श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ गझल हासरी होते… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
(लवंगलता)
☆
सुखदुःखाना पेलतझेलत गझल हासरी होते
डोळ्यामधले आसू लपवत गझल हासरी होते
*
जगण्यासाठी दुनियादारी करतो कोणी थोडी
सगळे काही मजेत निरखत गझल हासरी होते
*
आनंदाच्या समयी तर मग नाचत थिरकत गाते
सग्यासोय-या संगत सोबत गझल हासरी होते
*
विरहामधल्या भावभावना छळू लागता काही
जगावेगळ्या थापा मारत गझल हासरी होते
*
जातायेता ह्या दु:खाचे दळण दळावे का तू
तेथे तर बघ तोल सावरता गझल हासरी होते
*
अशी देखणी गझल सुंदरी तनामनातच घडते
एकांताला भिजवत सजवत गझल हासरी होते
*
शमा जळावी तशी जाळते अंतरातली दु:खे
प्रारब्धाचे भोग डावलत गझल हासरी होते
*
कधी कधी ती सखी सारखी रुसून बसते वेडी
लाड तिचे मग बसता पुरवत गझल हासरी होते
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




