उज्वला सुहास सहस्रबुद्धे
कवितेचा उत्सव
☆ श्रावण… ☆ उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
☆
झोपाळ्यावर झुलता झुलता
श्रावण हिंदोळे घेतो..
पर्जन्याची रिमझिम झेलत
श्रावण अंगणी येतो…
*
चाहुल देई आषाढ डुंबत
नाचत तळ्यात मळ्यात
धुंद होऊन फुलता श्रावण
खेळे माझ्या अंगणात..
*
श्रावणधारा बरसून जाती
ऊन पाऊस साजरा..
सूर्याच्या किरणातून
नाचत येती जलधारा..
*
श्रावण येई घेऊन सोबत
सणवारांच्या दिवसांना..
सृष्टी सारी आनंदून जाई
उधळून देई गंधांना..
*
रंग गंधांच्या संगती
श्रावण आणी मोरपिसे
कृष्ण जन्माच्या वेळेचे
लागे सर्वांच्या मनी पिसे…
☆
© उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/ सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈




