श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “प्रवाहपतीत…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
शोधता तळ तुझा अंतराचा… नितळ स्फटिकासमान खळळाता मला दिसला… पारदर्शी, निर्मळ होता तो…किल्मिष न उरले इतुकेही तव मनात माझ्याविषयी… रागाचे ते तणही पाण्यासोबत वाहत वाहत निघती… पण दिसली बरं का मला!मी पूर्वी दिलेल्या तुला दुखाची काळी काळी पुटं! … रुतून बसलीय तुझ्या अंतकरणात…का अजुनही जतन करून ठेवली आहेस हे न कळे!.. तोच एक दुखरा सलणारा तुकडा आता मी जेव्हा पाहिला …माझ्यातला माणूस हरवून गेला होता का तेव्हा! हेच समजून आले मला…नित्य वाहते खळखळ करत ते जल पण अजूनही त्याला निपटून टाकणे नाही जमले …करतसे कबुली ती प्रांजल … नतमस्तक मी झालो त्या तुझिया प्रेमाचा झरणारा निर्झरास कि जो असावा अमृत धारेचा निर्मम प्रवाह तो..जो माझीया उत्शृंखल वृतीस दमन करतो…. सारे तुझ्या विपरीत घडतची राहत गेले तरी तू मात्र तुझ्या अंतरी त्यांच्याप्रती शुद्ध भावच ठेवतोस… मिसळून घेतोस त्या दृष्टादृष्ट भावनांना एकतत्व नामातला अद्वैताचा प्रवाह होतोस… आणि आणि मी मात्र तुझ्या प्रवाहाला पावलो पावली अवरुध्द करण्यासाठी मुढमतीचा खडक होउन तुझी वाट अडवण्याचा करंटेपणा करत आपली महत्ता दाखवून देत बसतो… पण त्यालाही तू तुझ्या पवित्र जलाने सचैल स्नान घालून त्याचं सदैव पापक्षालन करण्याचं असिधारा व्रताचं पालन करत राहतोस… देहाचं मालिन्य आजवरी तुझ्या प्रवाहाने धुवून गेले… पण मनाचं मालिन्य घालवण्यासाठी त्या अमृताचा थेंब प्रवाहपतीतम्हणून घेण्याची इच्छा काही झाली नाही… नि मी अजूनही असाच नर्मदेच्या गोट्या सारखा प्रवाहपतीत राहीलो…
© श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






