श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “काळजी वाटते म्हणून…” ☆ श्री मंगेश मधुकर

सकाळची नऊची वेळ, रस्त्यावर बऱ्यापैकी ट्राफिक होतं. अचानक “बुंगsssबुंग”असा मोठंठा आवाज आणि कर्कश हॉर्न वाजवत एक बाईकवाला  ओव्हरटेक करून वेगानं पुढे गेला. काही वेळातच धाड….. धाड असा आवाज झाला. गाडी घसरून तोच सुसाट बाइकवाला रस्त्यावर पडलेला. हातापायाला खरचटलेलं. सुदैवानं गंभीर दुखापत नव्हती पण मुका मार बराच लागलेला. बाईकवाला थरथर कापत होता. बघ्यांची गर्दी जमली. काही विचारपूस तर काही व्हिडिओ शूटिंग करत होते. तितक्यात पन्नाशीचे एक काका पाण्याची बाटली घेऊन आले. बाईकवाल्याला उठवून बसवलं. स्वतःच्या हातानं पाणी पाजलं. बिस्किटं खायला दिली. प्रेमानं, आपुलकीनं विचारपूस करत होते.

“बरं वाटतंय का? ”काका 

“हो”

“घाबरू नकोस. काही झालेलं नाही घरी फोन कर”

“नको. मी ओकेयं. ”

“माझं ऐक. कोणाला तरी बोलावून घे. एकटा जाऊ नकोस. ”

“नको. ममी टेंशन घेईल आणि पप्पांना कळलं तर…  ”हे ऐकल्यावर काकांनी खाडकन बाईकवाल्याच्या मुस्काडात मारली. सगळ्यांनाच धक्का बसला. बाईकवाला तर बधीर.

“ओ मारताय कशाला? ”संतापलेला बाईकवाला म्हणाला.

“अजून दोन देईन”

काकांनी पुन्हा मारायला हात उचलल्यावर बाईकवाला त्यांच्या अंगावर धावून गेला तेव्हा इतरांनी मधे पडत दोघांना शांत केल्यानं पुढचा अनर्थ टळला तरी बाईकवाला संतापानं धुमसत असताना  काका एकदम रडायला लागले.

“सॉरी!! माफ कर भावनेच्या भरात तुझ्यावर हात उचलला” काकांनी हात जोडले.

“तुम्ही हाफ मॅड ये का? ”बाईकवाला.

“फुल मॅड सुद्धा म्हणू शकतोस. माझी काळजी तुला कळणार नाही. घरी फोन कर म्हटल्यावर भीती वाटली पण जीव धोक्यात घालून गाडी चालवताना काही बरं वाईट झालं तर आईबापाची काय अवस्था होईल याचा कधी विचार केलायस का? केवळ आई-वडिलांची पुण्याई म्हणून आज वाचलास. ”बाईकवाला काहीच बोलला नाही.

“गाडी सावकाश चालव असं आईबाप सांगतात ती कटकट वाटते. माझ्या मुलगा सुद्धा तुझ्यासारखाच गाडी चालवायचा. हजारदा सांगितलं पण ऐकलं नाही. शेवटी अद्दल घडली.”

“काय झालं”

“गाडी स्लिप झाली. तीन महिने झाले. दोन्ही हात प्लास्टर मध्ये घेऊन घरात बसलाय. जीव वाचला पण परीक्षा बुडाली, वर्ष वाया गेलं. वेगाच्या नादात आयुष्याचं मातेरं करून घेतलं”काकांना खूप भरून आलं.

“आजकाल शायनिंगच्या नादात जोरात गाडी चालवण्याचं प्रमाण वाढलंय. गरज नसताना जीव धोक्यात घालतात. खूप भीती वाटते. कोणी जोरात गाडी चालवताना दिसलं की काळजात धस्स होतं. मुलगा डोळ्यासमोर येतो. कधी, काय होईल याचा भरवसा नाही. गाडी सावकाश चालव आणि हेल्मेट वापर. ”

काही क्षण शांततेत गेले.

“आजपासून नीट गाडी चालवेन. ममी-पप्पांची आणि तुमचीही शपथ. ” काकांचा हात हातात घेत बाईकवाला म्हणाला 

“अजून खूप आयुष्य आहे आणि रागवू नकोस. जे केलं ते फक्त काळजीपोटी… बाकी काही नाही. ” बाईकवाल्याच्या डोक्यावरून हात फिरवून काका निघून गेले.

 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted