डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
मनमंजुषेतून
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “बाळ..!!!” – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
(प्रत्येकाच्या दारावर त्याच्या नावाची ठसठशीत पाटी असते.. “ओळख” नावानं होत असेलही… “परिचय”, आपल्या वागण्यामुळं होतो! मोठ्ठं नाव असलेल्या परंतु, परिचय हरवुन बसलेल्या लोकांनी याला सगळीकडुन हाकलुन दिलं.
हा आला मग आपलं गाव शोधत… त्याला ध्रुवासारखं अढळ स्थान हवं होतं, जिथून त्याला कुणीही उठवणार नाही… आणि मग त्याला हा उकिरडा सापडला…) इथून पुढे
– –
हाडामांसाच्या माणसांनी त्याला कधी “हात” दिला नाही, परंतु इथल्या निर्जीव उकिरड्याने त्याला “साथ” दिली… स्वतःसाठी काही करणं म्हणजे “दागिना”, दुसऱ्यासाठी काही करतो तो “अलंकार”…! आज दुसऱ्याला आधार देवुन उकिरडा “अलंकार” झाला!
खोटं सुगंध लावून मुखवटे घालून फिरणाऱ्या माणसांपेक्षा… कोणताही मुखवटा न लावणारा हा दुर्गंधीत उकिरडा त्याला जास्त जवळचा वाटला.
आपण एखादी गोष्ट स्वतःसाठी कमावतो, तेव्हा आपलं “वैभव” वाढतं.. पण दुसऱ्याला काही कमावण्यासाठी मदत करतो, तेव्हा आपलं “ऐश्वर्य” वाढतं..!
वैभवात लोळायचं की ऐश्वर्याचा आस्वाद घ्यायचा? लोळतं ते गाढव… अशा लोळणाऱ्या, मुखवटाधारी गाढवांच्या गर्दीपासुन तो दुर आला आणि तेव्हापासून तो इथेच आहे… या उकिरड्यात, ध्रुवबाळासारखा, अढळ…!
फ्लेक्स च्या पेपर खाली तो गुपचूप झोपून राहतो… कुणाला कळत ही नाही, आणि कळलं तरी कुणाला फरक पडत नाही, आणि म्हणुन मग कोणी उठवायला येतही नाही…!
पुण्यात राहून तो उत्तम मराठी बोलायला सुद्धा शिकला आहे. त्याची सर्व कहाणी ऐकली! त्याला एक हॉटेल काढायचं होतं, ते त्याचं स्वप्न आहे… तो एक उत्तम कुक सुद्धा आहे…!
गाढ झोपेत असतांना, तो हेच, स्वप्न पहात असेल का? मी त्याला त्यावेळी झोपेतून उठवलं होतं… त्याचं स्वप्न कदाचित मी मोडलं असेन.
पण नाही, मी त्याला समजावुन सांगेन, ‘दोस्ता, झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचा पाठलाग जागेपणीच करायचा असतो. ‘
सध्याच्या अन्नपूर्णा प्रकल्पांमध्ये अनेकांना आम्ही जेवणाचे डबे तयार करण्याचं काम देत आहोत, यालाही डबे तयार करण्याचं काम आपण द्यावं, हे मी मनोमन ठरवलं. सर्वात प्रथम याला शुचिर्भूत करणे अत्यंत आवश्यक होतं.
बुधवारी दिनांक 16 जूनला याच्यासाठी सर्व कपडे घेतले. दाढी आणि कटिंग साठी माणूस ठरवला. एका जागेवरून दुसर्या जागेवर जाण्यासाठी व्हीलचेअरची आवश्यकता होती या व्हीलचेअरची ऑर्डर दिली.
आता गुरुवारी याच्यामध्ये अंतर्बाह्य बदल घडवून आणणं आवश्यक होतं, आंघोळ घालणं महा आवश्यक होतं. यानंतर पुढे मग उदरनिर्वाहाचं साधन!
मी त्याच्यासाठी करणार असलेल्या बाबींची त्याला सर्व कल्पना दिली. ऐकताना, Sir… Sir… म्हणत तो दरवेळी पायाशी झुकण्याचा प्रयत्न करायचा, म्हणायचा सर, ‘प्रणाम करु द्या हो…! ‘ दरवेळी मी मात्र अवघडुन जायचो…
एकदा त्याला हसत म्हणालो, ‘ओळख टिकावी म्हणुन केला जातो तो नमस्कार… कुणाच्या मिंध्यात आहोत म्हणुन, कमरेत झुकणं, हे झालं अभिवादन… निष्ठा वाहताना केला जातो तो मुजरा… आणि काहीतरी हवंय म्हणुन केलं जातं ते वंदन मित्रा.. , तु नको वाकुस… मला अवघडल्यासारखं होतं.. ‘
‘अर्धाच अर्थ सांगितलात सर… काहीही नको असतांना, नतमस्तक होणं म्हणजे प्रणाम…! ‘ या त्याच्या वाक्यावर झुकण्याची पाळी माझी होती…!
… यानंतर गुरुवारी 17 जूनला पुन्हा याला भेटायला गेलो. पूर्वी दाढी आणि कटिंग चे काम करणारा एक कारागीर, परिस्थितीमुळे सध्या भीक मागत आहे, याला सुद्धा भिक्षेकऱ्यांच्या दाढी आणि कटिंगचं काम दिलं आहे. याला आपण राजू म्हणू…!
राजू स्वतः अपंग आहे. याला व्हीलचेअर आणि दाढी कटिंगचं सर्व साहित्य घेऊन दिलं आहे. रस्त्यावरच तो हा व्यवसाय करतो, आणि आपण आपल्या माध्यमातून सुद्धा त्याला व्यवसाय देत आहोत.
तो माझ्यावर अतिव प्रेम करतो…! या भावनेतून बऱ्याच वेळा तो माझ्यावर अधिकार गाजवतो. ‘मय डाक्टर का राइट हॕन्ड हय, मेरे परमिशन के बगैर डाक्टर को मिलने का नय,… डाक्टर को मिलना हय, तो मेरसे पयले बात करने का’… असा त्याचा प्रेमळ आग्रह असतो. जे लोक त्याच्या परवानगी (? ) वाचून मला “डायरेक्टली” भेटायला येतात, त्यांच्याकडे तो रागाने पाहतो… मला या सर्व गोष्टींची मजा वाटते आणि कौतुक सुद्धा!
तर या राजुला हक्काने मी दाढी आणि कटिंग करायला लावली “त्याची”… राजुचा कुशल हात “त्याच्या” डोक्यावर आणि गालावर नाचत होता… कटिंग करतांना, वाढलेल्या केसातल्या किडे आणि अळ्या रस्त्यावरून दुडूदुडू धावत होत्या… यांच्याकडे पाहून मला असं वाटलं की पुण्यातलं ट्राफिक यांच्यामुळेच जाम होईल का काय…?
दाढी झाली, कटिंग झाली, आता आंघोळीचं काय…? या उच्चभ्रु रस्त्यावर, आम्हां “भिकार” लोकांना बादली आणि पाणी कोण देणार?
मी माझ्या “राईट हॅन्ड” राजूभाई कडे सुचक पाहिलं… त्याने माझा प्रश्न अचुक ओळखला आणि म्हणाला, ‘मय है ना सायेब, कायको टेन्शन लेता हय…? ‘
थोड्याच वेळात त्याने दहा लिटरचे बिसलेरीचे पाच कॅन आणले, सोबत माझा सहकारी मंगेश वाघमारे होताच… आम्ही बिसलरीच्या पाण्याने मग “त्याला” आंघोळ घातली, रस्त्यावरच…
आंघोळ झाल्यावर थक्क होवुन पहात राहिलो मी त्याच्याकडे…! एखाद्या चित्रपट अभिनेत्याला लाजवेल इतका देखणा होता तो! दाढी आणि वाढलेल्या केसांच्या जंजाळात हे जाणवलं नव्हतं…! तीन वर्षे तो या उकिरड्यात लपून रहात होता. त्याचं बदललेलं रुप पाहुन मलाही विश्वास बसेना…!
दर वेळी अंगावर पाणी पडल्यावर तो डोक्यावर हात नाचवत “शंभोsss” म्हणायचा… मला नंतर जाणवलं… म्हटलं, ‘यार, राजू, आज आपल्या हातून अभिषेक झाला रे, नकळत… ‘
‘हां सायेब, आपुनको मंदिरमे जानेका जरुरतच नय… ‘ तो हसत म्हणाला. जगातलं त्रिवार सत्य तो नकळतपणे बोलून गेला… “मानवसेवा हिच ईश्वरसेवा! “
साबण लावल्यावर, “त्याच्या” अंगाला सुवास येत होता, म्हटलं, ‘मंगेश, आपल्याला आता कसलीही अगरबत्ती लावायची गरजच उरली नाही राव… ‘ मंगेश मंद हसला…
आंघोळ झाल्यावर “त्याला” जेवू घातलं… तो तृप्त झाला…!
‘काय गं मनिषा? आपलं हे “जेवण” म्हणजेच आपण त्याला वाहिलेला “नैवेद्य” असेल का…? ‘
ती सुद्धा फक्त गालात हसली…!
यानंतर, त्याच्या कुडकुडणाऱ्या अंगावर चादर टाकून आम्ही निघालो…
‘Sir, I am feeling very nice, I love you sir, I love you…! ‘ तो उतावीळपणे, कृतार्थपणे हात जोडत ही वाक्यं म्हणत होता… डोळ्यांतून पाणी ओघळत होतं… , त्याला कोणत्या भाषेत आमचे उपकार मानावेत तेच कळत नव्हतं, काय बोलावं? त्याला हेच कळेना…!
त्याचे हे हसुमिश्रीत अश्रु.. , प्रसाद… प्रसाद म्हणतात तो हाच असेल का? पूजा… पूजा म्हणतात ती हिच असेल का…??? हिच पूजा असेल तर आमच्या हातुन आणखी एक पूजा झाली होती…!
मी विचार करत राहिलो… आम्ही त्याच्यावर चादर पण चढवली होती. इसीको “इबादत” कहते होंगे क्या…? आम्ही “त्याच्या” मनात जगण्याच्या आशेची एक मेणबत्ती पेटवली होती…! तो चमकून उठलाय या प्रकाशात…! यालाच “Prayer” म्हणत असावेत काय…!
आज शुक्रवारी याच्या बाबतीतला सर्व घटनाक्रम पुर्ण झाला… माणसाला माणसांत आणणारा आजचा हा शुक्रवार! Good Friday आजच असेल काय…?
तो झोपतो ते ठिकाण – तो उकिरडा आम्ही खराटा-पलटण च्या आज्यांमार्फत उखडुन टाकणार आहोत. नववधु रस्त्यावरच्या गालाचा बट्टा मिटवणार आहोत, हळदीनं तीला माखणार आहोत…!
मी निघालो, खुरडत खुरडत तो माझ्याकडे यायला लागला… त्याला उठायचं होतं, पण ते शक्य होत नव्हतं… पुन्हा हात जोडुन म्हणाला, ‘तुम्ही खुप केलंत माझ्यासाठी… ‘
म्हटलं, ‘अरे अजुन कुठं काय केलंय… आत्ता तर सुरुवात केलीय… पण, लक्षात ठेव आपण कुणाला दिलेलं आठवायचं नाही, आणि दुसऱ्यानं दिलेलं कधी विसरायचं नाही!’
तो हसला आणि म्हणाला, ‘सर एक विनंती करायची होती, मला आईवडिल नाहीत. तुम्ही आणि मॅडम मला पदरात घ्याल? ‘
मी पुन्हा त्याच्या जवळ गेलो, त्याला जवळ घेतलं… तो रडायला लागला. त्याला बोलायचं होतं खुप… पण शब्द डोळ्यांतुन ओघळु लागले…! बऱ्याच वेळानं, पालथ्या मुठीनं डोळे पुसत, हुंदका देत, तो म्हणाला, ‘सर मी आज तुमचं बाळ झालो…! ‘
‘बापाला कुणी ‘सर’ म्हणतं का येड्या… ‘ म्हणत त्याच्या पाठीत मी धपाटा घातला… आणि तो खुद्कन हसला.
जोरदार पाऊस कोसळत होता… बाप होण्याच्या खुशीत मग मी चिंब न्हालो…!
– समाप्त –
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : abhisoham17@gmail.com,
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





