श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

“चिमूटभर मिठाची पसाभर कहाणी” – लेखिका : सुश्री आशा उगांवकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : चिमूटभर मिठाची पसाभर कहाणी

लेखिका : आशा उगांवकर

पृष्ठ : ११२

मूल्य : १७५₹ 

अनंत काळापासून मिठाने व्यापलेली पृथ्वी आणि माणसांसह, प्राणी, वनस्पती यांना असलेली मिठाची गरज आपण जाणून आहोत. दैनंदिन जीवनात मीठ खाल्याने होणारे फायदे आणि तोटे यावर नेहमी भाष्य केले जाते. गाईम्हशी या पाळीव प्राण्यांना जरुरीचे असणारे मीठ वैरणीतून कसे देता येईल अगर त्यांना चाटता यावे यासाठी काय करावे यावर देखील विचार होतो. मृदूकाय प्राण्यांना मिठाने अपाय होतो हे सिद्ध झालेले आहे. नैसर्गिक संरक्षक़ अशी त्याची ख्याती आहे.

मिठामुळे जगात अनेक युद्धे झाली, साम्राज्ये बनली आणि गडगडली! जगातील सर्वांत प्राचीन व्यापार हा मिठाचा होता, जिथे मिठाची उपलब्धी अधिक तिथे आपली सत्ता हवीच म्हणून ती मिळविण्यासाठी मोठमोठी युद्धे होत असत. मिठाच्या व्यापारी मार्गाला ‘लवण मार्ग’ (सॉल्ट रूट) असे नाव मिळाले. या मार्गावर व्यापाऱ्यांच्या सुरक्षेकरिता बंदोबस्तही ठेवला जात असे. मीठ इतके मौल्यवान होते. तस्करी हा शब्दप्रयोग खरे तर सोन्याशी निगडित अर्थाने वापरला जातो. परंतु मीठ सोन्यासारखेच मौल्यवान असल्याने एकेकाळी त्याची देखील तस्करी होत असे.

अशा मिठाबद्दल मानवी मनात जगभर खास आकर्षण आहे. खाद्यपदार्थ टिकविण्यासाठी जरुरी असलेल्या मसाले आणि मीठ यामुळे परकीय आक्रमणे झाली, युद्धे सुद्धा झाली आणि आपल्यावरील परकीय सत्तेच्या काळात मिठावर कर कर लादल्यामुळे मीठ इतिहासात अजरामर झाले! जेथे मिठाचे उत्पादन होत नाही अशा देशांना मिठाची आयात करावी लागते. आपल्याकडील मुबलक उत्पादकतेमुळे आपण त्याला महत्त्व देत नाही.

वाक्प्रचार, म्हणी, बोलीभाषा इ. वाङ्मय प्रकारातून मिठाचा खारटपणा व्यक्त झाला आहे. अशा जीवन मरणाशी संबंध असलेल्या मिठाबाबतचे लिखाण हृदयस्पर्शी ठरावे. मिठाच्या मैलोनमैल पसरलेल्या जागांना सॉल्ट फ्लॅट्स अशी इंग्रजी संज्ञा आहे. या जागांचा मराठीमधील उल्लेख मीठव्याप्त सपाट जागा असा केला आहे.

मिठाची विपुलता असली तरी आणि मिठाविना जीवन अळणी असले तरी जगभरातले शेफ (प्रशिक्षित आचारी) कोणताही खाद्यपदार्थ बनविताना स्वादानुसार, चवीनुसार आणि शुद्ध मराठी बोलीभाषेत सांगायचे तर ‘चिमूटभर’ असाच शब्दप्रयोग वापरतात. खाद्यपदार्थाची रुची वाढविण्यासाठी त्याची आवश्यकता अल्प प्रमाणात असते. पण मिठासंबंधी

सर्वांगीण विचार केला तर त्याची व्याप्ती मुठीत न मावणारी आहे. त्यामुळे मिठाबद्दल बोलताना “चिमूटभर मिठाची पसाभर कहाणी” सांगण्याचा मानस दृढ झाला आणि या लवणानंदातून पुस्तकाचा जन्म झाला.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments