रमा मोडक
मनमंजुषेतून
☆ आम्ही पण बापट… – लेखिका : नीला महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती – रमा मोडक ☆
पस्तीस वर्षांपूर्वी लग्न करून मिरजेहून सोलापुरला आले. मिरज आणि सोलापूर समकुलीन. कोरडी हवा, भरपूर धूळ, माफक पाऊस, कर्नाटकचा शेजार, डोक्याला फारसा त्रास करून न घेणारी निवांत माणसं.. चांगुलपणावर विश्वास असणारी नि स्वत:ला शहाणं न समजणारी.. पडतं घ्यायला कुठेही नि कधीही तयार असणारी..
वर्षाच्या कुठल्याही दिवशी नि कुठल्याही प्रहरी घराबाहेर पडलं की चौकात एखाद्या महापुरुषाचा मोठ्ठा फोटो. विविध वयाच्या मानवजातीचं कोंडाळं. प्रचंड मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपकावर लावलेली गाणी. दर चार दिवसांनी निघणा-या मिरवणुकी, उधळला जाणारा गुलाल, ढोलांचा ढमढमाट नि सिनेमातल्या गाण्यांवर (ज्याचा त्या उत्सवाशी काडीमात्र संबंध नसलेला) बेधुंदपणे नाचणारी तरुणाईच नव्हे तर वार्धक्यसुद्धा..
काळाबरोबर तंत्रज्ञानानं प्रगती केली. अनेक शोध लागले. बाकीचं तंत्रज्ञान सोलापुरपर्यंत किती पोहोचलं ते देवास ठाऊक पण डॉल्बी, डीजे मात्रं वा-याच्या वेगानं सोलापुरात अवतरलं.
आमची कॉलनी सोलापुरातील पहिली आणि महाराष्ट्रातली दोन नंबरची.. शंभर वर्षांपूर्वी वसलेली.. डेरेदार वृक्षांनी सजलेली.. तशी शांत पण पुढच्या बाजुला अखंड वाहणारा हमरस्ता नि मागच्या बाजुला असणारी अठरापगड वस्ती..
विविध जाती, धर्म म्हणूनच विविध भाषा, पोषाख, अन्न… विविधरंगी संस्कृतींचा महासागर…
खरंतर हे सारं सुखद..
पण यात जोरजोराने किंचाळणारे ध्वनीक्षेपक, हृदय फुटून बाहेर येतं की काय.. अशी धडकी भरवणारे डीजे नि डॉल्ब्या.. यांनी मिठाचा खडा सोडला होता..
पहाटे चारला जाग यायची तीच विविध धर्मांच्या प्रार्थनांनी. धर्माधर्मातील चढाओढींमुळे वाढत जाणारे प्रार्थना, गाणी, स्तोत्रे, श्लोक यांचे आवाज…
मराठी, हिंदी, उर्दू, तेलगु, कानडी.. सा-या भाषांनी लावलेली हजेरी..
“सकाळ झाली नि कोंबडा आरवला”.. या तालावर मोठे झालेल्या आम्हाला आता..
” सकाळ झाली नि कर्णा वाजला ” याची सवय करून घ्यावी लागली.
सकाळच्या प्रार्थनांचा बहर ओसरेपर्यंत एखाद्या लग्नाची किंवा जयंती-पुण्यतिथीची मिरवणुक आसमंत दणाणून सोडायची..
सायंकाळची नि रात्रीची वेळ तर डीजे -डॉल्बी या बंधुभगिनींची हक्काची..
रोजची मिरवणुक, कर्णबधीर करून सोडणारा प्रचंड आवाज..
मागच्या किंवा पुढच्या रस्त्याने मिरवणुक निघाली की एकाच खोलीतल्या लोकांना माईकवर बोलायला लागावं अशी परिस्थिती..!!
खिडक्यांच्या काचाही थरथरायच्या.. भूकंपासारख्या..
लहान बाळं, वृद्ध, आजारी माणसं, परीक्षार्थी, रुग्णालयातील पेशंट्स, शाळेतील विद्यार्थी.. कुणाचीही पर्वा न करता केवळ नशेपोटी नि धुंदीत नेणारे हे असुरी आवाज..
सोलापुरकर जन्मत: सोशिक.. जशी तप्त हवा, दुष्काळ त्यांनी काही न बोलता स्वीकारला, राजकारण्यांची खोटी आश्वासनं, त्यांच्याकडून वाट्याला आलेला अन्याय-उपेक्षा.. त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया न देता पचवली तसचं हे ध्वनीप्रदूषणही त्यांनी निमूटपणे स्वीकारलं..
आम्हीही त्याच सोलापुरकरांचे प्रतिनिधी..
आमच्या सोसायटीत येणारा गवळीसुद्धा मोटारसायकलवर प्रचंड आवाजात गाणी लावून येणारा.. हाक मारायला लागू नये म्हणून…!!
हरतालिकेदिवशी लेक जन्मली. दुसरे दिवशी हॉस्पिटलमधून घरी परतताना गणपतीच्या मिरवणुकीतून गाडीनं धरलेला घरचा रस्ता..
वहिनीच्या मांडीवर पहुडलेलं माझं दोन दिवसाचं इवलुसं लेकरू.. त्या डीजेच्या आवाजानं नि ढोलाच्या प्रत्येक घणघणाटानं दचकणारं.. तिच्या प्रत्येक दचकण्यानं माझा, माझ्या नव-याचा नि माझ्या वहिनीचा खालीवर होणारा जीव..
या पिटुकलीच्या कानांना इजा नाही नं होणार, तिचं काळीज दुखावणार नाही नं..? लेकीच्या आगमनाच्या आनंदाऐवजी काळजीचा डोंगर उराशी बाळगून, एका हाताने तिचे कान बंद करत नि ती दचकू नये म्हणून दुसरा हात तिच्या पोटावर ठेवत आम्ही कसंबसं घर गाठलं..
नि तिथे माझ्या नव-याचा बांध फुटला..
त्याने पोलीसस्टेशनला फोन केला.
” आवाजावर नियंत्रण ठेवण्याचं तुमचं काम नाही? डेसिबलची मर्यादा कायद्याने घालून दिलेली असताना तुम्ही तिची अंमलबजावणी का करत नाही? यामुळे कुणाला ऍटॅक आला, कुणाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण? “.. एवढं संतापलेलं त्याला कधीच पाहिलं नव्हतं..
” डॉक्टरसाहेब, गणपतीचे दिवस आहेत त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही. वरून प्रेशर असतं आमच्यावर.. ”
तो त्याच भागातला एक प्रतिष्ठित व्यक्ती असल्यामुळे पोलीस एवढंतरी बोलले..
गणेशोत्सवात काहीच करता येण्यासारखं नव्हतं..
उत्सव संपला..
नंतर मात्रं रस्त्यावरून रात्रीच्या वेळी डीजेचा आवाज येऊ लागला की माझा नवरा नि मी पोलीस स्टेशनला फोन करायचो.. प्रसंगी पोलिसस्टेशनलाही नवरा जायचा. तक्रार नोंदवायचा..
अन् विशेष म्हणजे पोलीसही स्वत: मिरवणुकीत जाऊन आवाज कमी किंवा बंद करायला लावायचे..
अनेक वर्षं हा लढा आम्ही लढला..
कोणतीही लाज न बाळगता.. कंटाळा न करता.. हार न मानता..
“यात तक्रार करण्यासारखं काय आहे.. आमच्या घरीतर चोवीस तास हे आवाज असतात. माणूस म्हटल्यावर हे चालणारच “.. आमच्या कामवाल्याही आमची चेष्टा करत असत..
पण आम्ही हरलो नाही..
कधीकधी कमिशनर ऑफिसही गाठलं.
सोलापुरचं पोलीसखातं कर्तव्यदक्ष..
किंवा
आमची कळकळ असेल
नाहीतर
बरेच पोलीस नव-याचे पेशंट असल्यामुळेही असेल..
किंवा
देशाचे गृहमंत्री आमच्या सोसायटीचे रहिवासी असल्यामुळे असेल..
पण
आमच्या तक्रारीची प्रत्येकवेळी दखल घेतली गेली.
नि
आमची चिमुरडी लेक शांतपणे झोपू शकली.
गेल्या वर्षी मिरवणुकीत दोन व्यक्ती डी. जे. च्या आवाजामुळे मृत पावल्याच्या बातम्या सोलापुरातील पेपरमधे आल्या..
अतिसोशिक नि निवांत असणारा सोलापुरकर यावेळी कसा पेटून उठला देव जाणे..
आय. एम. ए.. , काही सामाजिक संस्था, काही समाजसेवी व्यक्ती यांनी पोलीस कमिशनर, कलेक्टर यांच्याकडे डीजेबंदीची मागणी केली..
नि
सोलापुरकरांचं नशीब बलवत्तर.. ती मागणी चक्क मान्यही झाली..
ना कोणी त्या मागणीला विरोध केला..
ना आंदोलनं झाली..
चांगल्या प्रथेला कसला विरोध..?
“शुभस्य शीघ्रम”.. म्हणत त्वरित अंमलबजावणीही झाली..
गेले वर्षभर सोलापुरकर डीजेमुक्तीची सुखद शांतता अनुभवतायत..
मिरवणुका होतात पण त्यांचा आवाज त्रासदायक नसतो..
विद्यार्थी शांतपणे अभ्यास करू शकतात..
रुग्णाचं हृदय आता डीजे नं धडधडत नाही…
लहान बाळं डॉल्बीच्या आवाजानं दचकून उठत नाहीत..
शांततेची सोलापुरात साथ आलीय..
प्रार्थनास्थळं, देवळं… सगळीकडे शांततेत भक्तीचा सोहळा पार पडतोय…
कदाचित देव पण त्यामुळे सुखात आहे..!!
आम्हा सोलापुरकरांची पहाट पुन्हा एकदा पक्ष्यांच्या किलबिलाटानं फटफटतेय
नि
रात्रं रातकिड्यांच्या पार्श्वसंगीतानं निद्राधीन होतेय…
निसर्गाचा कोमल स्पर्श पुन्हा एकदा सोलापुरकरांना सुखावतोय..
हा बदल इतका सहज झाला की त्याचं तेंव्हा काहीच वाटलं नाही…
आज पुण्याच्या बातम्या वाचताना उगीचच सोलापुरचा अभिमान वाटतोय..
ज्या सोलापुरला सुधारित खेडं, मागासलेलं गाव.. अशा विशेषणांनी हिणवलं गेलं.. त्या गावानं चांगल्या गोष्टीचा, ख-या-खु-या सुधारणेचा उगीचच विरोधासाठी विरोध न करता किती सहजतेनं स्वीकार केला…
ना त्यात धर्म मधे आला ना कोणता पक्ष..
“माणसाचे हित “.. एवढ्याच अजेंड्यावर सोलापुर एक झालं.
“डीजे मुक्ती ” ही शांतपणे जगण्यासाठीची गरज आहे… हे लहान मुलालाही कळेल, अशी वस्तुस्थिती असताना विद्येच्या माहेरघराच्या नशिबी त्यापोटी येणारा संघर्ष पाहिला की…
सोलापुर भले पुढारलेलं नसेल, हुशार लोकांचं गाव नसेल पण शहाणी नि समंजस माणसं इथं राहतात, असं वाटून जातं..
नि
एकेकाळी मी नि माझ्या नव-याने आमच्यापरीने ध्वनिप्रदूषणाविरोधी उचललेलं चिमुकलं पाऊल आठवतं..
आणि वाटतं..
आम्ही पण बापट….
लेखिका : नीला महाबळ गोडबोले
(मिरज – सांगली) मु. पो. सोलापूर
प्रस्तुती : रमा मोडक
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





