श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ राऊळ…! ☆ श्री सुजीत कदम ☆
(छंद : अष्टाक्षरी…)
☆
जाऊ नको खचूनीया
टाक पुढेच चाहूल
येते आहे मागावर
सुख शोधीत पाऊल. . . . !
*
सुख सोबती घेताना
नको जाऊ हुरळून
माय तुझी रे पाहते
यश तुझे दारातून. . . . !
*
फुलापरी वाढवले
काळजाच्या तुकड्याला
खाच खळगे पाहून
थोडा जप जीवनाला. . . . !
*
दोन घडीचे जीवन
जन्म मृत्यूचा प्रवास.
नको विसरू मायेचा
एका भाकरीचा घास. . . . !
*
खण जीवनाचा पाया
नको वाकडे पाऊल
यशोमंदिराचे तुझ्या
माय बोलके राऊळ.. . . !
☆
© श्री सुजित कदम
पुणे
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





