सौ. रेणुका धनंजय मार्डीकर
चित्रकाव्य
सुरंगीचा गंध वारा
सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆
(भावगीत – वर्ण संख्या 16 यती 8 व्या अक्षरावर)
☆
माझ्या मनात बसला तळ कोकण हा सारा
देवराईत सुटला सुरंगीचा गंध वारा ||ध्रु||
फांदी फांदीवर आली सोनपिवळी तकाकी
सर्प हिच्या संगतीत कोकणचा मेवा चाखी
वसंताच्या स्वागताला सारा फुलला नजारा
देवराईत सुटला सुरंगीचा गंध वारा ||1||
*
सुरंगीची पूजा बांधू आरवली वेतोबाला
वळेसार देखणासा सजवतो कुंतलाला
नाव सुरंगी बुरंगा चमचम जणू तारा
देवराईत सुटला सुरंगीचा गंध वारा ||2||
*
रवी तळपतो वर खाली सुगंध बहर
वसंताचं आगमन किती साजरं सुंदर
अत्तराची खाण आहे कोकणचा हा गाभारा
देवराईत सुटला सुरंगीचा गंध वारा ||3||
*
घमघम करणारे श्वेत पाकळ्यात तुरे
सुकलेल्या फुलाचाही गंध कुंतलात उरे
शब्दा शब्दात माळला किती नाजूक हा तारा
देवराईत सुटला सुरंगीचा गंध वारा ||4||
*
मला म्हणते सुरंगी माझ्यावर बोल काही
मधुमासी उमलून मी गं देते नवलाई
झरझर उतरला शब्द फुलांचा पिसारा
देवराईत सुटला सुरंगीचा गंध वारा ||5||
*
© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर
औसा.
मोबा. नं. ८८५५९१७९१८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈





