श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ शब्द कवीचा ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

  वाऱ्यावरची वरात नाही शब्द कवीचा

 आभाळाचा सांगावा हो शब्द कवीचा

उथळ जळाचा खळखळाट हा नाही केवळ

खूप खोलवर नेई रसिका डोह कवीचा

 *

 कृतार्थ केले दैवी देणे जपातपाने

 मंत्रमान्य तो अखेर झाला शब्द कवीचा

 *

 विसरुन वेदन विरुप पदांचे फुले पिसारा

 हिरव्या रानी असा नाचतो मोर कवीचा

 *

फटफटली ना पहाट कधीहि ज्यांच्यावरती

नव अरुणोदय त्यांच्यासाठी शब्द कवीचा

 *

 बर्फगार जे, मरगळलेले, मालवलेले

 दे संजीवन पुन्हा तयांना मंत्र कवीचा

 *

 काळजातले रक्तथेंब हे अक्षर अक्षर

 जाळामधले टिपुर चांदणे शब्द कवीचा

 *

अमानुषाची शिकार करणे बंधनकारक

लक्ष्य आपुले अचूक टिपतो बाण कवीचा

 *

दृष्टिपारची अनन्यसुंदर अद्भुत सृष्टी

त्या दुनियेचा वाटाड्या हा शब्द कवीचा

 *

मरणशरण तो अखेर असतो जन्म कवीचा

मृत्युंजय पण अंती होतो शब्द कवीचा!

(अनलज्वाला)

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted