श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
कवितेचा उत्सव
☆ हसू … ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆
☆
तुला मी हासलेले पाहिले
हसू आनंदलेले पाहिले
*
कुणी खांदा दिला माझ्या शवा?
सगे मी पांगलेले पाहिले
*
मला जे वाटले होते सुखी
मनी भेगाळलेले पाहिले
*
इथे जे हिंडती तोऱ्यामध्ये
‘तिथे’ ते वाकलेले पाहिले
*
रडू जे लागले त्यांनी मघा
हसू ते दाबलेले पाहिले
*
प्रवाही ते जरी झाले अता
तसेही साचलेले पाहिले
*
दिसायाला जरी संन्यस्त ते
मघा संतापलेले पाहिले
*
उन्हाचे ना मला अप्रूप या
उन्ही या रापलेले पाहिले
*
मनांच्या हिंडता वाटांवरी
धुके मी दाटलेले पाहिले
*
अशी ती भेट गे माझी-तुझी
क्षणांना भारलेले पाहिले
☆
© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
कवी / गझलकार
संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






