अर्चना सुरेश देशपांडे
जीवनरंग
☆ अग्निदिव्य… भाग-१ ☆ अर्चना सुरेश देशपांडे ☆
अंगातला एप्रन काढून खुर्चीवर ठेवत माधुरीने” विमल मावशी “अशी हाक मारली. “आले आले हो ताई” म्हणत विमल मावशी लगबगीने स्टाफ रूम मध्ये आल्या. हाताची घडी डोक्या खाली घेत माधुरी कोचवर कलंडली.. “आई ग!”अती श्रमामुळे तिच्या तोंडून उद्गार बाहेर पडले.
माधुरी जवळ जवळ आठ-दहा तासांनी जरा आरामात आडवी झाली होती. सकाळपासून तिची नुसती धावपळ सुरू होती. दुपारपासून अडकलेल्या रूपालीचे बाळंतपण करण्यात तिने आपलं कौशल्य पणाला लावले होते. आता रूपाली आणि तिचे बाळ दोघेही शांतपणे झोपले होते. रूपालीच्या चेहऱ्यावर आनंदाचं चांदणं पसरलं होतं. तिची सुखरूपपणे सोडवणूक करण्यासाठी माधुरीवर खूपच मानसिक ताण आला होता. अशा प्रकारची अवघड केस हाताळण्याची तिची पहिलीच वेळ होती. डॉक्टर साने प्रख्यात स्त्री रोग तज्ञ होते, त्यांचयावर रुग्णांचा विश्वास होता आणि त्यांच्या हाताला यश होते. आज माधुरीवर सर्व हॉस्पिटलची जबाबदारी टाकून डॉक्टर विश्वास साने व त्यांच्या पत्नी विशाखा साने दोन दिवस मुंबईला कॉन्फरन्स साठी गेले होते. त्यांचा माधुरीच्या कामावर पूर्ण विश्वास होता आणि रूपाली चे बाळंतपण यशस्वीरित्या पार पाडून तिने विश्वास सार्थ करून दाखवला होता. आता ती स्टाफ रूम मध्ये परतली होती. विमल मावशींची चाहूल लागताच माधुरी म्हणाली, “मावशी माझ्यासाठी एक कप कॉफी करता का?! तुमची कॉफी होईपर्यंत मी फ्रेश होऊन येते”
आषाढातील दिवस होते, हवा पावसाळी होती आकाशात काळया ढगांनी गर्दी केली होती. अशावेळी कॉफीची आवश्यकता होती. माधुरी फ्रेश होऊन येताच मावशी वाफाळलेली कॉफी आणि बिस्किटांची डिश घेऊन आल्या. ” ताई सकाळ धरनं लई थकलासा! ही गरम गरम काफी घ्या, मंग वाईज बरं वाटल “म्हणून त्यांनी कॉफीचा कप तिच्या हातात दिला आणि राहिलेली कामे उरकण्या साठी त्या आत गेल्या.
माधुरीने कप तोंडाला लावून एक घोट घेतला असेल तोच बाहेरून बाळाचा रडण्याचा आवाज तिच्या कानी पडला. अनुभवी माधुरीने तान्ह्या बाळाचा आवाज लगेच ओळखला. तिनं”विमल मावशी”अशी हाक मारताच हातातले काम सोडून त्या बाहेर आल्या. ” ताई अजून काही हवे आहे का?”. ‘नाही, मला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. जरा मावशी बघा हो बाळाच्या रडण्याचा आवाज कुठून येतोय तो?
मावशींनी चाहूल घेतली व आवाज बाहेरून येतोय हे लक्षात येताच त्या मुख्य दरवाजाकडे धावल्या.
विमल मावशींनी मुख्य दरवाजा उघडला. कंदीलाच्या प्रकाशात दरवाजाच्या समोर नुकतंच जन्मलेलं इवलसं बाळ टॉवेल मध्ये गुंडाळलेले त्यांना दिसले. ते पाहताच त्यांनी माधुरीला हाक मारली. “ताई लवकर बाहेर या”मावशींची हाक ऐकून माधुरी कॉफीचा कप तसाच ठेवून दाराशी धावली. दारात टॉवेलमध्ये गुंडाळलेले छोटसं बाळ अन् त्याला पाऊस लागू नये म्हणून डोक्यावर उघडलेली छत्री हे दृश्य तिला दिसले.
माधुरीतील डॉक्टरी हृदयाने तिला कर्तव्याची जाणीव करून दिली. तिने पटकन बाळाला उचलले टॉवेल मध्ये गुंडाळलेल्या निष्पाप अर्भकाला तपासले. लालचुटूक ओठ, गोरीपान, डोक्यावर भरपूर जावळ असलेली बालिका होती. तिने किलकिले डोळे करून पाहिले पण उजेड सहन न झाल्याने ती पुन्हा निस्तब्ध पडून राहिली. तिचे वजन कमी होते, ती थंडीने कुडकुडत होती. माधुरीने मावशींच्या मदतीने बाळाला स्वच्छ केले, तिला प्रथम मधाचे बोट चाटवलं, ड्रॉपर ने थोडे दूध पाजले. दवाखान्यातील कपडे घालून चटकन् “इंक्युबेटर “मध्ये ठेवले. अशी केस घ्यायची म्हटलं तर डॉक्टरांची परवानगी घ्यावी लागणार होती पण माधुरीने ठरवले की बोलणी बसली तरी बेहत्तर पण माणुसकीला काळिमा लावून घ्यायचा नाही. त्यामुळे त्या मुलीची सर्व व्यवस्था झाल्यावर तिने डॉक्टरांना फोन केला, “सर मी एक अनौरस मुलगी दाखल करून घेतली आहे. तिची परिस्थिती पाहता तुमच्या परवानगीशिवाय मला दाखल करून घेणे भाग पडले. ” डॉक्टर साने म्हणाले, “वेल डन माधुरी”केवळ मुलगी म्हणून तिला जगण्याचा अधिकार नाकारणारे हे कोण? असा विचार माधुरीच्या मनात चमकून गेला. काही झाले तरी या बाळाला वाचवायचे असे तिने निर्धार केला. ती तिची खूप काळजी घेत होती आज गुंतागुंतीची केस तिने एकटीने हाताळली होती. यश पदरी पडल्यामुळे खुश होती खरं पाहता तिला विश्रांतीची गरज होती पण त्या निष्पाप बाळासाठी तिचा जीव कासावीस होत होता. दहा मिनिटाच्या अंतराने जाऊन ती स्वतः बाळाची तपासणी करत होती.
तिला ड्रॉपर ने दूध पाजत होती. तिच्या योग्य वाढीसाठी औषधांचे drops देत होती. तिला वाचवण्यासाठी धडपडत होती. तीन महिन्याच्या अथक प्रयत्नाने त्या बाळाची तब्येत सुधारू लागली. सतत सहवासात राहिल्यामुळे त्या दोघींच्यात एक प्रकारचा जिव्हाळा निर्माण झाला, माधुरीला तिचा लळा लागला. ,. या निष्पाप मुलीला अंतर द्यायचे नाही असे तिने मनोमन ठरवून टाकले. एक दिवस माधुरीने “या मुलीला माझी मुलगी म्हणून वाढविण्याची माझी इच्छा आहे” हे डॉक्टर साने यांच्या कानावर घातले.
डॉक्टर साने म्हणाले, “तुझा निर्णय चांगला आहे पण अगं माधुरी भावनेच्या भरात असा निर्णय येऊ नकोस. अजून तुझे लग्न व्हायचे आहे. या मुलींमुळे तुला आयुष्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल, लोकांच्या शंका कुशंकांना सामोरे जावे लागेल, लोकांच्या कुत्सित नजरा सहन कराव्या लागतील. , लोक तुझी बदनामी करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत थोडक्यात काय तुला एक प्रकारचे “अग्नी दिव्य” करावे लागेल. याची तुझी तयारी आहे का? दोन दिवस पूर्ण विचार कर आणि मगच निर्णय अन्यथा आपण तिची चांगल्या अनाथाश्रमात सोय करू,. ”
रात्रीचे दोन वाजले होते. सगळीकडे निरव शांतता पसरली होती पण माधुरीच्या डोक्यात असंख्य विचारांचे काहूर माजले होते. तरीसुद्धा त्या विचारावर मात करून तिने त्या निष्पाप बालिकेचे मातृत्व स्वीकारण्याचा निश्चय केला. दुसरे दिवशी डॉक्टरांना ती म्हणाली, “पूर्णविचारांती मी त्या मुलीला स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे “. डॉक्टरांनी तिच्या निर्णयाचे स्वागत केले.
मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध मनाला, शरीराला प्रसन्न करून जातो’ माणसाचं काहीसं तसंच असतं, काही माणसं काही क्षणात आपली होऊन जातात तशी त्या बाळाने माधुरीवर मोहिनी घातली होती जणू! डॉक्टरांच्या संमतीने दवाखान्यातील रुग्णांच्या समवेत बाळाचं थाटामाटात बारस करून माधुरीने तिचे नाव ठेवले “मोहिनी. ” मोहिनी म्हणजे माधुरीच्या आयुष्यात एक गोड स्वप्न होतं, तिच्या बोबड्या बोलांनी सर्वांवर गारुड केले होते. समंजस आणि गोड, तेवढीच खेळकर स्वभावाची मोहिनी नेहमी सर्वांना हवीहवीशी वाटे.
माधुरीला आपले बालपण आठवले. आई, बाबा आणि ती एक सुखी कुटुंब होते. तिचे वडील एका छोट्या कंपनीत अकाउंट सेक्शन मध्ये नोकरीला होते. आई गृहिणी होती. पैशाची चणचण होती पण काटकसरीने तिची आई छान घर चालवत होती. लाडक्या माधुरीची हौस पुरी करत होती. माधुरी एक साधी मुलगी होती, तिला खूप शिकायचे होते, फुलपाखरांचे पंख लावू उडायचं होते. तिच्या आईला तिच्या गुणांचे कौतुक होते. एके दिवशी लेकीच्या शाळेत लेकीचे नृत्य पाहण्यासाठी ते गेले आणि कार्यक्रम संपवून घरी परतत असताना त्यांच्याच स्कूटरला कारने धडक दिली. आई वडील दोघेही खाली पडले पण गाडीवाला न थांबताच भरधाव निघून गेला. कोणीतरी मामाला फोन करून बातमी कळवली. तो तात्काळ त्या ठिकाणी पोचला पण तो येण्यापूर्वी ते दोघे जग सोडून गेले होते. माधुरीचे वडील एकटेच तिच्या मामाला आपल्या बहिणीची निशाणी म्हणून माधुरीला घरी घेऊन जाणे भाग होते. माधुरी शाळेतून येण्यापूर्वी सर्व संपले होते. आई-वडिलांचा मृतदेह पाहून माधुरीने हंबरडा फोडला. मामाने कसेबसे सावरले. थोडे दिवस मामीने प्रेमाने केले. आई-वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर मामाने माधुरीला घरी नेले खरे पण मामीला मात्र घरकामासाठी आयती मोलकरीण मिळाली. तिने या पोरीला अनेक प्रकारे छळले. मामा ऑफिसला गेला की तिच्याकडून घरची कामे करून घ्यायची मग शाळेत जायची परवानगी द्यायची. रात्री काम आवरून तिने अभ्यासाला सुरुवात केली की मामी ओरडत येई, “लाईट बिल काय तुझा बाप भरणार?’माधुरी नाईलाजाने लाईट बंद करून झोपायला जायची. मामाच्या घरी तिला “अश्रित “हाच दर्जा मिळाला होता. राब राब राबून शिव्या खाणेच तिच्या नशिबात होते. आपल्या नशिबात आहे ते भोगायलाच पाहिजे असा विचार करून ती गप्प बसत होती आणि तोंडातून ब्र न काढता जोमाने अभ्यास करीत होती.
– क्रमशः भाग पहिला
© अर्चना सुरेश देशपांडे
पुणे
मो. ९९६०२१९८३६
≈ संस्थापक संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈





