संध्या बेडेकर
मनमंजुषेतून
☆ “रफ वही..“ ☆ संध्या बेडेकर ☆
“आयुष्याची वही व्यवस्थित ठेवायला, पुन्हा एकदा रफ वहीची गरज भासू लागली आहे. “
आजकाल एखाद्याचे नाव आठवत नाही, कोणाकडे गेले की,
अरे! ! हे सांगायचे/ विचारायचे राहूनच गेले. असं होतं. एखादी वस्तू कुठे ठेवली आहे? ? हे आठवत नाही. घरात ती वस्तू आहे हे नक्की माहित असतं, पण वेळेवर शोधूनही ती वस्तू मिळत नाही. वस्तू खूप महाग असते अस वगैरे नाही, पण घरी असलेली वस्तू वेळेवर कामास येत नाही. त्यांचे वाईट वाटते. त्यापेक्षा जास्त त्रास आपल्याला आठवत नाही या गोष्टीचा होतो.
म्हंटल तर घर व्यवस्थित आहे. काम करायची पध्दत ही व्यवस्थित आहे. वस्तू व्यवस्थित वापरणे, काम झालं की त्या जागेवर ठेवणे हेही सवयीत आहे. सर्व व्यवस्थित आहे. कुठे काही मी कमी पडत नाही. खरं तर,
काकू! ! तुम्ही घर छान ठेवता. नेहमी चकाचक.
असे ‘comments ‘ ऐकल्यावर
मी स्वतः वरच मनातल्या मनात हसते. हे सर्व वरवरचे आहे. असं मला वाटू लागलं आहे.
वाढत्या वयाचा परिणाम आता दिसू लागला आहे.
काल हल्दीरामचा रसगुल्ल्याचा डबा उघडला. त्यात एकंदर सोळा रसगुल्ले असतात, हे मला नक्की माहित आहे. सर्व संपले. पण सोळा कसे? कुठे? कोणाला? दिले, त्याचा हिशोब सहज लावत असताना चार रसगुल्ल्यांचा हिशोब काही लागत नव्हता. चार मेंम्बर असलेल्या शेजारच्या सर्व फॉमिलीज् डोळ्यासमोर आल्या, पण आठवत नव्हतं. मी आनंदाने प्रेमानेच माझ्या सुखदुःखाच्या प्रिय मैत्रिणींना दिले होते. याचा आनंदच होता मला, पण डिटेल्स आठवत नव्हते, त्यांचा त्रास होत होता.
या चार दिवसांत काय काय झालं? ? कुठे? कोणाकडे? गेलो, हे जेंव्हा आठवत नाही, तेंव्हा मानसिक त्रास खूप होतो. त्यात नुकसान असं काही च नसतं, फक्त आपल्याला आठवत नाही याचं दुःख होत. त्याचा त्रासही होतो.
बरं! ! असं नाही की सर्व च विसरते. काही अनावश्यक गोष्टी ज्या विसरले तर बरं होईल, त्रास कमी होईल असं वाटत, त्या छान आठवतात. त्या आठवतात म्हणून त्रास होतो.
बरे असो.
शाळेत असताना एक रफ वही असायची ज्यात सर्व लहान लहान गोष्टी लिहिल्या असायच्या. नक्की कोणत्या पेजवर आहे हे जरी माहीत नसलं तरी या वहीत कुठेतरी कानाकोपऱ्यात मिळेल ती खात्री असायची. ‘शोधा म्हणजे सापडेल’ हा आत्मविश्वास असायचा. ही रफ वही खूप महत्वाची असायची. पण तिचे रंगरूप काही खूप छान नसायचे. त्यामानाने बाकी वह्या जास्त व्यवस्थित असायच्या. बाकी फेअर कॉपीज् या रफ वहीच्या भरवशावर खूप मटकायच्या. पण अडल्या वेळी हीच जीवाभावाची सखी मदतीला धावून यायची. वर्ग संपता संपता सरांनी काही विशेष गोष्ट सांगितली तर घाईघाईत रफ वहीत लिहायचे. म्हणजे आपलं काम अडणार नाही, शोधलं तर आपल्याला नक्की कळेल/ मिळेल, आपलं काम होईल. ही मनोमन खात्री असायची. स्वतः वर विश्वास असायचा.
आता पुन्हा अशाच एका रफ वहीची गरज मला भासू लागली आहे.
म्हणजे अगदी रसगुल्ल्यांचा हिशोब वगैरे लिहायला नाही, पण रोजची दैनंदिनी लिहायला. आयुष्याची गणित सोडवायला. घरातील वस्तू संपल्या, कोणाला फोन करायचा आहे, मेसेज द्यायचा आहे, हळदीकुंकू, लग्नाला जायचे आहे. डॉक्टर कड़े जाणे आहे. आपली साप्ताहिक, मासिक, वार्षिक काम, bank details हे सर्व आता लिहून ठेवायचे असा विचार मनात आला. आणि रफ वहीची आठवण झाली.
अस विसरण म्हणजे एक सिग्नलच आहे. स्वतः कडे लक्ष द्यायची गरज आहे.. मी विसरते, मी विसरते हा विचार मनात पक्का बसायच्या आधी त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे.
वयामाना प्रमाणे हे सर्व होणारच, पण जेवढं लांबवता येईल तेवढं बरं. आत्मविश्वास कमी व्हायला नको. म्हणून मधून मधून ही रफ वही चाळायची, म्हणजे उजळणी होत राहील. गोष्टी लक्षात राहतील. आपली काळजी आपणच घ्यायला हवी.
अल्झायमर ची सुरुवात अशीच होते. तेंव्हा एकाच वहीत सर्व लिहिलेले असले तर तेथे शोधलं तर सर्व मिळेल. ही खात्री हवी.
म्हणतात ना,
“There is nothing in this world that can trouble as much as your own thoughts. “
मनाच्या ज्या दरवाज्यातून संशय आत शिरतो ना, त्याच दरवाज्यातून आपला स्वतः वरचा विश्वास बाहेर पतो. आत्मविश्वास कमी झाला तर पूढचे सर्वच कठीण होईल.
मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही. एकदा का एखादा चूकीचा विचार मनात घर करून बसला, तर मग दिशाभूल होते. मनात जे पेराल ते अधिक वेगाने उगवत.
चूकीच्या विचारांवर वेळेवर बंधनं घालणे आवश्यक आहे.
म्हणून वेळेवर सावध राहणही आवश्यक आहे.
रफ वही ची आयडिया मला आवडली, पटली लगेच एक शंभर पानांची वही तयार केली. ही वही मात्र अगदी समोरच ठेवली, नाही तर ही वही कुठे ठेवली? ? हेच विसरायला होईल.
आज वार्षिक चेक अप करिता डॉक्टर कड़े जायचे आहे. म्हणून काल मागच्या सर्व टेस्ट रिपोर्ट बघून रफ वहीत सर्व लिहून काढल. उजळणी केली. आज डॉक्टर ने विचारायचाच अवकाश की मी भराभर तारखांसकट सर्व उत्तरे दिली.
डॉक्टर म्हणाले पण,
व्वा मॅडम! ! तुमची स्मरण शक्ती छान आहे. बदाम वगैरे व्यवस्थित घेता बहुतेक डायट मध्ये. डॉक्टर हसले.
त्यांना काय माहिती हा सर्व रफ वहीचा कमाल आहे.
काही असो, मी माझ्या समस्या वर शोधलेला मार्ग मला आवडला. त्यांचा सकारात्मक प्रभाव ही दिसला.
आता मी स्वतः शी खूप गप्पा मारते. स्वतः लाच सांगते, चला संध्या मॅडम, चला
फ्रीजमधून वांगी काढायची आहेत. दूधाचे भांडे ठेवायचे आहे. असं स्वतः लाच सांगत सांगत काम करत राहते. मुलं सूना आॉफिस मध्ये गेल्यावर माझंच राज्य असत. मी एकटीच स्वतः बरोबर बोलत आपली कामं करत राहते. रामरक्षा ऐकते. म्हणते.
कोणाकडे जायचे असेल तर तयारी करते. तेथे काय बोलायचे? ? ? हे आठवते, ठरवते. त्यांच्या घरच्या घडलेल्या काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवते. आवर्जून त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करते. होम वर्क करुनच बाहेर पडते.
काल जोशी वहिनीकडे गेले, तेंव्हा त्यांचे कौतुक अभिनंदन करायला मी विसरले नाही. इतक्यातच त्यांची नात सिंगापूरला उच्च शिक्षणासाठी गेली असल्याचे लक्षात ठेवून त्यांचे अभिनंदन केले.
मला माझेच कौतुक वाटले. मनोमन माझ्या रफ वहीला धन्यवादही दिले.
आता प्रगती बरी आहे.
म्हणतात ना,
There are different problems In different phases of life. Without hesitation, take decisions timely as per your requirements.
© संध्या बेडेकर
वारजे, पुणे.
7507340231
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






