डाॅ. निशिकांत श्रोत्री
कवितेचा उत्सव
☆ तोल… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
गिरीशिखरांवर उंच दोन आयुष्य पेलले आहे
जाईल कधी मम तोल याची वाट जमाना पाहे
*
कर्तृत्वाच्या शिखरासाठी घाम कितीतरी वाहे
घामाने निसरड्या घसरणे वाट जमाना पाहे
*
कीर्तिचे शिखर मम आपले आपण वाढत आहे
सुरुंग त्याला कधी लागतो वाट जमाना पाहे
*
जाण कधी न झाली यांची उंची वाढत आहे
खोल दरी केव्हा बोलावे वाट जमाना पाहे
*
सम्यक विचार ही काठी तोल सावरत आहे
काठी सुटण्याची हातातून वाट जमाना पाहे
*
क्षितिजावरती नजर लागली अनिमिष खिळूनी राहे
दूर दूर ते पुढे पळावे वाट जमाना पाहे
*
उंचीच्या दोन्ही शिखरांची जाण अंतरी नोहे
पुढे पाहणे पुढेच जाणें भले जरी वाट जमाना पाहे
☆
कवी : © डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम. डी. , डी. जी. ओ.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






