श्री संभाजी बबन गायके

? मनमंजुषेतून ?

☆ “आपण सर्वच म्हातारे होत जात असतो..!” (अनुवादित) – इंग्रजी लेखक: अज्ञात ☆ मराठी अनुवाद – श्री संभाजी बबन गायके ☆

☆

आईचं वय झालं होतं. तिचे हात थरथरत असत आणि गुडघे दुखू लागले होते… आणि दृष्टीही कमी झाली होती. ती तिच्या वस्तू तिने कुठे ठेवल्यात तेच विसरायची… त्या वस्तू कधी कधी जेवणाच्या टेबलवर राहून जायच्या, कधी देवघरात तर कधी तिच्याच साडीच्या पदरात कुठे तरी असायच्या.

आमचा दिवस नेहमी असाच सुरु व्हायचा. “माझा चष्मा कुठाय? ’ आई विचारायची तेंव्हा तिच्या आवाजात चिंता असायची आणि एक अनामिक हळुवारपणाही… जणू काही ते विचारायला ती घाबरते आहे एखाद्या लहान मुलासारखी. वस्तू हरवली की मुलं जसं घाबरून जातात ना.. तसं होतं हे.

आईने असं विचारलं की माझी बायको एक दीर्घ उसासा टाकायची. “सासूबाई ना वस्तू कुठंही टाकून देतात. घराचा पार उकिरडा झालाय नुसता! जिथं पाहावं तिथं पसारा!” बायको त्रासिक स्वरांत बोलायची.. आईला ऐकू जाईल असं.

यावर मी खोटंखोटं हसून वेळ मारून न्यायचो… पण मनातून मी ही वैतागालेलो असायचो.

एके दिवशी चहा करताना आईने चहाचं भांडंच उपडं करून टाकलं. किचनमधून चहाचा जो लोट आला तो अगदी बैठकीच्या खोलीपर्यंत.

“डोळ्यांनी नीट पाहिलं नाही ना की मग असंच होतं! काळजी नाही का घेता येत नीट, सासूबाईंना? ” तिकडून बायको ओरडली.

मलाही लाजल्यासारखं झालं… मी ही आईवर ओरडलो… सर्वांदेखत. “आई! तू नेहमीच असं काही तरी करून सर्वांना त्रास देतेस. तुझा चष्मा नीट सांभाळून जागच्या जागी ठेवत का नाहीस? तुला जर व्यवस्थित दिसत नसेल तर नको हात लावूस कोणत्याही वस्तूंना! ” 

आई यावर अगदी स्तब्ध झाली, स्वयंपाकघराच्या टेबलच्या फरशीच्या कडांना धरून उभी राहिली… बराच वेळ. आईच्या डोळ्यांत पाणी होतं, पण ती काही बोलली मात्र नाही. आणि नंतर हळूहळू चालत तिच्या खोलीत गेली.

त्या रात्री मला तिच्या खोकल्याचा आवाज ऐकू येत होता, पण मी जाऊन पाहिलं नाही. “होईल बरं! ” मी माझं मीच ठरवलं आणि गप्प राहिलो.

त्या दिवसापासून आईनं स्वयंपाकघरात येणं थांबवलं तिने चहाही करणं थांबवलं. देवघरात ती हल्ली हार-फुलं वाहताना दिसत नव्हती. चष्मा कुठं ठेवलाय? हाही प्रश्न विचाराणं तिनं सोडून दिलं.

एका कोप-यात बसून राहायची… शांतपणे. एखाद्या खोडकर मुलाला घरातलं कुणी खूपच रागावल्यावर ते मूल कसं बसून राहतं एका बाजूला तसं आई बसू लागली.

एके दुपारी ती बाथरूममध्ये जायला निघाली आणि घसरली… तिचा चष्मा खाली पडला आणि त्याचे तुकडे झाले. तिचं डोकं दारावर आदळलं. दवाखान्यात नेलं तर डॉक्टर म्हणाले तिच्या डोक्याला मार लागलाय बराच. त्यातून ती बरी होऊन घरी आली पण अंथरुणास खिळूनच राहू लागली. तिचे डोळे उघडे असायचे पण त्यांत आधीसारखा उजेड नव्हता दिसत. दोन-तीन महिन्यांतच ती गेली!

तिच्यावर अंत्यसंस्कार करून आल्यावर मी स्वयंपाकघरात जाऊन उभा राहिलो… इथंच तर मी तिच्यावर ओरडलो होतो… या खोलीत आता एकदम शांतता होती… या शांततेचे ओझं मला पेलवेना!

काही महिन्यांनी आम्ही आमचं घर नूतनीकरण करायला घेतलं. आम्ही पडदे बदलले, फर्निचर बदललं.. आणि बाथरुमच्या फरशाही.

एके दिवशी फर्निचरवाला म्हणाला… ”साहेब, आपण हे लाकडी कपाट इथून हलवायचं का? अगदी खिळखिळं झालंय! ” आईच्या पूजेच्या खोलीजवळ ते कपाट होतं. त्याच कपाटात आई तिचा चष्मा ठेवत असे.

माझ्या मुलीचा आजीवर जीव होता. ती म्हणाली, ”नाही! ते कपाट तिथून हलवायचं नाही अजिबात! ” ती गेली आणि तिने एक छोटी चंची, पाउच आणला बाहेर. त्या पाउच मध्ये आजीचा तुटलेला चष्मा होता. चष्म्याची फ्रेम वाकली होती.. काचा तर आधीच तडकून, फुटून गेल्या होत्या. “हा चष्मा ठेवा त्या कपाटात… आज्जी तिथंच ठेवायची… तिथंच राहू द्यात.! ”

फर्निचरवाला हसला आणि म्हणाला, ”आपण या कपाटात काचेचं छोटंसं खोकं, बॉक्स करू शकतो. डिस्प्ले सारखं. ”

आमच्या त्या नुतनीकर केलेल्या घरातल्या त्या कपाटात मग हे काचेचं खोकं ठेवलं गेलं.. त्याच कपाटात. घरी आलेले पाहुणे, नातेवाईक म्हणायचे.. ”हा तुटलेला चष्मा कशाला ठेवलाय या कपाटात? ” त्यावर माझी मुलगी म्हणायची, ”आमच्या आज्जीचा चष्मा आहे हा. आज्जी या चष्म्यातूनच तर सारं जग बघायची… आम्हां सर्वांना तिने या चष्म्यातून बघूनच तर लहानाचं मोठं केलंय… बाबांना आणि मला सुद्धा! ” हे ऐकून प्रश्न विचारणारा एकदम गप्प होऊन जायचा… काही जणांचे डोळे पाणावून जायचे!

मी ही कालांतराने म्हातारा होत गेलो… सर्वच होतात तसा. मलाही कमी दिसू लागलं. वर्तमानपत्रातील अक्षरं धूसर दिसू लागली डोळ्यांना… आणि मी ही माझा चष्मा कुठं ठेवलाय… ते शोधू लागलो… आई शोधत असायची तसं.

एके दिवशी मला चष्मा सापडेना. आणि मी जोरात ओरडलो, ”माझा चष्मा कुठाय? ” फोनवर बोलत असलेली माझी बायको तिथूनच फाडकन म्हणाली, ” वस्तू नीट जागच्या जागी ठेवत जा… घरात पसारा करू नका! ”

ते शब्द म्हणजे माझ्या गालावर बसलेली जोरकस थप्पडच होती जणू. तेवढ्यात माझा नातू माझ्याकडे पळत आला… त्याने माझे हात हातात घेतले आणि म्हणाला, ”आजोबा! तुमच्या डोक्यावरच आहे की तुमचा चष्मा! ” आणि तो खिदळू लागला! नंतर माझ्याकडे पाहत मोठ्या गांभीर्याने म्हणाला.. ”डोळ्यांवर चष्मा असल्याशिवाय चालत नका जाऊ… पडाल तुम्ही कशाला तरी अडखळून! ” त्याने माझा हात धरला आणि मला बाथरूमपर्यंत घेऊन गेला. माझ्या डोळ्यांत आसवे तरारली… पण मी काही स्वत:ला असाहाय्य समजत होतो म्हणून नव्हे. मला त्याक्षणी उमगलं होतं… खरी शक्ती, खरं सामर्थ्य नेमकं कशात असतं ते!

त्या दिवशी संध्याकाळी माझ्या नातवाने त्याच्या शाळेची चित्रकलेची वही माझ्यासमोर धरली “आजोबा! मला न चित्रकलेत पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले! ” मी त्याची ती वही हातात घेतली… चित्र पाहू लागलो.

आमच्या देवघरातल्या कपाटाचं चित्र काढलं होतं त्यात… त्याने त्या कपाटात एक काचेची पेटी रंगवली होती… त्या पेटीत तुटलेला चष्मा होता! चित्राखाली त्याने त्याच्या वेड्यावाकड्या अक्षरांत लिहिलं होतं… म्हाता-या डोळ्यांना बाकी काही नको… थोडा आदर हवा असतो!

माझं माझ्यावर नियंत्रण नाही राहू शकलं.. मी तसाच उठून माझ्या खोलीत गेलो… आणि लहान मुलासारखा रडलो… आवाज न होऊ देता… जेंव्हा मनातल्या अपराधीपणाच्या भावना विरघळत जात जात सत्याचं रूप घेतात तेंव्हा मन रडतं… तसं रडत होतो मी.

आपणही काळाच्या ओघात म्हातारे होणारच आहोत. आपलेही हात थार्थारातील, पावलं अडखळतील आणि डोळ्यांना धूसर दिसू लागेल.

आपल्या घरातली वृद्ध माणसं आपल्यावरचं ओझं नसतात… तसं त्यांना कधीच जाणवूही देऊ नका. ते दैवाने तुम्हांला दिलेला आशीर्वाद आहेत… असं त्यांना वाटत राहील, असं त्यांच्याशी वागा.

आपल्या मुलांना केवळ कोरड्या शब्दांतून प्रेम, आदर, जिव्हाळा शिकवू नका… तुमच्या कृतींतूनच ते या गोष्टी शिकू शकतील…!

वृद्धत्व हे माणसाची कमजोरी नसते.. ही तर जीवनातलं अपरिहार्य नैसर्गिक वळण असतं. ज्या हातांनी आपल्याला वाढवलं, आपल्यावर सावली धरली, आपल्याला घास भरवले, आपल्यासाठी ज्या हातांनी घरटे विणले… ते हात कधी ना कधी थरथरू लागतील… ज्या डोळ्यांनी आपल्यावर लक्ष ठेवलं.. त्या डोळ्यांची नजर कमजोर पडत जाईल. या काळात म्हाता-या जीवांना तुमचा पैसा नको असतो, आरामदायी वस्तू नको असतात… तर संवेदना, संयम आणि कणव हवी असते..!

आपण प्रत्येकवेळी आपल्या पालकांना खूप क्रूर वागूनच दुखावतो असं नाही… आपण कधी कधी केलेला आततायीपणा, एखादा वावगा शब्द, बोलण्यातला टोकदारपणा, रागाने टाकलेला एखादा उसासाही पुरेसा असतो… मन दुखवायला. ते म्हणजे अडगळ आहेत, अशी त्यांची भावना होईल, असं आपण वागलो तरी तेच होतं.

आपल्याला पश्चाताप होतो त्यावेळी बहुदा ते निघून गेलेले असतात आपल्यातून… कायमचे

मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात 

मराठी अनुवाद : संभाजी बबन गायके

पुणे (महाराष्ट्र) मो  81298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted