सौ. गीता वासुदेव नलावडे

? मनमंजुषेतून ?

 ☆ मातृभाषेतून शिक्षण… लेख क्र. १९ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे

“बाई, कसेही करा पण हिला तुमच्या शाळेत ऍडमिशन द्या,” समोर बसलेले पालक उच्चविद्याविभूषित होते. गेले चार दिवस रोज येत होते. त्यांची अडचण मला समजत होती पण आता तर ऑगस्ट महिना उजाडला होता, वर्गही पूर्ण क्षमतेने भरलेले होते.

काय करावे मलाही समजेना. 

पालक काकुळतीला येऊन विनवणी करत होते, मुलगी बिचारी – कोपऱ्यातल्या खुर्चीवरून हळूच माझ्याकडे पाहत होती. तिची नजर जणू काही मला सांगत होती, “घ्या ना हो मला तुमच्या शाळेत !” 

ही मुलगी गेली दोन वर्षं – ज्युनियर केजी, सिनियर केजी – स्टेशनजवळील कॉन्व्हेंट स्कूलमध्ये इंग्रजी माध्यमात शिकायला जात होती. पण तिथे सतत ती आजारी असायची, झोपून राहायची. 

तिच्या आजारपणासाठी अनेक डॉक्टर झाले, पण तिला कोणताही शारीरिक आजार नाही असं सगळ्याच डॉक्टरांनी सांगितलं. दिवसेंदिवस मुलगी खूपच अशक्त होऊ लागली. 

तिच्या आजाराचं निदान “शाळा” आहे हे समजल्यावरती आईने तिची शाळा बदलायचा निर्णय घेतला, पण वडील मात्र आपल्या निर्णयाला ठाम चिकटून होते, “मी इंग्रजी माध्यमात शिकलो, माझी मुलंही इंग्रजीच माध्यमातच शिकतील,” हा त्यांचा हट्ट. पण जूनमध्ये शाळा उघडल्यावर मुलगी काही शाळेत जायलाच तयार नव्हती, शेवटी नाईलाजाने का होईना पण वडिलांना पटलं आणि म्हणून आता ऑगस्ट महिन्यात प्रवेशासाठी ते आमच्या शाळेत येत होते. 

मी मुलीशी बोलले. ती पटकन माझ्याजवळ येऊन उभे राहिली, “बाई, मी येऊ का तुमच्या शाळेत? मला आवडेल इथे यायला!” हे बोलत असतानाही तिचा चेहरा फुलला होता.

शेवटी मी तिला प्रवेश दिला, तेव्हा ती नाचायलाच लागली, “आजपासूनच येते मी शाळेत !”

मुलांना इंग्रजी माध्यमात घालण्याचा अट्टाहास कशासाठी ? आपल्या मातृभाषेतून शिक्षण देणे महत्त्वाचे हे निदान या पालकांना तरी लवकर कळले आणि एक कोमेजलेली कळी पुन्हा टवटवीत झाली.

– लेख क्र. १९ 

© सौ गीता वासुदेव नलावडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
ज्योती कुळकर्णी अकोला
0

गीता ताई लेख छान! माझं इंग्रजी फार कच्च राहून गेलं.मुलं सातवीपर्यंत मराठी मिडियमला असल्याने मी लक्ष देऊ शकले.आणि उच्च शिक्षित झाले दोघंही.