श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ भैरवी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
(स्त्रग्विणी – गालगा गालगा गालगा गालगा)
☆
चूक जाणून घे पाप वाटून घे
ताप झाला तरी शाप भोगून घे
*
काय आहे कमी सांग सारेच तू
लाज पाळू नको काम मागून घे
*
खेळ खेळून जा मागचा तू पुन्हा
नेमका एक तू डाव टाकून घे
*
पाहणारा नवी आस ठेवील ना
श्वास रोखून घे अंग झाकून घे
*
आठवांचा तुझ्या बांध फोडू नको
खोल पाणी तिथे शांत न्हाऊन घे
*
जीवनाची नशा वेड लावी मना
ताल सोडू नको फक्त नाचून घे
*
अंत आहे पुढे टाळ त्याला जरा
सांग थांबायला वेळ टाळून घे
*
थोरवी तू तुझी फार सांगू नको
जाणत्यांच्या पुढे मौन पाळून घे
*
व्यर्थ कोणासही दोष लावू नको
कोण आहेस तू हेच पाहून घे
*
ध्यास आहे तुला भैरवी गायचा
सूर छेडायला साज लावून घे
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




