डाॅ. निशिकांत श्रोत्री
कवितेचा उत्सव
☆ तू असतीस तर… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
तू असतीस तर तू असतीस तर ||ध्रु||
*
तू असतीस तर अजुन लाभते घरास अपुल्या मंगल घरपण
तू असतीस तर झाले असते घरात अपुल्या अमृत सिंचन ||१||
*
तू असतीस तर लक्ष्मी गृहाची घरात असती वास करुनी
तू असतीस तर समाधान या घरातुनी ना जाते निघुनी ||२||
*
तू असतीस तर सदैव नसत्या नयनातुनी या अश्रूधारा
तू असतीस तर वहात असता हास्ये भरला शीतल वारा ||३||
*
तू असतीस तर अजुनी असते सखे सोयरे सभोवताली
तू असतीस तर अजून फुलती गंधित अपुली जीवनवेली ||४||
*
तू असतीस तर झंकारुनिया अजून येती मंजुळ गाणी
तू असतीस तर झाले नसते जीवन अमुचे खिन्न विराणी ||५||
☆
© कवी : डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम. डी. , डी. जी. ओ.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




