श्री मकरंद पिंपुटकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ रंग हळव्या मनाचे- लेखक – श्री दीपक तांबोळी ☆ परिचय – श्री मकरंद पिंपुटकर ☆

पुस्तक : रंग हळव्या मनाचे

लेखक : श्री दीपक तांबोळी

प्रकाशक : अथर्व पब्लिकेशन्स 

पृष्ठ: १३६ 

मूल्य: ₹ १६० 

दीपक तांबोळी या सिद्धहस्त लेखकाचा आणखी एक कथासंग्रह हाती आला – “रंग हळव्या मनाचे”. आणि त्यांच्या याच पुस्तकातील “बदल” या कथेत म्हटल्याप्रमाणे, एकापाठोपाठ एक – सगळ्याच कथा अधाश्यासारख्या वाचून काढल्या. काही कथा व्हॉट्सअप वा फेसबुकवर आधीच वाचलेल्या – आजही परत वाचताना तेवढ्याच फ्रेश, तेवढ्याच नितांतसुंदर पुन:प्रत्ययाचा आनंद देणाऱ्या, तर काही पहिल्यांदाच भेटीला आलेल्या.

दीपकजींच्या कथांचं वैशिष्ट्य हे की या कथा तुमच्या माझ्या घरात घडतात.

मुलांनी शिकून सवरून परदेशी जाणं – तिथेच स्थायिक होणं, वृद्ध आई वडिलांना परदेशात न करमणं, आणि मग त्यातून आई वडील आणि पुढच्या पिढीची होणारी तगमग हे सांगणारी कथा, स्वार्थी भावंडं, पत्नीच्या निधनानंतर पक्षाघाताने असहाय्य झालेले वडील आणि सज्जन भाऊ / मुलगा यांच्यातली मानसिक ओढाताण याची कथा, आपण भोगलेल्या हालअपेष्टा मुलांना सोसायला लागू नयेत, यासाठी खपणारे आई वडील, त्यासाठी प्रसंगी मुलांना थोडी जास्तच सूट देणारे आई वडील आणि ती मुलं यांचा प्रवास, घरात धुणीभांडी करणारी बाई, तिचा दारुडा नवरा, त्यांची चुणचुणीत हुशार मुलगी – आणि या मुलीने शिकावं म्हणून आग्रह धरणारा त्या मोलकरणीचा पोशिंदा, मध्यमवर्गीय घर, नेहमीचीच आर्थिक ओढाताण, त्यामुळे कायमच साध्या साध्या अपेक्षांवरतीही सोडावे लागणारे पाणी आणि त्यातून नवरा बायको मुलं यांच्यात होणारे वाद, विवाद आणि विसंवाद वंशाचा मतिमंद दिवा आणि दोन मुली, पत्नीच्या निधनानंतर मुलांची आबाळ होऊ नये म्हणून वडिलांचा दुसरा लग्न करायला नकार, काय होते या मुलांचे आणि वडिलांचे पुढे – त्याची कथा सुरेल आवाजाची देणगी लाभलेली परंतु शारीरिक व्यंग असणारी धाकटी बहीण, मतलबी आणि स्वार्थी मोठी बहीण, मध्यमवर्गीय आई वडील आणि त्यांचा आयुष्यातील चढउतार.

एका लग्नप्रसंगी शाळेतल्या बेंच पार्टनरची पुन्हा झालेली भेट, त्यातला एक जण यशाच्या पायऱ्या चढत गेलेला क्लास वन ऑफिसर म्हणून रिटायर झालेला, खाऊन पिऊन श्रीमंत आणि दुसरा “ए फॉर एप्पल, बी फॉर बाल” म्हणणारा शालेय शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेला. दोघेही शाळेनंतर पहिल्यांदाच भेटतात आणि आपापल्या जीवन प्रवासाची तुलना करतात ती कथा….

कथानकातील पात्रांच्या आयुष्यातील अडचणी दीपकजी खूप रंगवत नेतात, यातून त्यांची कशी सुटका होणार ही उत्कंठा आपल्याला लागून राहते, पण तितक्याच कौशल्याने, निरगाठ उकल तंत्राने ते कथेचा (बहुतेक वेळा) सुखान्त करतात, they live happily ever after, आणि आपलाही जीव भांड्यात पडतो.

माझी फिल्लमबाजी या स्टँड अप शोमध्ये शिरीष कणेकर म्हणायचे की भोवतालच्या आयुष्यात इतक्या कटकटी आहेत, इतके त्रास आहेत, इतका अंधकार दाटलेला आहे की निदान चित्रपटाच्या आभासी दुनियामध्येतरी सच्चाईचा विजय होताना, हिरो जिंकताना बघताना आपण आपल्या मनाचे समाधान करून घेतो, आपल्याला आनंद होतो.

दीपकजींच्या पुस्तकांचे तसंच आहे, त्यांची पुस्तकं वाचून आपल्या मनात एक आशावाद जिवंत राहतो की जसा या कथांमध्ये सत्याचा विजय होतो, तसंच आपल्याही आयुष्यात काहीतरी छान घडेल, आपण मेहनत मात्र घेतली पाहिजे.

मनाला उभारी देणाऱ्या “चिकन सूप फॉर सोल” च्या तोडीस तोड दीपकजींची “रंग हळव्या मनाचे” सहित सर्वच पुस्तकं आवर्जून वाचलीच पाहिजेत.

परिचय –  श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments