श्री सुहास सोहोनी
चित्रकाव्य
– पाऊस आला मिरगाचा हो –
☆ श्री सुहास सोहोनी ☆
☆
पाऊस आला मिरगाचा हो,
सांगे हा मृगकिडा
लाल मखमली शोभे, खाली
हिरवा कातळ कडा…!!
*
दूत असे हा मृगमासाचा
पर्जन्याची देई चाहुल
पाउसधारा पडता भूवर
मृद्गंधाची पडते भूल…!!
*
हिरवे लेवुन सजली धरणी
जणु की रति मदनाची
तिच्या ललाटी तीट लावली
लाल रक्तिमा वर्णाची…!!
*
शुभशकुनी हा कीटक देईल
जगताला पर्जन्य
फला-फुलांतुन बहरुन येईल
स्वर्गीचे चैतन्य…!!
*
अवतरतो हा अवनीवरती
केवळ मृग मासात
अन्य समयि हा लपून बसतो
बहुधा लाल फुलांत….!!
☆
© श्री सुहास सोहोनी
रत्नागिरी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





