डॉ मकरंद पिंपुटकर
☆ भीमाचे गर्वहरण… लेख दुसरा ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆
कौरवांच्या नाशानंतर, असे म्हणतात, की एकदा भीमाला आपणच जगात सगळ्यात बलशाली आहोत असा गर्व झाला. मग मारुतराया वृद्ध वानराच्या रुपात आला, माझी शेपूट हलवून बाजूला कर म्हणाला आणि भीमाचे गर्वहरण केले.
— —
मी gym मध्ये अक्षरशः घाम गाळत होतो. यंदा सालाबादप्रमाणे होणारा माझा नवीन वर्षाचा gym ला जायचा संकल्प बराच तग धरून होता. माझी लेकही नेटाने gym ला जात होती, पद्धतशीर व्यायाम करत होती आणि डायटही फॉलो करत होती. आणि त्याचा सुडौल परिणामही दिसून येत होता. आणि त्यामुळे माझ्या gym ला जाण्यावर तिचं विशेष लक्ष होतं.
माझीही ताकत आणि वजनं उचलायची capacity वाढत चालली होती. लेकीच्या आग्रहामुळे आणि सुचनांमुळे वजनं उचलण्याच्या पहिल्या सेटनंतर मी आवर्जून पुढचा सेट जास्त वजनांचा घेत होतो. I was becoming pretty good at this.
आजही gym मध्ये छान लय मिळाली होती. आज gym मध्ये कोणी एक साठीच्या आजूबाजूच्या वयाचे काका नवीनच दिसत होते. शरीरात stiffness होता आणि dumb bells घेऊन त्यांना जमेल तसं, झेपेल तसं ते front raise, hammer curl वगैरे करत होते.
माझे घाम गाळणं चालू होतं आणि ते काका माझ्याकडे कौतुकानं बघत होते. मी squats मारत असताना, ते अगदी थांबून लक्षपूर्वक पाहत होते. माझे leg press करून झाल्यावर त्यांना राहवेना. ते मुद्दाम माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले, “व्वा, फारच छान करता हो तुम्ही. “
माझ्या शरीरावर मूठभर मांस चढले. मी हळूच तिरक्या नजरेने gym मधले आणखी कोणी या कौतुकसोहळ्याचे साक्षीदार आहेत का बघून घेतलं.
“फक्त, squats करताना तुम्ही खाली जाताना जोरात खाली जाता, तसं करू नका. आणि वर येताना spring action ने वर येता, तसंही करू नका. भार खांद्यांवर आणि गुडघ्यांवर नकोय, hip joint आणि मांड्यांवर हवा आहे. आणि त्या टाचा उचलल्या जातात, तेवढ्या सांभाळा, बरं का !”
“Leg press लासुद्धा तुमचा angle बदलायला हवा आहे. आणि वजन पुढे ढकलताना पाय गुडघ्यातून सरळ करत आहात तुम्ही, तेही टाळा. “
माझा तोंडाचा वासलेला “आ” तसाच राहिला होता. ते काका त्यांच्या पुढच्या gym routine कडे वळले आणि मी आमच्या gym trainer ला – राजू सरांना गाठलं.
“राजू सर, हे नवे काका कोण ?” माझी पृच्छा.
राजू सरांनी कानाच्या पाळ्यांना हात लावला, जीभ चावली आणि म्हणाले – “सर, चैनी सरांचं नाव ऐकलं आहेत का तुम्ही ? नातीचा वाढदिवस आहे म्हणून चार दिवस आले आहेत इथं चिंचवडला.
Weight lifting चे नॅशनल लेव्हल चॅम्पियन होते ते. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांत मेडल्स मिळवली आहेत त्यांनी. ७३ वर्षांचे आहेत, पण फिटनेस बघा त्यांचा.
एअर फोर्स मध्ये होते. आता बदलापूरला स्वतःचं gym आहे. Weight lifting, power lifting साठी मुलं तयार करतात ते. पुढच्याच आठवड्यात त्यांचे दोन विद्यार्थी रोमानियात स्पर्धेत भाग घ्यायला चालले आहेत. त्यांच्या अनेक शिष्यांनीही एशियाड, कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये यश मिळवलं आहे. “
माझा तोंडाचा वासलेला “आ” अजूनही तसाच राहिला होता.
— —
भीमाच्या ताकदीचे, पुन्हा एकदा, पार गर्वहरण झालं होतं.
(ताजा कलम : निवृत्त ज्युनियर वॉरंट ऑफिसर, श्री हेरंब चैनी, वायू सेना यांचा या मे महिन्यात (२०२६) लवकरच माननीय संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते दिल्लीला सत्कार होणार आहे.)
– लेख दुसरा
© डॉ मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






