श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३४५
☆ प्रसन्न होइल दुर्गा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
मिळून सारे करू आरती प्रसन्न होइल दुर्गा
येइल संकट जेव्हा तेव्हा त्याला साहिल दुर्गा
*
भक्ती भावे पुजतो आहे अंतरात ही श्रद्धा
भक्त तिचा मी आहे येथे सुखात ठेविल दुर्गा
*
नवरात्रीचे पर्व पाहिले या डोळ्यांनी आम्ही
त्या डोळ्यांवर कृपाच होइल सत्वर पाहिल दुर्गा
*
धन दौलत ही कुणा पाहिजे फक्त पाहिजे ऊर्जा
डोईवरती हात ठेउनी आशिष देइल दुर्गा
*
संसाराच्या वेलीवरती फूल असो एखादे
आनंदाच्या यश शिखरावर नेउन ठेविल दुर्गा
*
माळी आहे मी बागेचा सुगंधात मी रमतो
तुझ्याच चरणी ह्या हाताने सुमने वाहिल दुर्गा
*
वाली नाही कुणीच दुसरा माझ्या मागे माता
जिवंत आहे देह तोवरी समजुन घेइल दुर्गा
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





