाजही ना जगताची

देहभान विसरून मन माऊलीस आसावे……

*

पायघड्या घाली धरा.. नभ धरी हे छत माथी

अनवाणी पाऊल मग पुढती पुढती झेपावे……

*

वारा वाजवी संबळ.. जलधारांच्या टिपऱ्या

नामाचा गजर मुखी.. तालातच मन नाचे…….

*

मन धावे अती वेगे.. वाटही मागे पडली

चंद्रभागेच्या सवे हे.. आनंदे मन लहरे……..

*

सगुण रूप माऊलीचे जरी दिसले ना डोळा

चहूकडेच माऊलीचे रूप दिसू लागले…….

 मज चहूकडेच माऊलीचे रूप दिसू लागले…….

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Manjiri yedurkar

व्वा! मानस वारी छानच रंगली आहे.