मेहबूब जमादार
कवितेचा उत्सव
☆ पाऊस अवकाळी… ☆ मेहबूब जमादार ☆
☆
पाऊस असा अवेळी
गेला पिकांस घेऊन
सारं झोपलं शिवार
डोळ्यात पाणी ठेवून
*
भर पावसाळी तुझं
येणं का बरं नसावं?
आल्या भरी पिकांचं
किती नुकसान व्हावं
*
वर, झणाणता वारा
झाडावेलीं थैथयाट
पिसाटली रानपिकं
तुझी चुकलेली वाट
*
कसं चुकार पाखरू
सापडेना त्याला खोप
दरसाली तुझा फेरा
आणि बिघडतं माप
*
सा-या चराचरीं तू रे
येशी होऊनिया काळ
सांग शिवू कसं आम्ही
सारं फाटकं आभाळ ……
☆
© मेहबूब जमादार
मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली
मो .9970900243
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




