संध्या बेडेकर
मनमंजुषेतून
☆ “जगण्याचा दर्जा..“ ☆ संध्या बेडेकर ☆
” जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर अवलंबून असतो, परिस्थिती वर नाही. “
काल ताई कडे गणपती विसर्जन होते. म्हणून आम्ही पोचलो. आरती, त्यानंतर प्रसाद. नंतर ची आवाराआवर असतेच.
आठवडा खूप मजेत जातो. अगदी वेगळ्या विश्वातच असतात सर्व. आनंदी वातावरण असते. खाण्यापिण्याची रेलचेल असते. बाप्पा घरात विराजमान, म्हणजे दैनंदिन जीवनात, विचारांत थोडा बदलही होतोच. थोडे दिवस का होईना पण एका वेगळ्याच उर्जेचा संचार असतो. नंतर पुन्हा जैसे थे । बरे असो,
गणपती विसर्जनानंतर भाऊजीं चे पाच सहा मित्र आपल्या पत्नीसह, येथे ताई कडे एकत्र होतात. हा दरवर्षीचाच कार्यक्रम आहे. एकत्र होण्याचे एक कारण तर बाप्पाचे विसर्जन झाल्यामुळे घरात करमत नाही. सर्व आपापल्या घरचा प्रसाद व इतर पदार्थ घेऊन येतात. व दुसरे मुख्य कारण म्हणजे ताईच्या हातचे उकडीचे मोदक सर्वांना खायचेच असतात.
आज ही सर्व आलेच. सगळे आजी आजोबा मस्त ‘ festive dress ‘ म्हणजे आजोबा छान कुर्ता पायजमा मधे व आज्या जरीच्या साड्यांमध्ये खरंच खूप छान दिसतात. त्यांच्या गप्पा ऐकल्यावर तर त्यांच्या आयुष्याची कल्पनाही येते. त्यांचे वागणे बोलणे बघून ज्येष्ठत्व कसं जगावं??? हे कळत. वयामानाप्रमाणे विचारांत व वागण्यात ‘ ठहराव ‘ तर आला पाहिजे, बरोबर मिश्कीलपणा पण टिकवता आला पाहिजे. वय झाले म्हणून नेहमी गंभीर रहायची गरज नसते. अशी शिकवणं सहज मिळते.
आज कुलकर्णी काका फुलांचा गुच्छ घेऊन आले होते. व आमच्या भाऊजींना देत म्हणाले,
” देशपांडे, आज ही फुले खास तुमच्यासाठी. ” तुम्हाला आठवतंय का?? आज बरोब्बर एक वर्ष झाल.
सर्वांनी विचारलेच, कशाबद्दल बोलताय कुलकर्णी??
तेंव्हा कुलकर्णी काका म्हणाले,
मागच्या वर्षी याच दिवशी आपल्या गप्पांमध्ये ‘garrage sale’ ची कल्पना देशपांडयांनी सुचवली होती. आणि त्यानंतर या वर्षभरात आपण सर्वांनी मिळून बरंच काम केलं. आपल्या मुलांनीही मदत केली. आपला अनुभव व नवीन मुलांची कार्य कुशलता, नवीन टेक्नॉलॉजी ‘can give amazing results ‘. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
” प्रत्त्येक नवीन कल्पना महत्त्वाचीच असते. ” म्हणून आज हा ‘ bouquet ‘ खास सर्वांसाठीच. आपल्या सर्वांच्या सौ. चेही योगदान विसरता येणार नाही. अभिनंदन सर्वांचे.
भाऊजी म्हणाले. ,
हो आठवलं. तेंव्हा, आपण बाप्पा च्या विसर्जनानंतर, आता आपल्या ही विसर्जनाची वेळ आलीच आहे. असं सहज म्हणालो. तेंव्हा आपली पण आवाराआवर करायलाच हवी. जेवढं ओझं कमी असेल तेवढ छान. व त्यातच या विचाराने/कल्पनेने जन्म घेतला.
वास्तविकता नाकारता येत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करायलाच हवा. सहसा आपण या गोष्टी बोलायचे टाळतो. पण यावर वेळेवर विचार केलाच पाहिजे.
ताई म्हणाली,
बऱ्याच जणांची मुलं अमेरिकेत आहेत. तेथील नागरिकत्व ही घेतले आहे. त्यांचे येथे येणे म्हणजे कधी कधीच होणार. तेंव्हा या घरातल्या वस्तूंचे काय करायचे??? . ठरवायला हवे. आपणच कौतुकाने घेतलेल्या या वस्तू, आपण त्यांचा पूरेपूर आनंदही घेतला. आता मात्र वापरणे होत नाही. सर्व वस्तू चांगल्या working condition. मधे आहेत. आता मोह आवारायला हवा. गेलेल्या/ घडलेल्या गोष्टींचा विचार करत बसण्यापेक्षा, भविष्याचा विचार करावा व वेळेवर निर्णय घ्यावे. म्हणूनच बहुतेक देवाने आपल्याला डोळे मागे न देता समोर दिले असावेत.
बरोबर आहे. ” जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर अवलंबून असतो. परिस्थिती वर नाही. “
भाऊजी म्हणाले,
आता आयुष्याच्या या वळणावर थोडा वेगळा विचार करावा. एकीकडे खूप मुबलकता आहे तर दुसरीकडे गरज दिसतेय. एकीकडे बदलत्या फॅशन बरोबर घरच्या वस्तू बदलणारे लोक दिसतात, तर दुसरीकडे आवश्यक वस्तूंचा प्रचंड अभाव असणारे किती तरी परिवार आहेत. म्हणून सहज एक
विचार मनात आला की अमेरिकेत जसा ‘garrage sale’ लावतात तसाच लावावा का???? आपल्या सारखी परिस्थिती असणारे बरेच लोक आहेत. घरातील किती तरी वस्तू आपण वापरत नाही. म्हणजे आता त्यांची गरजच नाही. घरात चार प्रेशर कुकर आता कशाला हवेत?? वस्तू् कमी करता येऊ शकतात. वेळेवर, आपल्या समोर योग्य गरजू लोकांना त्या मिळाल्या तर बरं. मुलांना हे करणं जमणार नाही. हे ही नक्की. कारण त्यांच्या जवळ तेवढा वेळच नाही.
अशाच चर्चेनंतर एक उपक्रम सुरू झाला. सर्वात आधी आमच्या कमला मावशींच्या बहिणीला मदत केली. तिचा नवरा कोविड मधे गेल्यावर, तिला खानावळ सुरू करायला आपण मदत केली. घरचाच मोठा कुकर, कढई, स्टील ची ताट, भांडी, वाट्या आपण आपाल्याच घरातून काढून दिल्या. व तिची खानावळ सुरू झाली. तिचे आयुष्य मार्गी लागले.
आपापल्या परीने सर्वांनी या उपक्रमाची जाहिरात केली. नवीन कोणत्याही चांगल्या कामाला लगेच सहकार्य मिळतेच असं नाही. प्रथम कोणत्याही नवीन कामाची चेष्टा होते, नंतर विरोध होतो. नंतर हळूहळू लोक त्याचे महत्त्व समजतात. त्यांना पटले की तेही मदतीचा हात पुढे करतात. एकमेकांना बघूनही किती तरी लोक समोर आले.
मागच्या वर्षी आपण दोनदा हा ‘event’ घडवून आणला. आतापर्यंत लोकांनी आपल्या घरच्यांच वस्तू, ताट, वाट्या, भांडी, कुकर, कढई सायकल, स्टील व प्लास्टिक चे डबे, शिवणाची मशीन, टेबल खुर्ची, प्लास्टिक च्या खूर्च्या, पुस्तक मिक्सर, चादरी, टेबल फॅन, अलमारी अशा कितीतरी गोष्टी स्वखुशीने आणून दिल्या. आपल्या बायकांनी त्याची व्यवस्थित नोंद केली. रेकॉर्ड ठेवला.
पाठक काका हसत म्हणाले,
“जेंव्हा बायका अशी कामं करायला तयार होतात ना, तेंव्हा ते नक्की चांगले होतेच. ”
काल तर पवार साहेबांचा फोन आला होता. म्हणाले, मला माझी स्कूटर द्यायची आहे. योग्य माणसाला द्यायचे काम तुमचे. या उपक्रमाबद्दल त्यांनी अभिनंदनही केले. म्हणाले,
” माणसाने कायम वेळेसोबत चालावे व काळाप्रमाणे बदलावे. “
सुरवातीला आपण एक सिस्टीम बनवली व काम सुरू केले. हे सर्व करताना नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. योग्य व्यक्तीच्या हातात त्याच्या गरजेनुसार ती वस्तू देता आली पाहिजे. दोन्ही वेळेस जमलेल्या वस्तूंची लिस्ट आपण वेगवेगळ्या गृप वर कळवली व त्याप्रमाणे वस्तूंचे वाटप केले.
हळुहळु या उपक्रमाची चर्चा झाली. स्वागत झाले. अनेक लोक पूढे आली. हळुहळु बदल होतील. जास्त चांगली सिस्टीमही बनेल.
म्हणतात ना,
गरजवंताला दिलेले दान, प्रामाणिकपणे केलेले काम, पाठीवर ठेवलेला आधाराचा हात म्हणजेच देवपूजा. माणुसकी पेक्षा मोठी पूजा कोणतिही नाही. आपल्याला ही समाधान मिळते.
” There is nothing more beautiful than someone goes out of their way to make life beautiful for others. “
© संध्या बेडेकर
वारजे, पुणे.
7507340231
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




