श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
🦚 वेध माहेराचे! 🦚 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक
☆
(आधीच्या “श्रावण! ” कवितेतल्या शेवटच्या कडव्यात म्हटल्या प्रमाणे, नव्या नवरीला श्रावणात माहेरी जाण्याचे लागलेले वेध कसे असतील, ते सांगायचा प्रयत्न आजच्या कवितेत!)
🦚
आला श्रावण श्रावण
ऊन ओथंबल्या सरी,
मोर नाचे आनंदाने
माझ्या दाटल्या उरी!
*
आला श्रावण श्रावण
साद येई माहेराची,
दारी उभी वाट पाहे
माय माझी कधीची!
*
आला श्रावण श्रावण
माहेराची हिरवी वाट,
वाटे भेटता सोयरे
होती आठवणी दाट!
*
आला श्रावण श्रावण
सख्या साऱ्या भेटतील,
“होतो सासरी का जाच? “
लाडे लाडे पुसतील!
*
आला श्रावण श्रावण
गौर साजरी करीन,
पुजून अन्नपूर्णेला
फेर सख्यांसवे धरीन!
*
आला श्रावण श्रावण
व्रत वैकल्याचा मास,
शुभ चिंतून साऱ्यांचे
करीन उपास तापास!
करीन उपास तापास!
☆
© श्री प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610
मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



