डॉ मकरंद पिंपुटकर

स्वातंत्र्यदिन, सर्व्हर आणि नेटवर्क… ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

चिंचवडमध्ये राहणारा अमोल वयाच्या तिसाव्या वर्षीच संसाराच्या सुखदुःखाचे मोठे अनुभव घेत होता.

सुख म्हणजे सुट्टीचा दिवस, क्रिकेट आणि मिसळ.

दुःख म्हणजे सोमवार, ऑफिस आणि बायकोने सांगितलेला “थोडासा” व्यायाम.

दोन वर्षांपूर्वीच नेहा आणि अमोलचं लग्न झालं होतं. लग्न चांगलंच मानवलं होतं त्याला. नेहा जरी त्याला लाडात “ढोलू” म्हणत असली, तरी अमोलच्या मते ती अतिशयोक्ती होती. परिस्थिती त्याच्या पूर्णपणे आटोक्यात होती, तो फक्त “खाते पिते घर का” होता इतकंच.

असं त्यानं म्हटलं, की शर्टाची पोटावरची बटणं किती वेळा तुटली याचा पाढा नेहा त्याला वाचून दाखवायची.

पण त्याला अमोलचा नाईलाज होता. “खाणं” या विषयावर त्याचं मनापासून प्रेम होतं, कदाचित क्रिकेटपेक्षाही जास्तच.

व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करण्याच्या तर तो सर्वस्वी विरोधात होता. जिमची फी आपणच भरायची, आणि तिथं जाऊन, मेहनत करून, घामही आपणच गाळायचा हे त्याच्या तत्वातच बसत नव्हतं. उलट त्याच्या मते तर व्यायाम केल्याने माणूस दमतो आणि त्यामुळे त्याला जास्त भूक लागते. “मग फायदा काय? ” तो नेहमी विचारायचा.

त्याची पत्नी नेहा याच्या अगदी उलट होती.

सकाळी पाच वाजता उठणे, धावणे, योगा, सायकलिंग, ट्रेकिंग, प्रोटीन शेक—तिच्या आयुष्यात ‘बसून राहणे’, ‘लोळत पडणेही संकल्पनाच नव्हती.

अमोललाही तिने केलेल्या पौष्टिक खाद्यकृती खायला आवडायच्या, पण तो ठरलेल्या मापापेक्षा दुप्पट खायचा आणि सगळंच मुसळ केरात जायचं.

असो. आज १५ ऑगस्ट होता, शनिवार, स्वातंत्र्यदिन, सुट्टी.

सकाळपासून भुरभुर पाऊस रिमझिमत होता, हवेत छान गारवा होता.

पण नेहा पहाटेच उठली होती. “अमोल, उठ! सहा वाजले.

चादरीखालून आवाज आला. “हं…”

सहा वाजले, अमोल, उठ. अजून किती झोपणार? ”

आज सुट्टी आहे ना? ”

हो. म्हणूनच तर तिकोना किल्ल्यावर ट्रेकिंगला जायचं आहे! ”

अमोलने डोळे उघडले. “ट्रेकिंग? “

हो. ट्रेक! किती दिवसांपासून सांगतेय. ”

किलकिल्या डोळ्यांनी अमोलने खिडकीतून बाहेर पाहिले.

पाऊस.

गार हवा.

ढग.

आणि त्याच्या डोक्यात दुसरेच दृश्य होते.

सोफा.

टीव्ही.

क्रिकेट.

आणि कदाचित…

मिसळ.

आजपासून भारत–श्रीलंका कसोटी क्रिकेट सामना सुरू होणार होता. तिकडे बांगला देशाची क्रिकेट टीम ऑस्ट्रेलियाचा बॅण्ड वाजवत होती.

इतका भरगच्च कार्यक्रम असताना, शरीराला कष्ट घेऊन ट्रेकिंगला जायचं? नुसत्या विचारानंच अमोलला दम लागला.

पण नेहा अजूनही खमकेपणाने समोर उभी होती. “काय विचार करतोयस? ”

काही नाही. ”

मग तयार हो. ”

अमोलने एक दीर्घ श्वास घेतला.

सरळ सांगितलं असतं—“मला ट्रेकला यायचं नाही. ” तर त्याचे परिणाम त्याला चांगले माहिती होते.

.. आरोग्य, वजन, स्टॅमिना, वय, भविष्यातील जीवनशैली आणि “तू स्वतःची काळजी घेत नाहीस” या विषयांवर किमान दीड तासाचं व्याख्यान होणार होतं, – रिकाम्या पोटी त्याला हे सगळं ऐकून घ्यायला लागलं असतं, आणि नंतर मान खाली घालून ट्रेकला जावंच लागलं असतं.


म्हणून अमोलने दुसरा मार्ग निवडला.

नेहा…”

काय?”

मी आलो असतो ग, मला खरंच खूप आवडलं असतं. पण आज ऑफिसमध्ये अर्जंट मीटिंग लावली आहे. ”

नेहा थांबली.

आज?”

हो. ”

१५ ऑगस्टला?”

हो. ”

कशाची?”

अमोलने चेहऱ्यावर शक्य तितका गंभीर भाव आणला.

.. “नेटवर्क प्रॉब्लेम आहे. क्लायंटचा सर्व्हर काल रात्री क्रॅश झाला. काल रात्री उशीरा मेसेज आला आहे. मॅनेजमेंटने सगळ्यांनाच बोलावलंय. रिकव्हरी प्लॅन आजच तयार करायचा आहे. ”

नेहा काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली.

गंभीर चेहरा ठेवून त्याने आणखी एक वाक्य जोडले— “क्लायंटची समस्या सुट्टी बघून येत नाही. ” हे वाक्य कुठेतरी ऐकलेलं होतं. पण त्या क्षणी ते त्याला फार कॉर्पोरेट वाटलं.

नेहाने दीर्घ श्वास घेतला. “ठीक आहे. मग मी जाते माझ्या मित्रमैत्रिणींसोबत. ”“हो. तुम्ही जा. ट्रेक एन्जॉय करा. “ नेहा निघून गेली आणि अमोलने आपला झोपेचा कोटा पूर्ण करून घेतला. आंघोळपांघोळ आटोपली आणि तडक रवीच्या घरी डेरेदाखल झाला.

रवीने दार उघडलं.

काय रे?”

अमोल आत शिरत म्हणाला, “आज देशाचा स्वातंत्र्यदिन आहे. ”

म्हणजे? ”

आणि आपण स्वतःला घरच्या बंधनातून मुक्त करणार आहोत. ”

रवी अमोलचाच मित्र, त्याला लगेच अर्थ समजला.

नेहाला काय सांगितलं आहेस? ”

ऑफिस. ”

कशासाठी? ”

अर्जंट मीटिंग. नेटवर्क नाहीये, सर्व्हर बिघडला आहे. ”

साल्या, पकडला जाशील. ” रवीचे अनुभवाचे बोल.

ते राहू दे रे. काहीतरी खायला दे, अशक्तपणा आला आहे. “

रवीच्या सोसायटीत झेंडावंदनानंतर घरोघरी समोसे पाठवले होते, त्यांच्यावर ताव मारणं झालं, तोपर्यंत रवीने फोनाफोनी करून अतुल आणि आशुतोष या त्यांच्या शाळासोबत्यांना “स्वातंत्र्यदिनाची” कल्पना दिली.

रवी – अमोल गॅलरीत चहाचा आस्वाद घेत मित्रांची वाट पाहत होते, तोवर प्रशांत स्वीटसमधून खादाडीची सामुग्री घेऊन अतुल आणि आशुतोष आलेच.

टीव्हीवर आलटून पालटून ऑस्ट्रेलिया – बांगला देश आणि भारत–श्रीलंका सामने सुरू होते. तिकडे बांगला देशचे गोलंदाज ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा फडशा पाडत होते, इकडे हे चौघं कांदा भजी, खमण आणि कचोऱ्यांचा.

खाण्याच्या डिशेस समोर… चहा बाजूला… क्रिकेट टीव्हीवर.

त्या क्षणी अमोलला जाणवलं—

स्वातंत्र्य, स्वातंत्र्य म्हणजे नेमकं हेच असावं.

अचानक टीव्हीवर सामना थांबला. इकडे ऑस्ट्रेलिया सामन्याचा दिवस संपला म्हणून, आणि तिकडे श्रीलंकेत पाऊस पडू लागला म्हणून.

अमोल म्हणाला, “मॅच का थांबली? माहिती आहे का? आपण नेवाळे मिसळला जाईपर्यंत काही मिस व्हायला नको म्हणून. ”

चांडाळचौकडीचा दौरा ताबडतोब चिंचवड बाजारात नेवाळे मिसळीकडे निघाला.

खादाडी, गप्पा, खाणं – सगळं मनसोक्त झाल्यावर, साळसूदपणे नेहा घरी येण्यापूर्वीच अमोल घरी परतला.

त्याने चेहऱ्यावर थकवा आणला.

शर्ट विस्कटला.

लॅपटॉप बॅग सोफ्यावर टाकली.

आणि चेहऱ्यावर शक्य तितका ‘कॉर्पोरेट शहीद’ असल्याचा भाव आणला.

नेहा आत आली.

काय रे? ”

काय सांगू…” अमोलने दीर्घ श्वास घेतला. “खूप मोठी मीटिंग होती. ”

हं. ”

सुट्टीच्या दिवशी यावं लागलं, सगळे वैतागले होते. ”

हं. ”

पण सर्व्हरचा प्रश्न गंभीर आहे. ”

हं. ”

अमोलला वाटलं, काम झालं.

नेहा पाणी प्यायला गेली.

मग अगदी सहजपणे म्हणाली, “आज स्वातीचा फोन आला होता. ”

स्वाती – नेहाची मैत्रीण, रवीच्याच सोसायटीत रहायची.

अमोलच्या हातातला मोबाइल थांबला. “स्वाती? ती तर ट्रेकला येणार होती ना, तुझ्याबरोबर. ”“हो. पण तिच्याकडे अचानक पाहुणे येणार होते, म्हणून कॅन्सल झालं तिचं. तिने विचारलं—अमोल का आला नाही ट्रेकला म्हणून. ”

अमोलच्या घशात काहीतरी अडकलं. “तिला कसं कळल मी ट्रेकला नाही ते? ”

अमोल, ती रवीच्याच सोसायटीत राहते. आजची तुम्हा मित्रांची रवीच्या घरची पार्टी आणि नेवाळे दौरा हे सगळंच तिनं पाहिलं आणि मला सांगितलं आहे. ”

घरात शांतता.

अमोलने हळू आवाजात विचारलं,

तिनं तुला सगळं सांगितलं? “

नेहा शांतपणे म्हणाली, “अमोल, मला एकच सांग. ”

हं…”

तुला ट्रेकला यायचं नव्हतं, एवढंच ना? ”

हो. ”

मग सरळ सांगितलं असतंस. ”

अमोलने हळू आवाजात उत्तर दिलं, “माझं काही न ऐकता, ट्रेक माझ्या आरोग्यासाठी चांगला आहे म्हणत तू मला खेचत घेऊन गेली असतीस. ”

हो. ”

म्हणून मी…”

खोटं बोललास. ”

हो. ”

नेहा हसू लागली. “ठीक आहे. ”

अमोलला आशा वाटली. “म्हणजे? ”

म्हणजे काही नाही, उद्या सकाळी सहा वाजता आपण दोघं तिकोना किल्ल्यावर जाणार. ”

अमोलचा चेहरा उतरला.

अगं, पण तू आजच जाऊन आली आहेस ना! ”

हो. ”

मग पुन्हा कशाला? ”

ट्रेक तुझ्या आरोग्यासाठी चांगला आहे म्हणून. ”

.. अमोल गप्प.

दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता नेहा ट्रेकिंगच्या शूजमध्ये तयार उभी होती.

अमोल तिच्या मागे उभा होता.

चेहऱ्यावर झोप… डोळ्यांत दुःख… आणि हातात पाण्याची बाटली.

नेहा म्हणाली, “चल. ”

अमोलने एकदा आकाशाकडे पाहिले. मग म्हणाला, “नेहा… ”

काय? “

तिकोना गडावर मिसळ मिळते का? ”

नेहाने मागे वळून पाहिलं. “नाही. आणि तरीही आपण ट्रेकला जाणार आहोत. ”

आणि अमोलला तेव्हा एक अंतिम सत्य समजलं—

क्रिकेटमध्ये Rain Delay असतो, ऑफिसमध्ये Emergency Meeting असते, पण बायकोच्या हातात पुरावा आला की कुठलाही Delay काम करत नाही.

आणि त्याहून महत्त्वाचं—

बायकोला फसवणं कठीण आहेच; पण तिच्या मैत्रिणींच्या नेटवर्कला फसवणं अशक्य आहे.

© डॉ. मकरंद पिंपुटकर 

 चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted