डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
मनमंजुषेतून
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “हिऱ्याची अंगठी आणि मी…!!!” – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
(‘आजी तुम्हाला मुलाचा फोन नंबर माहित आहे का, पत्ता माहित आहे का? मी तुम्हाला सोडतो, ते वाट बघत असतील तुमची. ‘
‘मला समदं म्हाईत हाय बाळा, पन वाट चुकलेल्याची बघत्यात, सोडून दिलेल्याची न्हायी. माजी वाट बघणारं आता तिथं कुणी न्हायी’ तिने डोळ्याला पदर लावला.)
इथून पुढे – –
निरक्षर आजीने एकाच वाक्यात जीवनाचं कटू सत्य सांगितलं…. *वाट चुकलेल्याची बघत्यात, सोडून दिलेल्याची न्हायी… * माझ्या अंगावर काटा आला.
‘प्रतिष्ठित लोक सुद्धा असे वागतात, खरंच पटत नाही’ मी स्वतःशी पुटपुटलो आजीला ते ऐकू गेलं असावं. ती म्हणाली, ‘बाळा आपल्याकडून दुसऱ्याला काय हवं आसलं, तर दुसरी लोकं आपल्याला किंमत देत्यात, बसाय जागा देत्यात, तूच लय मोठा… तूच लय मोठा म्हून तोंडावर बोलत्यात, त्येला उगंचच झाडावर चढवत्यात… त्येला म्हणत्यात पर्तीशटा….!
‘पर्तीशटा देणाऱ्याला कायतर पायजे आसतं म्हणून त्यो दुसऱ्याला पर्तीशटा देतो…. आन ह्येला वाटतं मी लय परतीष्टीत झालो…! संस्कार महत्त्वाचे बाळा… चरित्र महत्त्वाचं…. पर्तीशटा न्हाय… आपल्याकडचं काई द्यायचं संपलं की लोकं आपल्याला बी पर्तीशटा द्यायची कमी करत्यात, न्हवं देतच न्हायित.. आरं हाड.. आसली पर्तीशटा काय कामाची…? त्या परास संस्कार आनी चरित्र महत्वाचं…
संस्कार आणि चरित्र असं मागून मिळत न्ह्याई रं, ते कमवावं लागतं, आन त्येच कायम राहतं… आशा मानसाला खोट्या पर्तीशटेची गरज नसती, त्यान्ला आपोआप आदर मिळतू…. आपुन गेल्यावर पर्तीशटा बी आपल्या संग जळून जाती… संस्कार आन चरित्र मात्र आपुन गेल्यावर बी हित्तच राहत्यात.. ‘ हित्तच, म्हणताना तिने उकिरड्यावर तीन-चार वेळा हात मारला…
मी आ वासून आजीकडे पाहत राहिलो. ‘आजी कुठे शिकलीस एवढं? शाळेत जाऊन आम्ही फक्त गणित, भूगोल, शास्त्र, इतिहास शिकत असतो. या गोष्टी आम्हाला कोणीच कधी शिकवल्या नाहीत, तू कुठे शिकलीस….? ‘
ती बोलली काहीच नाही, एका बोटाने तिने रस्ता, माणसं आणि उकिरडा दाखवला… परिस्थिती सर्व शिकवते बाळा हेच तिला म्हणायचं असावं.. ती पुढे म्हणाली, ‘कंच्याच साळंत आणि वर्गात चारित्र्य म्हंजी काय, मानूसकी म्हंजी काय ते शिकवीत न्हायित, फुडं जावून मोटा झाला कि मानसाचं वागणं – बोलणं आयीकलं कि समजतंय, आत्ता त्यो कंच्या वर्गात आन यत्तेत (ईयत्तेत) हाय….! ‘
सरस्वतीच्या रूपात एखाद्या आजीनं समोर यावं आणि आयुष्याचं तत्त्वज्ञान शिकवावं असं मला वाटायला लागलं. समोर सरस्वतीच बसलीये तर काहीतरी जाणून घ्यावं, म्हणून मी तिला विचारलं, ‘आजी संस्कार म्हणजे नेमकं काय…?
येडा का खुळा? या नजरेने तिने मला पाहून सांगितलं, ‘तू रोज आंगुळ करतो म्हणजे शरीराची सुद्धी करतो, रोज घर आणि अंगण झाडतो म्हणजे घराची आणि अंगणाची सुद्धी करतो, खरकटी भांडी घासतो म्हणजे भांड्याची सुद्धी करतो, जे नको हाय ते टाकून देनं, आन जे चांगलं हाय ते मनात ठेवनं, म्हंजे संस्कार….! ‘
संस्काराची याहून सोपी व्याख्या कुठली असेल….?
*’मनात संस्कार आनि वागन्यात मानूसकी ठिवली तर चरित्र आपोआप घडतंय बग’* उकिरड्या वरची हातात आलेली काडी घेऊन काहीतरी रेघोट्या मारत ती हे वाक्य बोलून गेली.
आजीच्या समोर उकिरड्यावर बसून मी संपूर्ण ब्रह्मांड पहात असल्याचा भास झाला..!
‘तू कंच्या साळंत जातूस? ‘ मला तीने सहज प्रश्न विचारला.
खरंच या शब्दांनी मला लाज वाटली… आयुष्यभर काय शिकलो होतो आणि आज तिने अर्ध्या तासात काय शिकवले… मला खरंच माझी लाज वाटली! तीला समजणार नाही अशा पद्धतीने गळ्यातला स्टेथोस्कोप दुसरीकडे लपवत, खाली मान घालून मी तिला म्हणालो, ‘आजी मी कंच्याच साळंत जात न्हायी…! ‘
तीने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली ‘घोड्या एवढा घोडा झालास तरी अजून कंच्याच साळंत जात न्हायीस… ‘ आत्ता प्रथमच तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमध्ये हास्य पसरलं होतं.. मी सुद्धा केविलवाणा हसतो आणि उत्तर देतो ‘न्हायी मी कंच्याच साळत जात न्हायी’ हे आणखी खाली मान घालून बोललो आणि विषय बदलतो…
‘आपण पोलिसात जाऊन तुझ्या मुलाविरुद्ध तक्रार देऊया का? पोलीस बरोब्बर त्यांच्या भाषेत तुझ्या मुलाला सांगतील तुला सांभाळायला’ मी म्हणालो.
‘ती घाबरली, चेहऱ्यावरचं हास्य जावून सर्व सुरकुत्यांमध्ये भीती पसरली… ‘नको… नको… पोलीस मारत्याल त्याला, मी अजून चार बोटं न्हाई लावली माज्या लेकाला. त्याला बी तीन लेकरं हायत… बापाला मारताना बघून त्यान्ला कसं वाटल? ‘
पोलीस केस नको म्हणून आजीने माझे पाय धरले. पुन्हा शांत होऊन म्हणाली, ‘पोलिसांच्या भीतीने जरी त्यानं मला घरी न्हेली तरी तो प्रेमानं वागल का माज्याशी? बाळा मला भुकेला “घास” नको प्रेमाचा *भास* पायजे. भीतीनं आनि मारून मुटकून आई सांबाळण्यापेक्षा ती उकिरड्यावरच राहिलेली बरी…
माझा नाईलाज झाला.. एखाद्या वृद्धाश्रमात तीची सोय करायची म्हणून मी फटाफट फोन लावले, खूप वेळानंतर एका ठिकाणी सोय झाली, मी रिक्षा बोलावली. मी हाताला धरून तिला उठवत होतो, तिच्या अंगात त्राण नव्हते, त्यातूनही ती कण्हत म्हणाली, ‘तू जेवलास का रं सोन्या, जेवत जा बाळा टायमावर… ‘
इतका वेळ दाबून धरलेले अश्रू आता मात्र सावरू शकलो नाही. स्वतः दहा दिवस उपाशी राहून दुसऱ्या लेकराच्या भुकेची काळजी करणारी ही माऊली….! तिला आश्रमात सोडले, रिक्षातून उतरताना आभाळाकडे पहात हात जोडून खूप वेळ ती काहीतरी पुटपुटत होती.
मी हसत म्हणालो ‘आजी हा माझ्या मित्राचा वृद्धाश्रम आहे, तुला काहीही काळजी करायची कारण नाही. अध्ये मध्ये मी तुला भेटायला येथे येत जाईन, तुला कशाचीही कमी येथे पडणार नाही. देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल बरं… ‘ मी पुन्हा हसत बोललो.
ती म्हणाली, ‘माजी मेली कसली आली विच्छा? आता माझ्या पोराला, सुनेला आणि नातवंडांना सुखाचं आयुष्य दे इतकंच शेवटचं मागितलं.. त्यो तर काय हितं भेटायला येणार नाही. ‘
ज्याने घराबाहेर काढून दिलं, त्याच्याच सुखाची अपेक्षा धरते, आईनं आज पुन्हा तीचं मातृत्व सिद्ध केलं…! तीने पदराने डोळे पुसले, यानंतर डोक्यावरचा पदर सावरत तीने माझे दोन्ही हात हातात घेतले, ते कपाळाला लावले, ‘कोण कुठला रं बाळा तू.. तुज नाव पण मला म्हाईत न्हाई… तू इतकी माजी येवस्ता केलीस… सुकी ऱ्हा माज्या राजा’ म्हणत ती आश्रमाकडे चालू लागली. आश्रमातला कार्यकर्ता तिला हाताला धरून आश्रमाकडे घेऊन जात होता. मी त्या माऊलीला पाठमोरी पहात हात जोडले. जाताना आजी त्याला सांगत होती, ‘चल बाबा, जगण्याचा “सोहळा” संपला आता मेल्यावर “कावळा” यायची वाट पाहायची..!!! ‘
मी काय बोलू??? उरल्या सुरल्या अश्रूंनी माझा शर्ट भरून गेला… अशा अब्जावधी रुपयांच्या अंगठ्या आणि सोन्याची नाणी मला रस्त्याकडेला तळमळत, उकिरड्यावर आणि गटाराशेजारी सापडतात. कशातही किंमत होणार नाही, अशा या सापडलेल्या हिऱ्यांच्या अंगठ्या आणि सोन्याची नाणी मी मनातल्या मनात म्युझियम करून जतन करून ठेवतो, आणि वेळ मिळेल तेव्हा त्याला शब्दरूप देतो. या अंगठ्यांना, ना वजन, ना आकारमान, ना रुपयातली किंमत.. तरीही त्या आहेत मौल्यवान आणि मूल्यवान…!
आता तुम्हीच सांगा माउली, ज्याला खूप वस्तुमान, आकारमान आणि वजन आहे असे शिव्या शाप, तिरस्कार मी सांभाळत बसू?? कि या मौल्यवान आणि मूल्यवान गोष्टींचं जतन, करू….??? मला मिळालेल्या शिव्या शापांबद्दल लिहू, सुरे लावणाऱ्या लोकांबद्दल लिहू, कि तोंडावर थुंकलेल्या आणि चप्पल फेकणाऱ्या लोकांबद्दल लिहू….??? कि इतिहासात कधीही नोंद न होणाऱ्या माणुसकीचं दर्शन घडवू…?
दिवसभरात मला मिळालेले 99 अपमान तिरस्कार मी रोज गाडून टाकतो जाळून टाकतो… आणि रोज नव्या दमानं उठून, उकिरडे, रस्त्याकडेची गटारे, अस्ताव्यस्त पसरलेले फुटपाथ, सुलभ शौचालयाच्या मागील बाजू मी हुंगत असतो, एखाद्या कुत्र्यासारखा….! न जाणो लोकांनी फेकलेल्या अशा मौल्यवान अंगठ्या आणि सोन्याची नाणी मला सापडतील आणि “माणूस” म्हणून मी सुद्धा कधीतरी “श्रीमंत” होऊन जाईन….!!!
– समाप्त –
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : abhisoham17@gmail.com,
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






खूप उत्तुंग व्यक्तिमत्त्व 🙏🙏