श्री मंगेश मधुकर
मनमंजुषेतून
☆ “वसुली अशीही…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
गेले तीन दिवस सतत पडणाऱ्या पावसाचा जोर रात्रीपासूनच वाढलेला. सलग पाऊस असूनही आश्चर्य म्हणजे अजून लाइट गेले नव्हते. सकाळी सातची वेळ, रविवार असल्यानं बाहेर जाण्याची गरज आणि इच्छा दोन्ही नव्हतं. म्हणून निवांत होतो इतक्यात दूध संपलंय, आणावं लागेल अशी शुभवार्ता सौंकडून आली. छत्री घेऊन निघालो. धुवाधार पावसामुळे जो तो आपापल्या घरात असल्यानं सोसायटीत सामसूम मात्र गेटजवळ भर पावसात रेनकोट घालून चक्क एकजण कार धुताना दिसला. ते पाहून हसायला आलं. दिवसेंदिवस लोकांच्या वागण्यातला विचित्रपणा वाढत चाललाय. कुठं, कोण, कसं वागेल याचा नेम राहिला नाही. दूध घेऊन घरी जाताना गाडी धुणं सुरूच होतं. तुफान पावसात इमानेइतबारे गाडी धुणाऱ्याजवळ गेलो. माझ्याकडे पाहत तो हसला.
“काय झालं. असं का पाहताय”
“रागावू नका. एक विचारू” मी.
“माहितीये, काय विचारणार?”
“पावसात गाडी धुणं विचित्र वाटत नाही.”
“गाडी धुण्याचे पैसे घेतो”
“इतरवेळी ठीक आहे पण जोरात पाऊस आहे तरीही?”
“नाईलाज!!”
“म्हणजे”
“पैशेवाल्यांपुढे अक्कल चालवायची नसते”
“कळलं नाही”
“रोज गाडी धुण्याचे साहेब पैसे देतात. पावसामुळे दोन दिवस गाडी धुतली नाही”
“बरोबर केलंत”
“त्यामुळे साहेब संतापले. आता दोन दिवसांचे पैसे कट करणार असं म्हणाले म्हणून भर पावसात गाडी धुतोय.”
“साहेब, फारच हुशार दिसतायेत”
“अति…” म्हणत पावसाच्या पाण्यानं भरलेली बादली भसकन गाडीवर ओतत त्यानं राग व्यक्त केला.
– – पैसे पुरेपूर वसूल करून घेण्याची वृत्ती वाढतीये.
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





