सौ ज्योती विलास जोशी 

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ 

☆ “दीपपूजा ” – दीपा पुजारी ☆ परिचय – ज्योती विलास जोशी ☆ 

पुस्तक : दीपपूजा 

लेखिका : दीपा पुजारी 

प्रकाशक : मनोरमा प्रकाशन, मुंबई 

पृष्ठे -२१६,

किंमत -४३५/-

दीपपूजा’ हे सौ. दीपा नारायण पुजारी या माझ्या मैत्रिणीचे मनोरमा प्रकाशनने प्रकाशित केलेले ललितबंध संग्रहाचे पहिले पुस्तक! एखादी लेखणी पहिल्या प्रयत्नातच आपली चाहूल देते. दीपाच्या या लेखणीने अनेक वळणं घेतली आहेत. अनेक माणसं तिला भेटली. अनेक ऋतूंतील रंगांची चित्रकारी तिने केली आहे या पुस्तकात… पहिल्या पुस्तकातूनच मनात साठलेले वाचकांपर्यंत पोहोचवण्याची तिची आतुरता जाणवते. साध्या प्रसंगातून असाधारण शोधाची दृष्टी या लेखिकेला आहे. घर, माणसं, नाती, निसर्ग आठवणी, अनुभव या रोजच्या जगण्याला लेखिकेने आपल्या संवेदनशील नजरेने पाहिलेलं आहे. विषय फार मोठे नाहीत परंतु त्यातला आशय मोठा आहे.

‘माझी अस्मिता’ या ललित बंधातून तिने स्वतःला प्रतिबिंबित केले आहे. अभंगाच्या ओळी, ओव्या पेरून लिहिलेले काही विषय चिंतनशील असे आहेत. त्यातून तिने सात्विक जीवनशैलीचे दर्शन घडवलंय.

‘सावळगंध’ ‘नाचे मयुरी’ ‘फुलपाखरू’ अशा विषयातून तिने निसर्गाशी अनुसंधान साधलंय.

‘कपडे पटाची दंगल’ ‘पैठणी’ अशा ललितबंधातून तिच्यातील गृहिणी डोकावते.

‘राजस मोमोज’ ‘चकुल्या’ अशा काही पाककृतीतून ती सुगरण असल्याची प्रचिती येते.

वाचकांशी फारसं अंतर न ठेवता अगदी शेजारी बसून एखादी आठवण सांगणारी अशी ही लेखिका, छोट्याशा घटनेतून जीवनाचा अर्थ आपल्यासमोर ठेवते. तिच्या निरीक्षण शक्तीला दाद दिली पाहिजे. भाषाशैली ओघवती, वाचकाच्या मनाची पकड घेणारी, रसाळ, काव्यमय, विनोदी अशी आहे.

काही पुस्तकं आपण वाचतो, बाजूला ठेवतो पण काही पुस्तकं मनाच्या कोपऱ्यात शांतपणे वाचत राहतात. त्यामुळे आपल्यालाही आयुष्यातील विस्मृतीत गेलेले क्षण पुन्हा पुन्हा आठवतात. तसेच काहीसे हे पुस्तक… संग्रही ठेवावं आणि पुन्हा पुन्हा वाचावं असं हे पुस्तक… या नव्या लेखणीचं स्वागत!! तिच्या पहिल्या पावलाला प्रेम मिळो! लेखणीला बळ मिळो!! तिच्या पुढच्या वाटचालीतून अशीच अनेक सुंदर शब्दफुले उमलत राहोत. ही मनापासून शुभेच्छा!!!

शब्दांनी सजवलेलं अंगण आणि त्यावर दीपाच्या विचारांची रांगोळी यांनी केलेली ही दीपपूजा…

© ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

jvilasjoshi@yahoo.co.in

9822553857

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted