श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “आणि अचानक…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
… आणि अचानक एखादा हिरवागार वृक्ष उन्मळून पडतो तेव्हा… वरच्या आभाळालाही गदगदून येते… हंबरडा फोडावा असा त्याच्या हृदयातून गडगडटाचा आवाज काळ्या नभातून निघतो तो आसमंताला भेदून टाकतो… ती विद्युल्लता आधारासाठी काळ्या नभाच्याच खांद्यावर डोकं ठेवताना आपल्या हुंदक्यांचा टाहो अधनंमधनं कडकडत राहते… हे काय होऊन राहिलं बाई… दुखाचं सात्वंन करायला जवळचे नि दूरचे जेव्हा घटनास्थळी येतात तेव्हा फक्त त्यांच्या मनात कालवाकालव सोबत डोळ्यातून अश्रूधारांच्या सरीवर सर कोसळत रराहतात.. तसा ते धवल आभाळ कोलमडून पडलेल्या वृक्षाचा दुखवटा म्हणून आपल्या बाहूवर काळ्यानभाचीच पट्टी बांधून घेतो.. आणि तो वरूण देखील सगळी सज्जता झाल्यावर दुखाग्नीत पोळलेल्या मनाला गार वाऱ्याचा शिडकावा मिळताच बरसू लागतो आपल्या अमृतधारा… धरेवर नि त्या उन्मळून पडलेल्या वृक्षावर… अखेरचं गंगाजलच मुखात पाजावं तसं… जमिनीत खोलवर रुजलेली त्या वृक्षाची मुळं उन्मळून पडताना आपला ऋणानुबंध संपला सांगताना त्या मातीशी असलेली नाळ तोडून अलग होतो.. विलग होतो… त्या मातीलाही वेदना होतात… उर फुटून यावा तशी वृक्षाच्या मुळाशी लगटलेली ती माती देखील आता मोठा खड्यातून वर येते… आपल्या अंगाखांद्यावर ज्याला लहानाचं मोठं केलं निगुतीने सांभाळले तोच आज असा अचानक निखळून पडावा असा उसासा सोडत राहते… आठवतात त्या वृक्षाला त्याच्या अंकुरापासून तो परिपक्व झालेल्या वृक्षा पर्यंतच्या प्रवासात त्याचे मातीने केलेले पालन पोषणाचे क्षण न क्षण… आणि खंबीरपणे स्व:ताच्या बळावर आणि भक्कम पायावर त्याला उभा करण्यासाठी जमिनीने घेतलेल्या कष्टाची जाणीव… कधीही ऋणातून उतराई न होण्यासारखे ते उपकार… हिरवेगार शाखा पल्लवांनी बहरलेला, फुला फळांनी लगडलेला तो वृक्षाचा डोलारा आज असा अचानक उन्मळून पडला… अजून पालवी पिवळी पडलीच नाही, फांद्याही वाळल्या नाहीत खोडाचा बुंधा आतून कोवळातर होता पण बाहेर अजून निबरपणा कसला तो शिवलाच नाही… आणि तरीही तरीही वृक्षांनं असं अवचित… ते फांद्यांवर विचरणारे पक्षीगण आणि वृक्षाच्या पायतळी विसावणारे प्राणी मात्र नि मनुष्य गण तो उभ्याचा आडवा झालेल्या वृक्षाचा आता काय उपयोगाचा नाही दिसताच त्याला तिथेच तसाच सोडून निघून गेले… त्याच्या आश्रयाखाली नि सावलीत राहून आपली जीवन वाटीका फुलवत राहणारी ती छोटी मोठी लता वेली नि लहान मोठी तरूचीं रोपटी आज तो वृक्ष आडवा झाल्यावर उघडे पडले होते… अनाथ झाले होते… तो वृक्ष असा अचेतन होऊन पडला म्हणताना त्यांनी त्याच्या अंगाखांद्यावर दुखाने लोळण घेत राहिले… प्रत्येकजण आपापल्या आठवणींचा कढ काढत त्याला आंजारू गोंजारू लागले… जाऊ नको दूर तू.. असे आळवत राहिले… आता त्यांना या लहान वयात अकाली मोठेपणाची जबाबदारीची धूरा उचलण्याशिवाय पर्यायच नव्हता… सगळीच लहान अडेनिडे कोण कोणाची समजूत काढायची आणि कुणी आता नेतेपदाची सूत्र घ्यायची… सगळेच अस्पष्ट नि धूसर बनले गेले होते… आधी हे अंगावर पडलेले वृक्षाचे जड ओझे त्यांना दूर करायचे होते… मग मोकळा श्वास घेऊन पुढचं ठरवायचं होते.. वृक्षाचं पडलेल्या अजस्त्र धुडाला आता कधी बाजूला केले जाईल याच्या प्रतिक्षेत तिथे सगळे होते… नि आपल्या अचेतन कलेवराला कधी मुक्ती मिळणार याच्या चिंतेत तो वृक्ष वाट पाहत राहिला होता…
© श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






