डॉ. धनंजय देशपांडे
मनमंजुषेतून
☆ विवाहितांसाठी सुखी जीवनाची पाच सूत्रे… भाग – २ ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆
विवाहित पुरुषांसाठी
१) पत्नीची कधीच कोणाबरोबर तुलना करू नका
तुलना करूच नका…. ना इतरांकडे असलेल्या वस्तूंची, ना इतरांच्या पत्नीशी, ना इतरांच्या कोणत्याच गोष्टीची आपल्या जीवनाशी बरोबरी करू नका!! प्रत्येकाचे जीवन हे वेगळेच असते, त्यामुळे जे आपल्याला मिळाले आहे त्याचा विचार करून त्यात आनंद माना. कारण दुरून डोंगर साजरे असतात. म्हणून असे डोंगर दूरच ठेवा. समोरच्याची पत्नी बघ किती चांगली आहे…. असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा समोरच्याच्या दृष्टीनेही तुम्ही “समोरचे” असता त्यामुळे त्याच्या नजरेतून “तुमची” चांगली असणार न! हे लक्षात घ्या!
२) स्वतःला ठेवा फिट…. मग संसार होईल हिट
प्रत्येक पुरुषाला खरेतर आपण छान दिसावे असे वाटते, त्यासाठी काहीजण प्रयत्न करतात मात्र काहीजण बेफिकीर राहून शरीराचा घेर आणि वजन वाढवतात. कोणत्याही स्त्रीला ढेरपोट्या नवरा आवडत नसतो. गबाळा राहिलेला आवडत नसतो. जसे नवऱ्याला घरी गेल्यावर बायकोने फ्रेश स्माईल देत, फ्रेश कपड्यात स्वागत करावे असं वाटत तसेच पुरुषांनीही बाहेरून घरी जाताना ऑफिसातच स्वतःला थोडं फ्रेश करावं, असेल तर सेंट किंवा पावडर लावून मग घरी जावे. थोडक्यात काय तर…. जे तुम्हाला तिच्याकडून अपेक्षित आहे तेच तुमच्याकडूनही तिला अपेक्षित असते. हे लक्षात घ्यावे.
जे स्वतःबद्दल तेच घराच्या सौंदर्याबद्दल….. तुम्हाला तुमचे घर हे सुंदरच असावे असे वाटते. त्याची यथाशक्ती जबाबदारी पत्नी उचलत असतेच. पण तिच्याही मागे बारा व्याप असतात. ते सांभाळून ती घर सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करते. अशावेळी जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा त्याकामात तुम्हीही हातभार लावू शकता की…! विशेषतः दोघेही नोकरी करणारे असतील तर तिथं नवऱ्याने हे जास्त काळजीने केले पाहिजे. असे ज्या घरातील पुरुष करतात त्या घराची गृहलक्ष्मी नक्कीच आनंदी राहते आणि ती आनंदी तर तुम्ही आनंदी न! घर आवरण्याच्या कामी आपल्या मुलांची मदत घेता येते आणि त्यातून नकळत मुलावर संस्कारही होतात.
३) पत्नीवर लक्ष ठेवा पण प्रेमाने!!
पत्नीचे वेळापत्रक प्रेमाने जाणून घ्या. तीही घरासाठी जमेल तसे धावत असते, हे लक्षात घ्या!! आणि मग तिच्या हातून एखादे जरी (छोटेसे) पण वेगळे काम चांगले झाले तर त्याचे कौतुक करा!! तिच्या आवडीचा गजरा किंवा एखादे चॉकलेटपण तिला अशावेळी खूप होते. कारण…
बक्षीस की किमत देखी नही जाती तो…. बक्षीस देनेवाले की नियत देखी जाती है!
त्यामुळे तिला हुरूप येतो आणि अजून चांगल्या गोष्टी ती करण्याचा प्रयत्न करते.! कौतुक कोणाला नको असते हो?? सर्वांनाच हवे असते!! मग त्यात कंजुषी का करायची?
महत्वाचे म्हणजे तिच्याबद्दल जिज्ञासू राहा पण भोचक राहू नका. जिज्ञासूपणा सुखकारी आणि भोचकपणा… प्रलयकारी!! त्यामुळे तिच्या पाठीमागे तिची पर्स, मोबाईल, कपाट अजिबात चेक करत बसू नका. तुम्हाला कसली शंका असेल तर तिच्यासमोर तिला सांगून या गोष्टी पाहू शकता. पाठीमागे नको. तसे केल्याने अविश्वासाचा पाया रचला जातो आणि सुखी संसाराला तडे जाणे सुरु होते.
कदाचित अशावेळी तुम्हाला न आवडणारं काहीतरी तिच्या पर्समध्ये, मोबाईलमध्ये सापडेल त्याबद्दल लगेच त्याला धारेवर धरण्याऐवजी ती गोष्ट का तिच्याकडे आहे हे समजून घ्या. उदा. कधीतरी केसात माळलेला गजरा संध्याकाळी कामावरून निघताना तिने पर्समध्ये टाकलेला असतो. आणि नंतर घरी आल्यावर तो काढायचा विसरून जाऊ शकते. आणि नंतरच्या दिवशी तो सुकून वाळून तिथंच राहतो. त्यावर इतर अनेक वस्तू पडत असतात आणि गजरा मग तळाशी पडून राहतो. नेमका तो तुम्हाला तो दिसला तर लगेच “हे हायजेनिक नाही…. वाईट आहे हे असं तुझ्यासाठीच” असं लेक्चर देण्यापेक्षा तुम्ही शांतपणे तो सुकलेला गजरा काढून डस्टबीनमध्ये टाकू शकता आणि एखादा हलकासा पुणेरी टॉन्ट मारून वातावरण हलकं करू शकता!
४) स्त्रियांच्या गरजा स्वतःसाठी कमी अन घरासाठी जास्त असतात अनेकांना असं वाटत की, पत्नी सतत काहीतरी मागतच असते. हे आणा, ते आणा,. अमुक पाहिजे, इत्यादी…. काही ठिकाणी हे खरेही आहे. पण माझ्या आजवरच्या निरीक्षणानुसार तरी बऱ्याच घरी त्या मागण्याच्या यादीत तिच्या स्वतःसाठीच्या गोष्टी कमी आणि घरासाठी, संसारासाठी व एकूणच कुटुंबासाठी लागणाऱ्या जास्त असतात. त्यामुळे कधीतरी तिने न मागता साधा दहा रुपयाचा गजरा अचानक एकेदिवशी घरी गेल्यावर तिला देऊन सरप्राईज केलं तरी ती खुश होते. नेहमी पैठणीच घेतली पाहिजे असं नाही! किंवा असेही करू शकता की समजा तिने किराणाची यादी दिलीय तर ते सामान घेऊन झाल्यावर न विसरता कधीतरी तिच्या आवडीची एखादी वस्तू. पदार्थ पण खरेदी करून घरी गेल्यावर… आधी किराणा पिशवी तिच्या हातात देऊन नंतर हळूच तिच्या आवडीची गोष्ट हळूच तिच्या समोर धरा… आणि तिचा चेहरा पहा! नाही तिने जादू की झप्पी दिली तर पहा!!
तिला रोज उठून तुम्ही लाड करावेत, अशी अपेक्षा मुळीच नसते!! पण कधीतरी मुद्दाम सवड काढून या गोष्टी करा!! दिवाळी दसर्याला तिला गिफ्ट देण्यापेक्षा एखाद्या रविवारी देखील असा तिच्या आवडीच्या गोष्टीचा “दसरा” करता येतो!! त्यातून मग संसार देखील हसरा होतो!!
५) कपबशी सारखं नको तर चपलांच्या जोड्यासारखं राहावं
अनेकदा म्हणतात की, पतिपत्नी म्हणजे जणू कपबशी सारखं नातं! एक असेल तर दुसऱ्याला महत्व….
मात्र म्हणतो की, बशी फुटली तरी कपातून का होईना चहा पिता येतो की! त्यामुळे मी त्यापुढं जाऊन म्हणेन की….
पतिपत्नी म्हणजे चपलांच्या जोड्यासारखं नातं…. एक चप्पल हरवली तर दुसरीला अस्तित्व उरत नाही….
“तू आहे म्हणून मी आहे…. ” हि भावना कायम मनात (दोघांनीही) ठेवावी. कारण सुखी संसाराचा तोच गुरुमंत्र आहे. तसेच…..
“तू नही होती तो मेरा क्या होता रे” असं कधीतरी लाडात जेव्हा पत्नी तुम्हाला म्हणेल तेव्हा “स्वर्गसुख” म्हणजे काय असत ते पुरुषांना कळेल.
घरातला पसारा असो की मनातला पसारा असो….
एकाने पसरलं तर दुसऱ्याने सावरायचं असत.
हे विसरू नका!
वेळ काढून इतकं सगळं वाचल्याबद्दल तुमचे आभार!
– समाप्त –
© डॉ. धनंजय देशपांडे
(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)
मो न. ९४२२३०४३४४
https://www. facebook. com/ddtilakroad
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





