संध्या बेडेकर
मनमंजुषेतून
☆ “Kaizen…“ ☆ संध्या बेडेकर ☆
Kaizen हे जापनीज तत्व आहे.
Place for Everything. Everything in place.
आम्ही तिघी बहिणी. अगदी सख्या, म्हणजे आमचे आई वडील सेमच.
परंतु स्वभाव सवयी, आवड निवड बघून कोणाला खरं वाटणार नाही. एकाच हाताची पाची बोटं एक सारखी नसतात, असं म्हणतात ना, अगदी खरय. आई वडीलांच्या सवयी मुलांमध्ये उतरतात. तेही खरंय. कधी कधी दोन्ही घरच्या आजी आजोबांचाही मधून मधून उद्धार होत असतोच. शेवटी स्वतः चे काही गुण असतातच की.
व्यवस्थित पणा आळशीपणा. वगैरे वगैरे.
आमची ताई म्हणजे जपानी सूत्र म्हणजे
KAIZEN पाळणारी
Place for everything. Everything in Place
सतत चांगल्यासाठी घरातील सर्वांबरोबर विचार विनिमय करून बदल करणारी.
हे पाळणारी.
तिचं घर म्हणजे खूप विचारपूर्वक डिझाईन केलेले. अगदी पूर्ण आयुष्याचा विचार करून.
मुलं झाल्यावर, ती मोठी झाल्यावर, आपण म्हातारे झाल्यावर वगैरे वगैरे सर्व गोष्टी लक्षात ठेवून छान घर बांधलं. सवयींमध्ये एवढा व्यवस्थीत पणा आहे. त्यामुळे विचारांतही स्पष्टता, बोलणही स्पष्ट. कुठेही कनफ्युजन नाहीच. घर फक्त बांधलंच नाही तर ते ठेवलही व्यवस्थित. मुलं शिस्तीत वाढली, त्यामुळे तो व्यवस्थित पणा पूढे ही चालू राहिला. आजही आहेच.
तिच्या घरी तुम्ही काहीही मागा म्हणजे सुई दोरा, रबर बॅंड, एखादी इंद्रधनुष्यग, लिहायला कागद पेन, मॅचिंग कानातले म्हणजे काहीही. ती म्हणेल
अग! माझ्या आलमरीत सेकंड ड्राॅववर मध्ये उजव्या बाजूला एका झिपलाॅक बॅग मध्ये बघ. तेथेच मिळेल तुला. एवढा आत्मविश्वास असतो ताईंच्या बोलण्यात.
घरातील प्रत्येक सामानाची जागा पक्की
Place for everything. ते सामान पण तेथेच असणार. Everything in place आठवतंही सर्व, कारण वर्षानुवर्षे त्या वस्तूची तीच जागा आहे.
ताई फक्त वस्तूंचेच व्यवस्थापन छान करते अस नाही, हा विचारपूर्वक व्यवस्थित पणा तिच्या प्रत्येक क्षेत्रात दिसतो. कारण विचारांचे व्यवस्थापन परफेक्ट आहे. चांगला बदल करायला ती नेहमीच तयार असते.
त्याउलट आमची दीदी. मस्त मौला. कोणतीही गोष्ट विचारा. अग! आहे घरात, पण शोधावी लागेल. शोधली तर नक्की मिळेल.
म्हणजे अगदी सुई दोरा ते पासपोर्ट, medical report ते साखरेचा डबा. म्हणजे डबा असतो ओटयावरच पण ओट्यावर इतर वस्तूंमध्ये शोधावा लागतो एवढंच. सर्व गोष्टी शोधल्यावर च मिळतात. पासपोर्ट कुठे मिळेल सांगता येत नाही. कधी कधी शोधण्याचे कष्टही वाया जातात. Anyways पण ती आनंदी असते. मजेत जगते.
माझं आपलं अधल मधलं काम. सोनं चांदी दागिने पासपोर्ट, अगदी जागेवर. बाकी वस्तू बऱ्यापैकी जागेवर. परंतु ताई सारख माझ्या आलमरीत सेकंड ड्रावर मध्ये••• वगैरे म्हणजे एवढ्या डिटेल्स मध्ये सांगायची काही हिम्मत नाही माझी.. कधी मिळतात वस्तू, कधी नाही. वस्तू त्याच जागेवर ठेवल्या जात नाहीत म्हणून गडबड होते. एखाद्या वेळेस खूप व्यवस्थित आवरून ठेवलं तर स्वतः बद्दल छान वाटत. परंतु महिन्याभरात जैसे थे. खूप सांभाळून ठेवलेली वस्तू तर हमखास वेळेवर मिळत नाहीच. वेळेवर विकत घ्यावी लागते. उगीचच पैसे खर्च होतात. वाईट वाटत.
तसे आमच्या तिघींचे संसार मजेत चालू आहेत.
जो है, जैसा है, उसमें हम सब खुश हैं ।
ताईला भेटल्यावर प्रत्येक वेळी तिच कौतुक वाटतं. एखाद्या बाईने किती व्यवस्थित असावं?? कधीच पेटीकोट शोधावा लागत नाही. मॅचिंग नेहमी कसं काय जमतं बुआ? आश्चर्यच वाटतं. नेमकी तीच डबी कशी काय मिळते? काही शोधाशोध नाही, डब्यांची हुसकाहुसकी नाही. साडयांचा ढीग तसाच व्यवस्थीत.
तेच दीदीचे म्हणजे कुठे जायचे म्हंटले तर पसरलेल्या घरात अजून थोडा पसारा वाढतो.
माझं आपलं वेगळंच प्रकरण. ठीक ठाक. खूप व्यवस्थित तर नाहीच पण जेमतेमच. हुसकाहुसकी शोधाशोध असतेच. शेवटी दुसरच काही तरी ठरत. त्यामुळे गोंधळ असतोच.
माझ्या आणि दीदींच्या मुलांचं कौतुक म्हणजे घरी चहा पिऊन झाल्यावर तो कप तेथेच असतो, वाळतो. पण ताईकडे मात्र ही मुलं कप लगेच बेसिन मध्ये ठेवतात.
प्रत्येक वेळी मी ठरवते. स्वतः मध्ये बदल करायचा, हळूहळू मुलांनाही सवय लावायची. व्यवस्थित पणा म्हणजे वेळेवर काम करणे. वेळ वाचतो. चिडचिड कमी होते. यात फायदाच जास्त आहे. तसा उशीरच झाला आहे पण काही हरकत नाही
देर आए दुरुस्त आए।
सुबह का भूला अगर घर लौट आए तो उसे भूला नहीं कहते।
थोडा फरक नक्कीच पडेल. मुलांना पूढच्या आयुष्यात त्याचा फायदाही होईल.
आज सहा महिन्यांनंतर ताई घरी आली. माझ्यातला बदल बघून हसून शाब्बास म्हणाली.
म्हणाली,
Yes,
Kai म्हणजे बदल
आणि Zen म्हणजे चांगला.
सतत चांगले बदल घडवत रहाणे.. मग प्रगती निश्चितच होणार. वेळ नक्कीच वाचणार. मग
ते आपले घर असो, एखादी संस्था असो नाहीतर स्वतः चे व्यक्तिमत्त्व असो. प्रगती नक्की होणार.
फक्त बदल करायची मानसिक इच्छा, तयारी, आणि सातत्य पाहिजे.
© संध्या बेडेकर
वारजे, पुणे.
7507340231
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





