सुश्री अपर्णा परांजपे
कवितेचा उत्सव
☆ लीलाधर भगवंत प्रगटले… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆
☆
लीलाधर भगवंत प्रगटले जीवनी साकार
असा हा अद्भुत साक्षात्कार!!
*
दृष्टी दिली संसार पाहिला आनंदी आनंद
तीच दृष्टी ही आत वळवली झाला परमानंद
काय पहावे, जाणावे हे कळले एक क्षणात
असा हा अद्भुत साक्षात्कार..
*
पायी चाललो, सृष्टी पाहिली आनंदी आनंद
प्रदक्षिणा घालता तुला रे झाला परमानंद
कोठे जावे, अन थांबावे, कळले एक क्षणात
असा हा अद्भुत साक्षात्कार..
*
गाणी गायली नाच नाचलो आनंदी आनंद
भजन प्रेम मग गात नाचता झाला परमानंद
प्रेम भक्ती ही मुळात आहे कळले एक क्षणात
असा हा अद्भुत साक्षात्कार…
*
मी मी माझे.. माझे.. माझे.. आनंदी आनंद
तो मी नाही कळले जेव्हा झाला परमानंद
नाम, रुप, अवतार गौण हे कळले एक क्षणात
असा हा अद्भुत साक्षात्कार..
*
दिवस मास अन् वर्षे सरली आनंदी आनंद
क्षण एक मग तो अवतरला अन झाला परमानंद
क्षणात एका विश्व पाहिले, कळले त्याच क्षणात
असा हा अद्भुत साक्षात्कार…
*
“सोहम्” पटवत धाडियले या देही भगवंताने
“कोहम्, कोहम्” म्हणत विसरलो “सोहम” या देहाने
“सद्गुरू” आले हृदयी धरले आणि झाला चमत्कार
असा हा अद्भुत साक्षात्कार…
☆
🌹 भगवंत हृदयस्थ आहे 🌹
© सुश्री अपर्णा परांजपे
कात्रज, पुणे
मो. 9503045495
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




