श्री अनिल वामोरकर
कवितेचा उत्सव
☆ खिडकी… ☆ श्री अनिल वामोरकर ☆
☆
आगगाडीचा प्रवास
खिडकीची जागा,
मनावर भयंकर बोझा
मन सैरभैर…
पळती झाडे, डोंगर
मायावी सारं
डोकावू का आत रं?
मन भावविभोर…
मागे जाणा-या झाडाप्रमाणे
गतायुष्य आठवून
मन जाईल रडवून
पसाभर…
खिडकीतून बघता
दिसली मला माझी
बदलली दशा माझी
आरपार…
जिवनाच्या प्रवासात
असावी अशी खिडकी
दु:ख मागे टाकी
भरभर…
अहंकाराचा नी
कुविचारांचा
कचरा फेकायचा
भरपूर…
आता बघा कसा
सुखाचा गारवा
फुले पिसारा मनाचा
सरसरसर…
☆
© श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




