श्री जगदीश काबरे
☆ भविष्य!!! ☆ श्री जगदीश काबरे ☆
एकदा एक ज्योतिषी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारात आला आणि महाराजांना म्हणाला, “मी तुम्हाला आज तुमचं भविष्य सांगणार आहे. तुमच्या जीवनात उद्या काय घडणार आहे हे मी तुम्हाला आज सांगतो.”
यावर शाहू महाराजांनी त्या जोशीबुवाला अद्दल घडविण्याचे ठरविले.
ते त्या जोतिष्याला म्हणाले, “जोशी महाराज, आज माझ्याकडे वेळ नाही. तुम्ही असं करा, उद्या स.११ वाजता या आणि मला माझं भविष्य सांगा.”
जोशी महाराज तेथून निघून गेले. त्याच वेळी महाराजांनी शिपायाला बोलविले आणि त्या जोशीबुवाला जेलमध्ये ठेवण्यास सांगितले. शिपायाने महाराजांच्या आदेशानुसार जोशीबुवाला जेलमध्ये टाकले. जेलमध्ये जोशी बुवाला जेवणाखाण्याची व झोपण्याची व्यवस्था करण्यात आली. रात्रभर मच्छरांनी फोडून काढल्याने जोशीबुवांना रात्रभर झोप लागली नाही. ते विचार करू लागले की, ‘ मी कोणताही अपराध केला नाही; तरीही मला जेलमध्ये का टाकले आहे? ‘ त्यांना काही उत्तर सुचेना. त्या ज्योतिषी बुवांना सकाळी महाराजांच्या आदेशानुसार भविष्य सांगण्यासाठी दरबारात हजर करण्यात आले.
दरबारात पोहोचताच जोशी महाराजांनी रडत, रडत शाहू महाराजांच्या पायावर डोके ठेवले आणि म्हणाले, “महाराज मी काय गुन्हा केला आहे की मला शिपायांनी जेलमध्ये टाकले?”
त्यावर शाहू महाराज गरजले, “जोशी महाराज तुम्ही माझं भविष्य सांगायला आले होता. मग मी तुम्हाला जेलमध्ये टाकणार आहे हे तुमचे भविष्य तुम्हाला का नाही समजले?”
हे ऐकताच भविष्य सांगणारे ते जोशीबुवा मान खाली घालून तेथून निघून गेले.
महात्मा ज्योतिराव फुले प्रश्न विचारतात, ” भविष्य, पंचांग बघतात आणि पत्रिकेत 36 गुण मिळवतात तरीही त्यांच्या बायका विधवा का होतात?”
तेव्हा जन हो, शहाणे व्हा. ज्योतिषाच्या नादी लागू नका आणि त्यांची पोटे भरून आपले आयुष्य बरबाद करून घेऊ नका.
© श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




