डॉ. नेहा भटकर
मनमंजुषेतून
☆ लंडन ब्रिज… ☆ डॉ. नेहा भटकर ☆
गोष्ट तशी लहानशीच, अगदी ध्यानीमनी नसताना कित्येक वर्षात पूर्णपणे विस्मरणात गेलेला, माझ्या लहानपणीचा म्हणजे ६० ते ७० च्या दशकातला एक खेळ, परवा मला माझ्या लहानग्या नाती सोबत खेळताना आठवला. त्याचं झालं असं की टीव्हीवर सुरू असलेलं “लंडन ब्रीज इज फालिंग डाऊन” हे बालगीत नाती सोबत एन्जॉय करत असतांना डोक्यात तार लकाकली अन् ध्यानी आलं की, आपण लहानपणी असंच काहीसं गाता गाता खेळायचो. आणि हो, हळूहळू मला तो खेळ व त्यासोबतच्या गाण्याची अगदी लख्ख आठवण झाली. कित्येक वर्षांनंतर ते गाणं कानी पडल्यामुळे खूप आनंद झाला परंतु आनंदाचं मुख्य कारण हे होतं की मला त्या गाण्यातील शब्द नेमकेपणाने काय आहेत हे कळलं. मला आजही आठवतं, लहानपणी त्या गाण्यातील कितीतरी शब्द आम्ही गाण्याच्या विशिष्ट चालीवर अगदी बिनधास्तपणे चुकीच्या पद्धतीने म्हणायचो व त्या गाण्याची पार वाट लावायचो (हे आमचा इंग्रजी सोबत परिचय झाल्यानंतर कळले). त्याला कारणही तसंच होतं म्हणा कारण बरीचशी गाणी मुखोद्गत पद्धतीने एका व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाकडून दुसऱ्या व्यक्ती वा समूहाकडे संक्रमित होत असताना शब्दांचे अपभ्रंश होत होत एक वेळ अशी येते की मूळ शब्दांचा थांगपत्ता लागणं फार अवघड होऊन जातं. असंच काहीसं या लंडन ब्रीज इज फॉलींग डाऊन किंवा माय फेअर लेडी या खेळामध्ये गायल्या जाणाऱ्या गाण्याचंही आमच्या बाबतीत झालंय; हे अगदी उघड होतं. आता तर ते शब्द तितकेसे स्पष्टपणे आठवतही नाहीत कारण ते त्या गाण्यातलेच काय पण तसेही खरेखूरे अर्थपूर्ण शब्द नव्हतेच मुळी. पुढे मोठेपणी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आणि भूमिका निभावताना निरनिराळ्या कामांच्या भाऊगर्दीमध्ये संपूर्णपणे विसरलेल्या अथवा कुठेतरी खूप लांबवर मागे सुटलेल्या खेळाची अशी आठवण झाली. पुन्हा एकदा त्या काळात रमायला मिळालं. आणखी एक महत्त्वाचं कारण असं की, कुतुहल चाळवलं आणि डोक्यात किडा वळवायला लागला आणि मी गुगलला हाताशी घेतले. गुगलनेही आपली भूमिका इमानेइतबारे पार पाडली. आज दुनिया मेरी मुठ्ठी मे असं आपल्या सर्वांना म्हणायला लावणाऱ्या गुगलबाबाच्या गुहेमध्ये मला हे गाणं व त्यासोबतचा खेळ आणि गाण्यामध्ये वारंवार उल्लेख होणाऱ्या लंडन ब्रीज बद्दलही आणखीन काही जाणून घेण्याचा योग आला. या तिनही बाबींची (गाणं, गाण्यातील लंडन ब्रीज आणि त्यासोबतचा खेळ) खरोखरीच अत्यंत मनोरंजक माहिती वेचता वेचता अगदी पार मागे बाराव्या शतकातील इंग्लंड पर्यंत कधी पोहोचले हे कळले सुद्धा नाही.
लंडन ब्रीज हा इंग्लंडमधील लंडन आणि साऊधक (Southwark) या दोन शहरांना जोडणारा थेम्स नदीवरील पूल. थेंम्स नदीवर रोमन काळात या दोन शहरांना जोडणारे बाराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत बरेच लाकडी ब्रीज होते. त्या सर्वांना लंडन ब्रीजच म्हणायचे परंतु या सर्वपरिचित बालगीतातील लंडन ब्रीज हा यापैकी कुठलाही लाकडी ब्रीज नव्हे. या बालगीतातील लंडन ब्रीज हा खरोखरीच बऱ्याच दुरुस्त्या वा प्रसंगी अगदी पुन्हा नव्याने देखील बांधलेला असून, लंडनच्या थेम्स नदीवर आजही आपलं ऐतिहासिक महत्त्व जपत संपूर्ण कार्यक्षमतेसह संपूर्ण लंडन निवासी आणि अगणित पर्यटक यांच्या सेवेत जवळपास दोन हजार वर्षांपासून ते आजतागायत दिमाखाने उभा आहे.
“लंडन ब्रीज इज फालिंग डाउन… ”, शेकडो वर्षे मागे, कुण्या अनामिक कवीने १७ व्या शतकात किंवा त्याही आधीच रचलेलं हे बालगीत; मात्र ते पहिल्यांदा १८ व्या शतकाच्या मध्यात कवी टॉमी थंब यांच्या बालगीतांच्या पुस्तकामध्ये प्रसिद्ध झालं आणि हळूहळू जगभरातील इंग्रजी जाणणाऱ्या बहुतांश भागांमध्ये पोहोचलं. तसं नाही म्हणायला या गाण्याचीही स्थलकालपरत्वे बरीच वेगवेगळी शब्दरूपं बघायला मिळतात; मात्र “लंडन ब्रीज इज फालिंग डाऊन” ही ओळ सर्वत्र सारखीच आहे. थेम्स नदीवरील लंडन ब्रीजच्या वेळोवेळी होणाऱ्या दुरुस्त्या ध्यानात घेता कवीला सुचलेलं हे बालगीत असावं असा एक मतप्रवाह आहे. या बालगीताच्या जन्माच्या आधीही आणि नंतरही लंडन ब्रीजने स्वतःच्या रूपामध्ये व सोबतच आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये झालेली अनेक स्थित्यंतरे अनुभवलेली आहेत. इ. स. १२०९ मध्ये कोलचर्चमधील धर्मगुरू आणि आर्किटेक्ट असलेले पीटर यांनी प्रथमतः दगडांचा वापर करून बांधलेला थेम्स नदीवरील अठरा टोकदार कमानी असलेला हा देखणा लंडन ब्रीज. त्याने रहदारीची सोय तर झालीच, पण एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र आणि लंडनच्या वैभवात आणि सौंदर्यात भर टाकणारं वास्तुशिल्प म्हणून सुद्धा तो नावारूपास आला. त्याच्या अरुंद कमानी खालून नदीपात्रातून बोटी पळवताना खलाशांना एक थरारक अनुभव येत असे. हा संपूर्ण इंग्लंडमधीलच पहिलावहिला दगडी लंडन ब्रीज इ. स. १२०९ पासून ते १८३२ पर्यंत एकंदरीत ६२२ वर्षे इतक्या प्रदीर्घ काळ सेवेत होता. या लांबलचक कालखंडामध्ये दोनदा तो आगीच्या भक्ष्यस्थानी पडला तर कधी प्रचंड हिमवर्षावाने देखील खचला तर अशी कित्येकदा त्याची पडझड झाली. कित्येक दुरुस्त्या नी डागडूज्यांना सामोरा गेला. नेमक्या याच ब्रीजला अनुसरून कवीने हे बालगीत रचलयं. कोणे एकेकाळी लंडनची शान असलेला तसेच या जगप्रसिद्ध बालगीताने अजरामर केलेला पण कालांतराने क्षीण झालेला, शिकस्त अवस्थेतील लंडन ब्रीज इसवी सन १८३२ मध्ये नष्ट करण्यात आला. मात्र तो जमीनदोस्त करण्यापूर्वीच ई. स. १८३० मध्ये जॉन रेनी नावाच्या स्कॉटिश इंजिनिअरच्या कल्पनेतून साकारलेल्या आराखड्यानुसार अधिक मजबुत परंतु दगडांच्याच पाच रूंद कमानी असलेला लंडन ब्रीज बांधून तयार होता. दोन्ही जागतिक महायुद्धांची झळ सोसलेला हा रेनीचा लंडन ब्रीज, सातत्याने १४० वर्षे सेवा देऊन कमकुवत झाला. पुढे बेसुमार वाढणाऱ्या जल आणि रस्ते वाहतुकीचा रेटा लक्षात घेता, अपुऱ्या भासणार्या या ब्रीजला सुद्धा मोडीत काढून पर्यायी ब्रीज बांधण्याची कल्पना समोर आली. १९६८ ते १९७२ या कालावधीमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानानुसार संपूर्णपणे काँक्रीट आणि लोखंडाचा वापर करून नव्याने बांधूनही झाला आणि त्याचे उद्घाटनही इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ द्वितिय आणि राजे एडवर्ड यांच्या हस्ते १६ मार्च १९७३ रोजी संपन्न झाले. लंडनच्या थेम्स नदीवरील लंडन ब्रीज म्हणून तो आजही प्रशस्त आणि भक्कमपणे उभा आहे. गोष्ट इतकी साधी सरळ असेल तर ते इंग्लंड कसले. इथेच एका रंजक प्रवासाची सुरुवात होतेय. त्याचं झालं असं की अपुऱ्या पडणाऱ्या रेनींच्या लंडन ब्रीजला पाडण्यापूर्वी, त्याला लंडन शहराच्या शासकीय यंत्रणेने लिलावात विकायला काढला आणि आश्चर्य म्हणजे तो अमेरिकेतील ॲरिझोना प्रांतातील रॉबर्ट मॅक कुल्लोक नावाच्या व्यापाऱ्याने १९६८ मध्ये विकतही घेतला. गोष्ट येथे थांबत नाही तर त्या ब्रीजच्या दर्शनी भागात लागलेला एकेक ग्रॅनाईटचा तुकडा (ब्लॉक) अगदी काळजीपूर्वक सुटा केला, प्रत्येक तुकड्याला अनुक्रमांक दिला. ते संपूर्ण संख्येने दहा हजाराचे वर असलेले ग्रॅनाईटचे तुकडे समुद्रमार्गे, अटलांटिक महासागर, जगप्रसिद्ध पनामा कालव्यातून व पुढे प्रशांत महासागर असा मैलोनमैल लांबचा पल्ला पार करत अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातील बंदरात वाहून नेले. येथून पुढे ग्रॅनाईट ब्लॉकची मध्य अमेरिकेतील ॲरिझोना प्रांतापर्यंतची यात्रा भू मार्गाने व्हावयाची होती. रॉबर्ट मॅक कुल्लोक या व्यापारी महाशयांनी आधीच १९६४ मध्ये अमेरिकेतील ॲरिझोना प्रांतामध्ये लेक हवासू सिटी नावाची वसाहत वसवली होती. तेथील हवासू सरोवरावर इंग्लंडहून विकत आणलेल्या या लंडन ब्रीजच्या ग्रॅनाईटच्या तुकड्यांचा अगदी नेमक्या क्रमवारीने अगदी जसाच्या तसा वापर करीत नवीन लंडन ब्रीज अर्थात न्यू लंडन ब्रीज उभारून १० ऑक्टोबर १९७१ रोजी रहदारीसाठी खुला करण्यात आला. जगभरातील पर्यटकांना अमेरिकेतील ॲरिझोना प्रांतातील लेक हवासू सिटी मधील कोलॅराडो नदीच्या हवासू सरोवरावरील हा वैशिष्ट्यपूर्ण न्यू लंडन ब्रीज, त्याच्या निर्मितीच्या मागे असलेल्या अनोख्या कथेमुळे, फार मोठ्या संख्येने आजही आकर्षित करतोय, त्यात नवल ते काय?
लहानपणीचा लंडन ब्रीज इज फालिंग डाऊन… , हा खेळ कदाचित कोणाला आठवत असेल किंवा नसेलही परंतु गंमत अशी की जेव्हा मी आंतरजालावरील वेगवेगळ्या संकेतस्थळांवर जाऊन बघितलं तर काय आश्चर्य, जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणी अगदी आम्ही लहानपणी ज्या पद्धतीने खेळायचो अगदी तसल्याच प्रकारे खेळल्या जातोय; याची सचित्र माहिती वाचताना फार मजा वाटली. दोन मुलींनी समोरासमोर उभे राहून एकमेकींच्या हाताची बोटे एकमेकांमध्ये फसवून म्हणजेच चिक्की करून हात वर न्यायचे जेणेकरून त्यांची एक कमान होईल जी की जणू काही थेम्स नदीवरील सुप्रसिद्ध लंडन ब्रीजचीच कमान आहे असे मानायचे. हाताच्या कमानीचा ब्रीज बनवणाऱ्या दोघींनी लंडन ब्रीज इज फॉलींग डाऊन फालींग डाऊन माय फेयर लेडी… हे गाणं गायचं आणि त्याचवेळी खेळात सामील इतर सवंगडी कमानी खालून ओळीने एक एक करून जात असताना हळूहळू ती कमान खाली खाली घेत राहायची. कमानी खालून जाणारा एक एक गडी, संपूर्ण खाली आलेल्या हातांच्या ब्रीजमध्ये अडकवला जायचा. अडकवलेल्या गड्याला दोघींपैकी कोणाच्या बाजूला जायचे आहे, ते विचारायचे. इथे त्या दोघींना काल्पनिक नावे दिलेली असत. अशा तऱ्हेने संपूर्ण गडी दोघींमध्ये विभागल्यानंतर त्यांच्या शक्ती प्रदर्शनाचा खेळ सुरू व्हायचा. असा तो खेळ, उत्कंठावर्धक आणि तितकाच शक्तिवर्धक देखील. गाणं गाता गाता खेळताना केलेली धमाल मस्ती आणि प्रचंड हल्लागुल्ल्यासोबत आम्ही संपूर्ण वेटाळ अगदी डोक्यावर घेतलेल्या कितीतरी संध्याकाळी आज आठवतांना भारीच मौज वाटतेय. हे वेगळे सांगणे न लगे. या आठवणींच्या गुंताळ्यामध्ये मी रममाण झालेली असतांना लहानग्या नातीने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली “आजी तूला परत परत हेच गाणं का बरं ऐकायचं आहे ग, आता दुसरं काहीतरी नवीन खेळू या का आपण” आणि मी लंडन ब्रीज इज फॉलींग डाऊन, फॉलींग डाऊन, माय फेअर लेडी…. च्या आठवणीतून बाहेर आले.
┉❀꧁꧂❀┉
© डॉ. नेहा विनोद भटकर
अमरावती
मो ९९७५०३०६२७
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






बालपणी चे एक गाणे काय आठवले व लेखिकेने लंडन ब्रीज संबंधिचे अनेक बारकाव्यांनी तो सजवून टाकला.
बरीच माहिती मिळाली.त्याच नावाने तो अमेरिकेत ही गेला .त्याचा हा प्रवास अनेक अंगांनी लक्षवेधी वाटला.
काय लिहावं हे सूचत नाही पण हे वर्णन आगळं वेगळं वाटलं हे निश्चित.
खूप खूप धन्यवाद आपल्या इतक्या सुंदर अभिप्रायासाठी.