डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
मनमंजुषेतून
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “फक्त एक… फुकटचा वडापाव…!!!” – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
हा एक मुलगा…!
आई-वडिलांनी याचं छानसं नाव ठेवलं, त्यांना वाटलं या नावाप्रमाणेच मुलाचं भविष्य छानच होईल.
मुलाला नाव देवुन, वडील बेनाम झाले, देवाघरी गेले. मागे उरला हा मुलगा त्याची बहिण आणि यांची असहाय आई!
.. दोन्ही मुलांचा सांभाळ आईने केला, तीच बाप झाली!
निसर्गाने या मुलाला अतिशय देखणा चेहरा दिला होता. लहानपणापासूनच दिसायला तो देखणा आणि सर्वच बाबतीत हुशार.
खरंतर घरची गरिबी परंतु मुलगा जसा जसा मोठा होत गेला तसा तसा त्याने वेगवेगळ्या ठिकाणी काम करून आपल्या कुटुंबाला हातभार लावला.
प्रत्येक आईला आपल्या मुलाचं कौतुक असतंच, परंतु या आईला जरा जास्तच कौतुक होतं…!
मुलगा मोठा झाला जवळपास सहा फूट उंच, व्यायामानं कमावलेले शरीर. गर्दीत उठून दिसायचा चारचौघांमध्ये…!
बारावीपर्यंतचे शिक्षण स्वकमाईवर केलं आणि पुन्हा बीएला ॲडमिशन घेतलं परंतु हलाखीच्या परिस्थितीमुळे ते पूर्ण करू शकला नाही.
कुटुंबाचा भार याने डोक्यावर घेतला. अनेक ठिकाणी तो नोकरी करू लागला. कधी हॉटेलमध्ये कधी पेट्रोल पंप तर आणखी कुठे…
आपल्या कष्टांनं मात्र त्यांनं घर बरंच सावरलं.
लग्नाचं वय झालं आणि एका घरंदाज घराण्यातल्या साजेशा मुलीबरोबर त्याचं लग्नही लागलं.
2018 या वर्षामध्ये अशाच कुठल्यातरी एका महिन्याच्या 9 तारखेला याचं लग्न लागलं.
याच महिन्याची 18 तारीख, लग्नानंतरचा नववा दिवस…!
या तारखेला रात्री, आपल्या नव्या नवरी बरोबर, हसत-खेळत जेवण करून, आपल्या भविष्याची स्वप्नं रंगवत रंगवत अंथरुणावर पाठ टेकली. आणि नेमकी याचवेळी लाईट गेली…
… गेलेली ही लाईट पुढे आयुष्यात अंधार पाडणार होती…!
लाईट गेली म्हणुन याने शेजारीच रॉकेलचा दिवा लावला. दिव्यातल्या मंद उजेडामध्ये दोघे भव्य स्वप्नं पाहता पाहता कधी झोपी गेले त्यांनाही कळलं नाही. दिवा विझवायचा राहून गेला…!
मध्यरात्री कुठून तरी मांजर आलं आणि त्या मांजराच्या पायाने हा दिवा कलंडला… दिव्यातलं सारं रॉकेल जमिनीवर सांडलं, रॉकेल ने पेट घेतला आणि भडका उडाला…
जमिनीवर गाढ झोपलेल्या या दोघांनाही याचा पत्ताच लागला नाही.
आग हळू हळू सरकत ते झोपले होते तिथपर्यंत पोचली…
तो अंगावर चादर घेऊन झोपला होता…
– – पहिल्यांदा या चादरीने पेट घेतला… काय होतंय हे कळायच्या आतच जळणारी चादर त्याच्या चेहर्यावर अडकली आणि जळत जळत तिथेच चिकटून बसली… काय झालंय हे त्याला कळेपर्यंत, त्या मुलाचा कपाळापासून ते मानेपर्यंतचा चेहरा जळून गेला.
तेव्हढ्यातुनही त्याचं लक्ष बाजुला झोपलेल्या पत्नीकडं गेलं, आग आता आ वासुन तिच्याकडं निघाली होती… तीचं मन भरलं नव्हतं!
यानं ते पाहिलं आणि कशाचाही विचार न करता, आपल्या हाताने पत्नीचा जीव घेणारी ती आग त्यानं हातानं विझवली…
आधीच कपाळ, नाक, डोळे, ओठ, गाल भाजुन मांस बाहेर पडलं होतं… यात तिला वाचवतांना आता दोन्ही हात जळले…!
– – “ती” ला याने वाचवलं… काहीच होऊ दिलं नाही… स्वतः मात्र भाजुन निघाला!
“ती”ने त्याला नामांकित हॉस्पिटल मध्ये एडमिट केलं आणि ट्रीटमेंट सुरू झाली.
जवळपास अडीच महिने ट्रीटमेंट सुरू होती…
या काळात त्याची नोकरी गेली ती गेलीच.
शिवाय घरात जे काही साठवलेले पैसे होते ते सर्व ट्रीटमेंटसाठी खर्च झाले.
“ती”नं मंगळसूत्रही विकलं…!
– – इतकं करुन त्याचा जीव वाचला, पण… चेहरा कायमचा विद्रूप झाला.
ज्या चेहऱ्याचा अभिमान होता तो चेहराच नाहीसा झाला.
कुणीतरी मुद्दाम घडवून आणल्यासारखं हे सारं घडलं होतं.
पुढचे पैसे नसल्यामुळे, अर्धवट ट्रीटमेंट करून तो घरी परत आला, परंतु घरात काहीही शिल्लक उरलेले नव्हतं; अगदी कॉट – गादी – चादर आणि भांडीकुंडी सुद्धा…!
ट्रीटमेंट साठी बायकोने घरातली प्रत्येक गोष्ट विकून पैसा उभा केला होता, केवळ नवर्याला वाचवण्यासाठी…!
… त्यानं ते पाहिलं, आणि तो हमसुन रडत तीच्या कुशीत शिरत म्हणाला… “या आगीनं सारंच जाळलं की गं आपलं…! “
आणि त्याच्या रक्ताळल्या गालावर हात ठेवत ती म्हणाली, “ छे हो… तुम्ही आहात की माझ्या सोबत…! कुठं काय जळलंय…? आणि बरं झालं त्या जुन्या चादरी जळुन गेल्या, नाहीतरी खुप जुन्या झाल्या होत्या… फेकायच्याच होत्या त्या…! “ ती हसत म्हणाली होती…
नुकतंच लग्न झालेल्या त्या चिमुरडीत कुठनं एव्हढा पोक्तपणा आला असेल? कि हा पोक्तपणा येण्यासाठीच ती आग लागली असेल? कळत नाही!
बुडाखाली लागलेली आग आयुष्यात जगणं तरी शिकवते किंवा मरणं तरी, हेच खरं!
हीच आग कधी थंडीत ऊब म्हणुन येते तर कधी धग म्हणुन!
.. सोसली तर ऊब, नाही तर धग!
… लागलेल्या आगीत शिट्टी वाजवत उब म्हणून शेकुन घ्यायचं कि धग म्हणून स्वतःला जाळून घ्यायचं ज्याने त्याने ठरवावं!
तर, अर्धवट ट्रीटमेंटनंतर याने पुन्हा नोकरीसाठी प्रयत्न केले, पण इतका विद्रूप चेहरा पाहून त्याला कोणीही नोकरी दिली नाही. चित्रपटात शोभेल अशा अभिनेत्याप्रमाणे याचा देखणा चेहरा! पुर्वी लोक याच चेह-याचं कौतुक करायचे, आता तेच लोक त्याला घाबरू लागले, त्याला पाहून तोंड फिरवू लागले…!
– – किती हा विरोधाभास!
माणूस जे खोटंखोटं दाखवतो तो मुखवटा… आणि आपण जे खरोखरी असतो तो चेहरा!
चेहरा आणि मुखवट्यात जाणुनबुजुन जे गल्लत करतात ते मुखडे!
हे, तेच मुखडे… जे उजेडात आपल्या सोबत असण्याचं नाटक करतात… आणि अंधार पडला की, कुठंतरी गुडुप होतात…!
… पण, हल्ली मुखवट्यालाच फेस व्हॕल्यु असते… पण अशा व्हॕल्युला फेस नसतो!
असो!
ट्रिटमेंट अजून बऱ्यापैकी बाकी होती, परंतु पुढचे पैसे नसल्यामुळे त्याने ती अर्ध्यावरच सोडली होती…
आता नोकरी नाही, घर कसं चालवायचं?
याच काळात नेमकं माझं नाव कुणी तरी याला सांगितलं आणि याने मला साधारण दीड वर्षांपूर्वी फोन केला होता. वर सांगितलेली सर्व परिस्थिती मला त्याने फोनवरून सांगितली. मलाही खूप वाईट वाटलं.
लग्नाच्या बरोबर नवव्या दिवशी हा प्रसंग घडला होता त्याच्या आयुष्यात!
काय वाटलं असेल त्याच्या आईला?
काय वाटलं असेल त्या मुलाला?
काय वाटलं असेल त्या मुलीच्या आईवडिलांना?
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय वाटलं असेल त्या नव्या नवरीला?
… याची नुसती कल्पनाच केलेली बरी…!
ऐकुनच माझ्या अंगावर काटा आला…
आनंदाची बातमी ऐकली की अंगावर रोमांच उभे राहतात… दुःखद काही ऐकलं की अंगावर काटे येतात!
रोमांच आणि काटे…!
दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजु… एक आनंदी, एक दुःखी… या दोघांच्या मधोमध उभा असतो तो शहारा…!
याला ना सुख ना दुःखं!!!
फोनवर तो म्हणाला होता, ‘डॉक्टर साहेब माझ्या पुढच्या ट्रीटमेंटसाठी तुमच्याकडून काही मदत होईल का? ‘
मी नकळतपणे बोलुन गेलो, ‘मित्रा, माझी संस्था फक्त भिक मागणा-या लोकांसाठीच काम करते रे, मी फक्त भिक्षेक-यांनाच मदत करतो…! ‘
.. तो सहज म्हणाला, ‘हरकत नाही सर, मी उद्यापासून भीक मागायला सुरुवात करतो म्हणजे तुम्ही मला भिकारी म्हणून तुमच्याकडे रजिस्टर करा, तशी नोंद घ्या आणि मग भिकारी म्हणुनच मला मदत करा, मला चालेल सर…! ’
त्याच्या या वाक्याने मी आतून हादरुन गेलो… मला हा टोमणा होता की थप्पड?
.. हातानं मारतात ती थप्पड… शब्दांनी मारतात तो टोमणा! थप्पडेपेक्षा टोमण्याचा घाव मोठा!
हा टोमणा मी सकारात्मक घेतला.
आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच नये हे महत्त्वाचं नाही का? उद्याचा एक भिक्षेकरी मला आजच वाचवता आला तर? भिक्षेकरी झाल्यावर त्याला मदत करण्यापेक्षा, भिकारी होण्यापासुन त्याला वाचवणं हे जास्त महत्वाचं!
मी त्याला मदत करायचं ठरवलं, आणि एके दिवशी मी त्याला भेटायला बोलावलं.
तो आला.
डोक्यापासून ते मानेपर्यंत कसल्याशा कपड्याने त्याने स्वतःला गुंडाळून घेतलं होतं.
दिसण्यापुरती एक फट डोळ्यांच्या बाजूने मात्र उघडी होती!
मी त्याला चेहऱ्यावरचं संपूर्ण कापड काढायला सांगितलं.
तो म्हणाला, ‘सर नको, तुम्हाला बघवलं जाणार नाही. ‘
मी म्हटलं, ‘अरे वेड्या मेडिकलला गेल्यापासून ते आत्तापर्यंत अशाच केसेस आम्ही डॉक्टर्स बघतो, आम्हाला सवय असते, तू चेहऱ्यावरचं कापड काढून टाक, नेमकं किती भाजलंय हे पहायचंय मला…! ‘
तो आतल्या आत हसत असावा, असा मला भास झाला.
त्याने दोन्ही हात डोक्याच्या मागे नेऊन, कपड्या ची गाठ सोडवली आणि कपड्याचा एक एक पदर तो उघडत राहिला. त्याच्याच चेह-याभोवती त्याचेच हात बराचवेळ हात घुमत राहिले… अंगात आलेल्या एखाद्या व्यक्तीसारखे!
कपड्याचा शेवटचा पदर त्याने उघडला आणि मी उभ्या उभ्या हादरलो…
हॉरर चित्रपटात जितका विद्रूप चेहरा दाखवता येईल तितका दाखवतात; परंतु हा चेहरा त्याहीपेक्षा भयंकर होता, जो प्रत्यक्ष समोर उभा राहून पाहणं कोणालाही शक्य नव्हतं.
नाकाच्या जागी नाक नाही, ओठांच्या जागी ओठ नाहीत, दात पुर्ण बाहेर, डोळ्यांना पापण्या नाहीत, डोळ्यांच्या वर भुवया नाहीत… त्याला चेहरा नव्हताच… होता केवळ भेसुर आभास, जीवंत असल्याचा!
याच्यापेक्षा कवटी सुंदर असते, इतका हा भयानक!
मी खाली मान घालून त्याला म्हटलं, ‘लाव पुन्हा कापड… ‘
न बोलता यांत्रिकपणे त्याने ते कापड पुन्हा चेहर्याभोवती गुंडाळायला सुरुवात केली…
हातांच्या अंगात आलं होतं, ते पुन्हा चेह-याभोवती फिरत होते.. बेभान आणि बेगुमान!
शेवटी त्याने डोक्याच्या मागच्या बाजुला कपड्याची गाठ मारली, त्या दोन टोकांची!
दोन टोकंही कधीकधी एकत्र येतात ती अशी…!
तो म्हणाला, ‘सर, पुढची ट्रीटमेंट बाकी आहे, पण पैसे नाहीत, अंगावर घातलेल्या कपड्याशिवाय माझ्याकडं आता काहीही शिल्लक नाही… ‘
‘जगण्यासाठी भीक मागू… की भीक मागण्यासाठी जगू तेच कळत नाही… तुम्ही सल्ला द्या! ’
माझे डोळे पाणावले, ‘मी म्हटलं, या घडीला तू भिकार आहेस कि सावकार मला माहित नाही, पण कुणीही असलास तरी माणूस आहेस हे निश्चित! आणि मी तुला मदत करणार हे नक्की! ’
कपड्याच्या उघड्या फटीतून मला फक्त त्याचे डोळे दिसत होते, या डोळ्यात आता मला चमक दिसली…
एका डोळ्यात होता सुर्य आणि एका डोळ्यांत चंद्र!
– – उजेड आणि अंधार, दोन्हीची साक्ष देणारा!
फरक इतकाच… सुर्य होता उगवणारा आणि चंद्र होता मावळणारा!
यांच्याच साक्षीने, त्याची ट्रिटमेंट ज्या हॉस्पिटलमध्ये सुरू होती, तिथल्या डॉक्टरांशी संपर्क साधला आणि पुढची ट्रीटमेंट सुरू ठेवण्याबाबत विनंती केली.
हा सिलसिला साधारण पुढे सहा महिने ते आठ महिने चालला. वेगवेगळ्या ट्रीटमेंट आणि वेगवेगळ्या साधन आणि उपकरणांनी त्याचा चेहरा आधीपेक्षा ब-यापैकी नाॕर्मल झालाय, तरीही म्हणावा तेव्हढा पुर्वीसारखा नाहीच!
निसर्गापुढे विज्ञान अजुन बुटकंच आहे आणि कायम राहील!
– क्रमशः भाग पहिला
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : abhisoham17@gmail.com,
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





