मंजुषा सुनीत मुळे
☆ “वाट.. ” ☆ मंजुषा सुनीत मुळे ☆
आयुष्याच्या नेमस्त वाटेवरून चालले होते मी.. मरगळलेले पाय ओढत.. गिरणीच्या पट्ट्यासारखी…
मागे काही नाही.. पुढेही काही नाही.. वाट संपणार कधी हेही ठाऊक नाही! !
इतक्यात आली एक झुळूक वाऱ्याची.. तीही एकटीच माझ्यासारखी…
सोबतीसाठी आसावले मी.. पण ती स्वतःतच हरवलेली…
साद घातली तिला.. ‘ म्हटलं मला बदलायचीये गं ही वाट.. ‘
म्हणाली ‘ खरंच गं वेडी तू.. ये माझ्या पाठोपाठ..!
अलगद धरून तिच्या पंखांना चालले मीही लहरत.. लहरत… अन् गुंगच झाली मती…
जिकडे तिकडे बेहिशोबी पसरलेल्या वाटा पाहून.. ऑक्टोपससारख्या – –
एक वाट छोटीशी.. कोवळ्या बाल पायरवांची…
दुसरी अवखळ उडत्या तरण्या पावलांची… आणि पुढे…
पुढे हा हमरस्ता.. संसारीच जसा.. दबत्या श्वासांनी.. अडखळत्या ढकलत्या पावलांनी गजबजलेला.. जणू तुरुंगाचीच वाट चालतोय…
त्याच्या अगदी शेजारीच ही एक वाट.. जत्रेतल्या चौकासारखी.. बजबजलेली, भांबावलेली, रस्ता चुकलेली
– – अज्ञानाच्या अंधारात बुडालेली…
आणि हिच्या शेजारीच.. पण विरुद्ध दिशेने धावणारी एक नेटकी डांबरी सडक.. जणू ज्ञानाचे दिवे हातात घट्ट धरून अवकाशाला गवसणी घालायला निघालेली…
इथून थोडी पलिकडे.. लपतछपत चाललेली एक वाट.. चोरपावलांची.. डोळे मिटल्याचं नाटक करणाऱ्या बोक्यासारखी.. काळोखलेली तरीही सावध आणि धीट…
आणि मध्येच ही सज्जनशी भासणारी लबाड वाट.. लक्ष्मीची पूजा करत तिच्याच भक्तांना लुबाडणारी…
… इकडे एक समांतर असा प्रशस्त राजरस्ता… “ फक्त देशप्रेमिकांसाठी “ ही आधीची पाटी केव्हाच काढून फेकून दिलेली… आणि आता बगळ्यांच्या असंख्य थव्यांनी सतत भरून वहाणारा.. राजमुकूटाकडे नजर रोखलेला…
.. या बाजूला, इतरांपासून जराशी दूरच.. अगदी एकाकी भासणारी.. विरागी संन्यस्त पावलांनी वेगळेपण जपणारी तेजस्वी वाट… पण कित्येकांना अजिबात माहितीच नाही अशी…
… पहाता पाहता माझी नजर थकली.. पण हेच समजेना की चालल्यात कुठे या इतक्या सगळ्या वाटा..
.. लांब क्षितिजाच्या पोटात गडप व्हायला?? ..
.. की सर्व नद्यांनी त्या सर्वसमावेशक सागराकडे झेपावे तशा अवकाशाच्या अज्ञात पोकळीत झेपावायला??
– – – की शोधताहेत अजूनही या वाटा आपली खरी वाट..
.. माझ्यासारख्या? .. तुमच्यासारख्या??
☆
© मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






वाट चुकलेल्या लेकरा सारखा मी ही भटकलो ,
पाऊलसगर चाचपडत आनंदलो क्षणभर.
कारण की ही वाट चालत गेली थेट माझ्या
गावच्या शिवाराकडे ,गायीच्या गोठ्याकडे …
….पुढे गोधनाचा कळप निघालेल्या क्षितीजाकडे,
सायंकालीन परतीच्या घंटानादाकडे , पसरलेल्या गो रजाने व्यापलेल्या आसमंताकडे .
खूप छान वाट आख्यान .
खूपच सुंदर ‘वाट’ मंजुषा ताई ! खूप छान लिहिता तुम्ही