सौ. ज्योती कुळकर्णी
कवितेचा उत्सव
☆ काही भले काही बुरे… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆
☆
सोन्यासाठी प्रेत उकरणे शोभत नाही
माणुसकीचे मढे गाडणे संपत नाही
*
संस्काराने मानव घडतो कुणी बोलले
ठोकल्या विना मूर्ती कोणी घडवत नाही
*
शंभर एकर वावर माझे उजाड झाले
कष्ट न करता बाग कुणाची बहरत नाही
*
संसाराचे गणित मांडले अजब निघाले
बेरजेस पण उसना येथे चालत नाही
*
युद्धावर तो कामी आला अमर जाहला
कुंकू मग तर पुसल्या गेले म्हणवत नाही
☆
© सौ. ज्योती कुळकर्णी
अकोला
मोबा. नं. ९८२२१०९६२४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





खूप छान.
खरं आहे. हौतात्म्य ज्याने पत्करले
त्याची पत्नी ही सौभाग्यवतीच.
९२२५७०५८८४
खूप छान.