श्री दिवाकर बुरसे
✦ हिशोब काय ठेवायचा… ✦ श्री दिवाकर बुरसे ☆
(३१ मार्च म्हणजे आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस. त्या निमित्ताने ही विशेष कविता…)
☆
हिशोब काय ठेवायचा,
रिटर्न काय मागायचा!
……
अनंत काळाच्या अखंड ओघात
आपल्या अल्पशा आयुष्याचा…
हिशोब तो काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा! ll१ll
जीवनाने भरभरून दिले.
जे नाही मिळाले त्याचा…
हिशोब तो काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा! ll२ll
मित्रांनी अलोट प्रेम दिले
मग शत्रूंनी दिलेल्या त्रासांचा…
हिशोब तो काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा! ll३ll
मधुर आठवणी इतक्या आहेत
मग काही कटु अनुभवांचा…
हिशोब तो काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा! ll४ll
मिळाली कौतुकफुले कैकवेळा जनांकडून
मग बोच-या काट्यांचा…
हिशोब तो काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा! ll५ll
उगवणारा प्रत्येक सूर्य प्रकाशमान.
मग रात्रीच्या अंधाराचा…
हिशोब तो काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा! ll६ll
आनंदाचे दोन क्षण पुरे जगायला.
मग उदासवाण्या क्षणांचा…
हिशोब तो काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा! ll७ll
चंद्र शीतल, आल्हाददायक.
मग त्याच्यावरील लांछनांचा…
हिशोब तो काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा! ll८ll
नुसत्या आठवांनीही होते मन उल्हसित.
मग कुणी भेटल्याचा अन् न भेटल्याचा…
हिशोब तो काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा! ll९ll
काही तरी चांगलं आहेच प्रत्येकामध्ये.
मग किरकोळ दोषांचा…
हिशोब तो काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा! ll१०ll
नाही ठेवला हिशोब, नाही लिखापढी
आहे त्याच्यापाशी, ‘चित्रगुप्ताची‘ चोपडी
हिशोबून सारे, त्याने ठरवायचे…
वसूल करायचे की रिटर्न द्यायचे! ll११ll
*नव्या आर्थिक वर्षाच्या शुभेच्छा! *
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





