श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “बँकिंग क्लासरुम – भाग १ व २” – लेखक : श्री विद्याधर अनासकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : बँकिंग क्लासरुम – भाग १ व २.

लेखक : श्री विद्याधर अनास्कर

पृष्ठे : २४४+२३२= ४७६

मूल्य : ६५०₹ (दोन्ही भागाचे) 

प्रकाशक : सकाळ प्रकाशन 

शिक्षणाचा प्रसार आता सर्वदूर झाला आहे. उच्च शिक्षितांची संख्या वाढत चालली आहे. त्यांचे पुस्तकी ज्ञान त्यांच्यासाठी खचितच अभिमानास्पद असेल. पण खूप शिकलेली मंडळी प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात वा व्यवहारात यशस्वी होतातच असे नाही. ‘अर्थसाक्षरते’चा अभाव, हे त्यामागील एक मुख्य कारण असते. सध्या आर्थिक फसवणुकीच्या बातम्या जवळपास रोज वाचायला, पाहायला मिळत आहेत. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात हे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. शहरात शिक्षितांचे प्रमाण अधिक असूनही हे घडते, कारण आर्थिक बाबींविषयी असलेले त्यांचे अज्ञान; हे होय!

हे चित्र प्रबोधनाच्या माध्यमातून बदलावे, यासाठी काही व्यक्ती, संस्था सातत्याने प्रयत्न करत आहेत. विद्याधर अनास्कर हे त्यांतील एक ठळक नाव. त्यांनी बँकिंग साक्षरतेबद्दल जणू एक चळवळच सुरू केली आहे. या क्षेत्राचा त्यांचा केवळ अभ्यास नाही, तर ते गेल्या तीन दशकांहून अधिक काळ बँकिंगमध्ये प्रत्यक्ष कार्यरत आहेत. ‘उद्यम विकास सहकारी बँक, ‘ ‘विद्या सहकारी बँक, ‘ ‘दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक, ‘ अशा अनेक बँका आणि आर्थिक संस्थांमध्ये त्यांनी उच्चपदांवर काम केले आहे आणि करत आहेत. याखेरीज ‘नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन बँक्स, ‘ ‘महाराष्ट्र अर्बन बँक्स फेडरेशन, ‘ ‘रिझर्व्ह बँक’ यांच्याशी संबंधित कामांतही त्यांनी आपले वेगळेपण दाखवून दिले आहे. त्यामुळे त्यांनी बँक साक्षरतेविषयी केलेल्या लिखाणाला सखोल अभ्यासाची आणि दीर्घ अनुभवाची दुर्मीळ जोड मिळाली आहे.

सामान्यांमध्ये बँकिंग साक्षरतेचा प्रसार व प्रचार करण्यासाठी त्यांनी स्थापन केलेल्या ‘बँकिंग साक्षरता प्रतिष्ठान’ या धर्मदाय संस्थेच्या माध्यमातून ते शालेय स्तरापासून अर्थसाक्षरतेचा प्रसार करत आहेत.

बँकेच्या कामकाजाविषयी लोक जागरूक व्हावेत, त्यांचे अज्ञान आणि गैरसमज दूर व्हावेत, यासाठी श्री. अनास्कर यांनी दैनिक ‘सकाळ’मध्ये २०१० पासून सदर लिहिण्यास सुरुवात केली. त्यांचे हे लेखन तब्बल सात वर्ष सुरू होते. याच प्रकारे अन्य एका नियतकालिकातही त्यांनी दीर्घ काळ सदर चालवले. या वृत्तपत्रीय लेखनाचे संकलन म्हणजे ‘बँकिंग क्लासरूम : भाग १’ आणि ‘ भाग २’ ही पुस्तके होय.

वाचकांनी विचारलेले प्रश्न आणि श्री. अनास्कर यांनी दिलेली उत्तरे, असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. बँकिंगसंदर्भात कोणाही सर्वसामान्य व्यक्तीला जेवढे प्रश्न पडू शकतात, त्यांपैकी बहुतांश मुद्द्यांचे शंकासमाधान या ‘बँकिंग क्लासरूम’ मध्ये हमखास होते, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. कर्ज, तारण, जामीनदार, जप्ती, मालमत्तेचे लिलाव, न वटणारे चेक, बँकांचा ‘नॉन- परफॉर्मिंग ॲसेट्स’ (एनपीए), ठेवींचे मुदतपूर्व रोखीकरण, खातेदाराची ‘केवायसी’ यांसह विविध विषयांवरचे पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे एकंदर बँकिंग व्यवस्थेचे अंतरंग नेमकेपणाने उलगडून दाखवतात.

वाचकांच्या प्रश्नाला उत्तरे देताना अनास्कर यांनी ती अत्यंत सरळ व सोप्या भाषेत देत, त्यामधील कायदेशीर भाषेचे जडत्व टाळले आहे. रिझर्व्ह बँक अथवा सहकार खात्याचे नियम सांगताना त्यामागील उद्देशही विषद करण्याची त्यांची शैली अफलातून आहे. त्यांची अनेक उत्तरे, न्यायालयीन प्रक्रियेत तज्ज्ञांचे मत (Expert Opinion) म्हणूनही नोंदवली गेली आहेत. केवळ वर्तमानपत्रांमधून लिखाण करून ते थांबले नाहीत; तर यू-ट्यूब, टीव्ही चॅनेलस, रेडिओ इत्यादी माध्यमांद्वारेही बँकिंग साक्षरतेचे कार्य ते अव्याहतपणे करत आहेत. या पुस्तकाच्या रूपाने वाचकांसमोर त्यांची लेखमाला एकत्रित स्वरुपात आल्याने त्यांच्या विविध प्रश्नांवर त्यांना त्वरित उत्तरे उपलब्ध होतील.

या पुस्तकाचे वाचन-मनन, अभ्यास करणारी सर्वसाधारण व्यक्तीही त्यातून मिळालेल्या ज्ञानाच्या बळावर तिच्या मित्रपरिवारात तज्ज्ञ समजली जाईल, एवढे हे पुस्तक माहितीसंपन्न आहे. फक्त वाचक नव्हे, तर बँकिंग क्षेत्रात काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांनाही ‘बँकिंग क्लासरूम’ मार्गदर्शक ठरू शकेल. हे पुस्तक सलग वाचणे, यात आनंद आहेच; पण ते प्रश्नोत्तर स्वरूपात असल्याने, पुस्तकाची उजळणी करताना कोणतेही पान उघडून वाचन सुरू केल्यास, त्यात मागचा -पुढचा संदर्भ जुळण्याची गरज भासत नाही. प्रत्येक प्रश्न आणि त्याचे उत्तर, हे जणू एक छोटे प्रकरणच आहे.

बँकेचे सेवक, खातेदार, कर्जदार, जामीनदार, ठेवीदार, तसेच बैंकिंगविषयी जिज्ञासा असणारी कोणतीही व्यक्ती.. या सर्वांसाठी ही ‘बँकिंग क्लासरूम’ निश्चित उपयुक्त ठरेल.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments