संध्या बेडेकर
मनमंजुषेतून
☆ “ठेचा खाल्ल्याशिवाय मज्जाच नाही..“ ☆ संध्या बेडेकर ☆
“जेवणात आणि जीवनात ठेचा खाल्ल्याशिवाय मज्जाच येत नाही. ”
आज माझ्याकडे सत्यनारायण पूजा आहे. माझ्या सासरचे सर्व येणार आहेत. ताई भाऊजी, माझा भाऊ वहिनी सर्वांना आमंत्रण आहे. सासर माहेर दोन्ही घरचे एकत्र येणार, म्हणजे थोडं टेंशन असतंच मला. सर्वजण मिळून एकंदर पंधरा जण तरी सहज होतातच.
आता माझ्याही लग्नाला तीस वर्ष झालेच. जावई आलाय. सून आणायची तयारी सुरू केली आहे. सांगायचा उद्देश्य हा की माझा पण ‘ Work Experience ‘ भरपूर आहे.
त्याप्रमाणे मी सर्व व्यवस्थित केलं. अगदी छान मराठी स्वयंपाक तयार झाला.
बटाटा भाजी, आळुचे फदफद, खमंग काकडी, चटणी, भजी, कढी, वरण भात, पापड कुरडया, प्रसादाचा शिरा होताच. तरी पुरणपोळ्याही होत्या.
पंधरा वीस जण जेवणार, म्हणजे तीस पस्तीस पुरणपोळ्या सहज लागतील, तेंव्हा सर्वांना गरम पोळी वाढणे शक्यच नाही. माझ्या अनुभवावरून मी हे शिकले होते. म्हणून पंचवीस पोळ्या मी करून ठेवल्या व बाकी वेळेवर गरम करू असं ठरवलं. कोणाला पोळी मिळालीच नाही, असं व्हायला नको. आपण सर्वांना आमंत्रण दिलं आहे. तर सर्वांचा मान राखणे, हेही आपलेच काम आहे. सासर माहेर एकत्र असणार म्हणजे सर्वच महत्वाचे. बरे असो,
मी खूप खुश होते. सर्व वेळेवर, व्यवस्थित काम झाले. पूजा पण गुरुजींनी छान शांतपणे सांगितली.
ताट वाट्या भांडी चमचे सर्व रेडी. प्रत्येक लहान सहान गोष्टींवर लक्ष देऊन मी जय्यत तयारी केली. कालपासूनच कामाला लागले होते, म्हणून सर्व व्यवस्थित वेळेवर झाले. आपल्या घरी कधीतरीच सर्व एकत्र येणार, तेंव्हा व्यवस्थित करायलाच हवं.
ताई भाऊजी आले. ताई लगेच म्हणालीच, काही करायचे आहे का ग??
मी म्हंटल, अग नाही.
Everything is ready.
थोड्याच वेळात नेहा वन्स आल्या.
म्हणाल्या
अग!! काही करायचे आहे का??
एवढा घाट घातलाय. मला काळजीच वाटत होती. जमेल का तुला म्हणून??
अग! ! मागच्या वेळेस तू भाजीत मीठ घालायला विसरली होतीस. यावेळेस सर्व ठीक ना. बघ बाई. एकदा बघून घे, नाही तर वेळेवर फजीती व्हायची.. असं म्हणून त्यांनी सर्व चेक केलं. म्हणजे बघूनच, बरं तर दिसतय. असा रिमार्क ही दिला.
अशाप्रकारे सर्वांसमोर माझ्या परफोरम्नस चे प्रगती पुस्तक वाचल्या गेले.. बरोबर आहे एकदा भाजीत मीठ घालायचे राहून गेले होते. ही काय खुप मोठी चूक झाली का?? कोणाकडून असं कधीच होत नाही का??
नेहा वन्सची कधी काही चूक झालीच नसेल का?? जास्त प्रयत्न न करता मीच त्यांची दहा पंधरा उदाहरण सहज देऊ शकते.
“हे असं वागणं ” मला कधी कळलंच नाही. या अशा स्वभावाचे काय कारण असावे?? घरचे मोठे आधार देतात. परिस्थितीला सांभाळतात. चारचौघात असं बोलत नाही. सर्वांसमोर तर नक्कीच नाही. या अशा वागण्याचे मला कमी मार्क्स पडले की त्यांना?? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.
हे नेहमीचेच आहे. मला आता विशेष फरक पडत नाही. सवय झाली आहे. असं काही झाल नाही, तरच आश्चर्य वाटत. एका कानाने ऐकायचे आणि दुसऱ्या कानाने सोडायचे. समोरचा बदलत नाही. आपणच बदलायचे. उलट उत्तर द्यायचे नाही. एवढं फक्त लक्षात ठेवायचे. हा नियम पाळायचा एवढं नक्की.
काय करणार??
नज़र का ऑपरेशन किया जा सकता हैं। नजरिये का नहीं ।
तेथे उपस्थित असलेल्या मंडळीला नक्की काय?? ते कळत. सर्वांना बघता येत. ऐकता येत. ‘ता’ वरून ‘ताकभात’ ओळखणारे हे जेष्ठ हुशार आहेत. सर्व समजत त्यांना.
अगदी मोठ्या महत्वाच्या प्रसंगी / कार्यक्रमात पण एखादी चूक होताना आपण बघतोच. अगदी एखादे मंत्री भाषण द्यायला उभे राहतात, आणि माईकच काम करत नाही. आधीपासून चेक केल्यावरही असं होऊ शकतं. अशा वेळी हे ज्याला समजत तो बाऊ करत नाही. समोरच्याला समजून घेतल तर रंगाचा बेरंग होत नाही. वातावरण खराब होत नाहीं. बरे असो,
“चला वाढायला घेऊया.”मी म्हंटल,
सर्वांची जेवण झाली. सर्वांनी आपापल्या परीने जेवणाचे, पुरणपोळ्यांचे कौतुक केले. सर्वांना गरम पोळी पण मिळाली.
चला म्हणजे “गंगेत घोडं न्हायल म्हणायचं” मी हळूच ताईच्या कानात म्हंटल.
ताई म्हणाली,
अग! ! असे लोक असतात, जे नेहमी काही तरी बोलून तुमचा आत्मविश्वास कमी करतात. त्यांचा स्वतः बद्दल (गैर) समज असतो की
“I am the Best. ” त्यांच सर्व Perfect असत. अशा लोकांशी बोलण्यात काहीच फायदा नसतो. त्यांना त्यांच्या अहंकारात जगू द्यावे.
एक गोष्ट नक्की की तू तुझ्या घरी आहेस ना मग,
You are the ‘ BOSS’ of your house.
ताई म्हणाली,
”जेवणात आणि जीवनात ठेचा खाल्ल्याशिवाय मज्जाच येत नाही ग. ” चालायचंच.
“अग ताई! ! हे नेहमीचेच झाले आहे. आधी तर मुद्दाम यांच्या समोर मला काय येत नाही?? माझं कुठे कुठे चुकतं?? याची चर्चा व्हायची. तेंव्हा मात्र मी स्टँड घेतला होता. तेंव्हा मी ठासून यांना सांगितले की ” हे मला चालणार नाही. माझ्या संसारात दुसऱ्यांची लुडबुड मला चालणार नाही. ” मी ‘मी ‘ आहे. आणि मी दुसऱ्यांसारख कसं वागू शकते??? ” यांनी मात्र नेहमीच मला साथ दिली.
माझं मत असं आहे की,
आयुष्य दुसऱ्याच्या धाकात नाही, स्वतः च्या थाटात जगायचे असते.
काही जण परिस्थिती सांभाळतात, चूक न व्हावी त्याकरिता आधीच मार्गदर्शन करतात, चूक झालीच तर मोठ्या मनाने परिस्थिती सांभाळतात. आणि काही तूमची चूक व्हावी याची वाट बघतात. सर्वांसमोर त्यावर चर्चा करतात.
म्हणतात ना. ,
“स्पर्धक आणि निंदक दोन्ही प्रकारचे लोक आजूबाजूला असले तर बरं असतं. आपल्यात आपोआपच ‘perfection’ येत. जिद्द निर्माण होते. “
जेंव्हा माझ्या लक्षात आले की कोणाच्याही कमेन्ट्स ने / बोलण्याने अस्वस्थ होण्याचे मुख्य कारण माझी कमजोर मानसिकता आहे. मी मनाला लावून घेते आणि मला त्रास होतो. तेंव्हा मी स्वतः ला मजबूत केले. दुर्लक्ष करणे सुरू केले. त्यांचे महत्व आपल्या आयुष्यात कमी केले की आपल्या जीवाला त्रास होत नाही. आता आपलीच माणसं ती, तेंव्हा, संबंध तोडणे पण बरे नाही.
म्हणतात ना,
बात को छोड़ना होता है। और हाथ को पकड़े रखना होता है।
© संध्या बेडेकर
वारजे, पुणे.
7507340231
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





