श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ आनंद दर्शनाचा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
न्हावू चला सुखाने प्रेमात विठ्ठलाच्या
दिंडी मधून जावू गावात विठ्ठलाच्या
*
खांद्यावरी पताका घेवून वैष्णवांची
रंगून दंग होवू रंगात विठ्ठलाच्या
*
आध्यात्म साधनेचा मांडू प्रपंच साधा
होवू विनीत आता ध्यानात विठ्ठलाच्या
*
विसरून भेद सारे समता धरून वागू
होऊन एक जावू नादात विठ्ठलाच्या
*
वारीत पंढरीच्या मिसळून धन्य होऊ
सहवास नोंदवाया खेळात विठ्ठलाच्या
*
जपल्या मनात आम्ही आहेत खूप इच्छा
पुरवा म्हणून सांगू कानात विठ्ठलाच्या
*
घेवू मिळून सगळे आनंद दर्शनाचा
होतील संत भेटी दारात विठ्ठलाच्या
*
साधा प्रपंच नाही आहे कठीण मोठा
तरण्यास दिव्य शक्ती नामात विठ्ठलाच्या
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





