सुश्री मंजुषा सुनीत मुळे
कवितेचा उत्सव
☆ “स्वराज्य…” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
*
दशके लोटली सात परि तसा ‘स्वातंत्र्य’लढा अजुनी गाजे
‘मला पहा अन् फुले वहा ‘ या मनोवृत्तीचे तण अती माजे ।।
*
स्वतंत्र देशी स्वतंत्र आम्ही, रुचे मना ते करूही धजतो
लोकशाहीचे नायक आम्ही, कोण आम्हाला अडवू शकतो?
*
जो तो आहे स्वतंत्र तर मग का आम्हा चिंता इतरांची
आपले आपण फक्त पहावे, जळोना तिथे भ्रांत दुजांची ।।
*
कामापुरते गोड आम्ही अन् काम संपता पाठ करू
गरज आमची पडेल तेव्हा नन्नाचा पाढाच सुरू ।।
*
सहाय्य करण्या दुजा कुणाला सवडच नाही आम्हा मुळी
अन् सहाय्य ते तरी कसे करावे.. भिन्न की आमची जातकुळी ।।
*
निधर्मी आमचे राष्ट्र म्हणविते.. आम्हास देणे-घेणे नाही
निधर्म म्हणजे धर्म सोडणे.. याविण अर्थच ठाऊक नाही ।।
*
राजधर्म हा असेच शिकवी.. कलियुगातली हीच रिती
नेते म्हणजे राजे येथे.. लोकशाही ती दीन अती ।।
*
राजा आणिक रंकामधली निशिदिनी वाढतीच दरी ती
एकाची नित चाले प्रगती.. दुज्या नशीबी अधोगती ।।
*
मर्कटहाती कोलीत तैसा.. स्वैराचारा जणू परवाना
दुर्दशेस या आम्हीच कारण.. उठवू न शकतो निद्रिस्त मना ।।
*
उठा उठा हो सामान्यांनो.. उशीर किती हा आधीच झाला
जागे व्हा.. तुम्ही सज्जच व्हा अन् परजा आपल्या मनशक्तीला ।।
*
शक्ती एकजुटीची जाणून.. मिळवा मतभेद नि मातीला
स्वैराचारा शह द्या.. मिरवा जित्याजागत्या लोकशाहीला ।।
मिरवा “ सशक्त लोकशाहीला “…
☆
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





मंजूषा ताई खूप सुंदर आशयाची कविता