प्रा.डॉ.सतीश शिरसाठ
मनमंजुषेतून
☆ एका प्रश्नाची कहाणी… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆
एक भारतीय म्हणून कुणालाही आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटणं स्वाभाविक आहे.
मलाही तो होता आणि आहे.
‘एकत्र कुटुंब’ हे या संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे ;ज्यामुळे ही संस्कृती जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती समजली जाते… या अभिमानाविषयी मला पुनर्विचार एका घटनेने करायला लागला.
त्या घटनेनं माझ्या डोळ्यापुढची झापड दूर झाली.
विद्यापीठात, मी आमच्या डिपार्टमेंटच्या ‘एम. ए. इन लाईफलाॅन्ग लर्निंगच्या ‘कोर्सच्या वर्गाला शिकवत होतो.
कोविडचा काळ असल्याने, आम्ही ऑनलाईन स्वरूपात शिकवणं अपेक्षित होतं.
.. माझा विषय होता:’ज्येष्ठांचे वार्धक्यशास्त्र (Gerentology)’.
अनेक पुस्तकं, संदर्भ साहित्य, युट्यूब, सोशल मिडीयाची अनेक साधनं यातून मी ‘ज्येष्ठ नागरिक:संकल्पना’ या विषयावर अभ्यास करून टिपणं काढली होती.
मी विषयाला सुरुवात करताच, एक विद्यार्थिनी म्हणाली,
“सर मी मध्येच बोलू का? “
“बोला. “
“सर, ‘ज्येष्ठ नागरिक’हा शब्द फक्त पुस्तकात आणि सरकारी कागदपत्रातच दिसतो.
खेड्यात, इव्हन शहरातही अनेक ठिकाणी अशा वृद्धांना ‘म्हाताऱ्या’ किंवा ‘थेरडी’म्हणून हिणवले जाते.
याची कारणंही पुस्तकात नाही तर, त्यांच्या जीण्यात आढळून येतात”.
“काय आहेत ही कारणं? “
“बरीच आहेत सर. एकतर वय झाल्यावर, आपली शेती किंवा इस्टेट मुलामुलींच्या नावावर करून दिल्यावर, हे कफल्लक बनतात. शिक्षण जेमतेम असल्यानं, नोकरी नाही. म्हणून पेंशन आणि इतर सामाजिक सुरक्षिततेच्या बाबी दूरच.
‘घरकाम’हे बायकांचं काम असलेल्या समाजात, वय झाल्यावर ह्या महिला
शारीरिकदृष्या कमकुवत बनतात.
गरज संपली की, त्यांचे हाल कुत्रंही खात नाही.
आईवडलाविषयीचं मुलांचं प्रेम पातळ होतं.
वि. वा. शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’नाटकातल्या वाक्याप्रमाणे, ‘माणूस वाईट नसतो.
म्हातारपण वाईट असतं’.
वृद्धांची भारतातील संख्या सुमारे पंधरा कोटी आहे. तर महाराष्ट्रात ती जवळपास दीड कोटीच्या घरात आहे. यात महिला अठ्ठावण्ण टक्के आहेत.
ही झाली आकडेवारी. पण वय झाल्यावर, अगदी श्रीमंत माणसंही विकलांग होऊन, आपल्या मुलांवर अवलंबून असतात. हे अवलंबित्व त्यांना परावलंबी बनवतं आणि एकत्र कुटुंब असूनही, तो केवळ बुरखा रहातो… हे कटू, पण सत्य आहे. याला अपवाद पाश्चिमात्य देश आणि अगदी आपला प्रिय संस्कृतीरक्षक देशही नाही….. प्रश्न उरतो त्या वृद्धांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आणिआत्मसन्मानाचा.
मान्य आहे, वृध्दाश्रम हा त्यावरचा एकमेव उपाय नाही. पण एक ‘इष्टापत्ती’ किंवा ‘नाईलाज’ म्हणून का होईना, त्या पर्यायाकडं पहावं लागतं.
काय आहे ‘वृद्धाश्रम’ ही संकल्पना?
समाजातील वयस्कर व्यक्तिंची रहाण्याची, खाण्यापिण्याची, त्यांना सुरक्षा देणारी आणि सामाजिक जीवन देणारी ती संस्था असते’. गरजू आणि निराधार वृद्धांसाठी जसे निशुल्क वृद्धाश्रम आहेत, तसेच आधुनिक सोईसुविधा आणि तत्सम पॅकेज देणारे सशुल्क वृद्धाश्रमही आहेत. या दोन्ही प्रकारात वृद्धांची तपासणी करून त्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
खाजगी संस्था, ट्रस्ट तसेच काही सेवाभावी कार्य करणाऱ्या संघटना आणि व्यक्ति जसे काही वृद्धाश्रम चालवतात तसेच केंद्र आणि राज्य सरकारतर्फेही वृद्धाश्रमांना मदत केली जाते.
मागे वाटसॅपवर एक कथा आली होती. आपल्यापैकी अनेकांनी ती वाचलीही असेल.
एक सेवानिवृत्त शिक्षिका नोकरी संपल्यानंतर आपल्या एकुलत्या एक मुलाकडं रहात होती. तिला लिहिण्याचा छंद होता. घरातल्या एका खोलीत ती आपला छंद जोपासत होती. मात्र, सुनेला ते पटत नव्हतं. ती खोली तिच्या मुलाच्या अभ्यासाला आवश्यक आहे म्हणून सुरवातीला सासूला तिनं खोलीपासून बाजूला केलं. नंतर ‘लिखाण हा काय भिकारडा छंद’ म्हणून तिची निर्भत्सना करायला सुरुवात केली… होणारी घुसमट सहन करून ती वृद्धा शेवटी कंटाळून गेली.
कुटुंबातील इतरांनाही ती अॅसेट वाटण्यापेक्षा अडगळ वाटू लागली.
तिने ऑलरेडी आपली सगळी इस्टेट केव्हाच मुलाच्या नावाने करून दिली होती. एक दिवस तिचा मुलगा आईला कारने घेऊन निघाला. सोबत त्याची बायकोही होतीच.
“कुठं जातोय आपण बाळा? ”
“नवीन घरात” एवढंच मुलानं उत्तर दिलं.
थोड्याच वेळात ती कार एका वृद्धाश्रमासमोर आली आणि आईची बॅग हातात घेऊन तो निघाला.
वृद्धाश्रमातील व्यवस्थापकाला नमस्कार करून तो म्हणाला, “ही माझी आई. आजपासून तुमच्याच आश्रमात रहाणार आहे”.
क्षणभर आईच्या पायाखालची वाळू सरकली. मात्र तो एकच दिवस. दुसर्याच दिवसांपासून तिनं आपलं लिखाण त्या निसर्गरम्य परिसरात सुरू केलं. एकामागून एक नियतकालिकं आणि दिवाळी अंकांमधून तिचे लेख आणि कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. अनेक प्रकाशकांची तिच्याकडं काही तरी लिहून द्या म्हणून रीघ लागू लागली. पैसा आणि प्रसिद्धी तिच्या पायावर लोळण घेऊ लागली. एका मोठ्या कंपनीत उच्च पदस्थ असलेला तिचा लाडका मुलगा प्रसिद्धीची हाव आणि नशेत रसातळाला जाऊ लागला. कर्जाचा डोंगर त्याच्या
डोक्यावर निर्माण होऊ लागला. एकही दिवस असा गेला नाही ज्या दिवशी बॅंकेचा तगादा घेऊन बॅंकेतून लोक आले नाही. त्यांना चुकवायला त्याला नाकी नऊ येऊ लागले.
एक दिवस बॅंकेचे काही अधिकारी त्याच्या घरी पुष्पगुच्छ घेऊन आले. ते पाहून तो चक्रावून गेला.
“धन्यवाद सर, सगळे लोन व्याजासह परत केल्याबद्दल “.
“म्हणजे? “
“अहो, एक मॅडम नियमित आमच्या बॅंकेत येऊन तुमच्या अकौंटवर काही रक्कम जमा करत होत्या. हे करताना त्यांनी एक विनंती केली होती की, त्यांचं नाव कुठंच डिसक्लोज करायचं नाही म्हणून. ”
थोडा वेळ तो पहातच राहिला. आणि नंतर आईची माया आठवून पश्चातापदग्ध झाला. दुसर्याच दिवशी आपल्या बायकोला घेऊन तो वृद्धाश्रमात गेला. वृद्धाश्रमाच्या ऑफिसात त्याच्या आईला बोलावलं.
आईला पहाताच तिच्या पायावर लोळण घेत तो म्हणाला,
“आई, क्षमा कर आम्हाला. झालं गेलं ते विसरून जा. आपल्या घरी चल. सगळेजण तुझी वाट पहात आहेत. तुझ्या लाडक्या बाळाला क्षमा कर”.
त्याला खांद्याला धरून उठवत ती म्हणाली,
“बाळा, तू म्हणतोस ते आपलं घर नाही. ते तुमचं घर आहे. आणि मी तुमच्या घरात नाही येणार कायमची रहायला. अरे ते जरी घर होतं तरी ती निव्वळ भिंतींची इमारत होती. इथली माणसं माझ्यावर जीव ओवाळून टाकतात. मला माझा छंद इथं मनापासून जोपासता येतो”.
“तो आपल्या घरीही करू शकशील आई. “
“नाही” ठामपणानं बोलून ती पुढं म्हणाली, “मी मधूनमधून तुमच्या घरी नक्कीच येईन, तुला फोन करून. तुम्हीही आमच्या या आनंदवनात येत जा एन्जॉय करायला. पण ‘वीथ प्रायर परमिशन’; कारण इथलेही काही नियम असतात”.
खाली मान घालून तो हात हलवत परतला. अशी ही साठा नाही तर एका प्रश्नाची एका उत्तरानं सोडलेली सुफल कहाणी.
© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ
ईमेल- sks.satish@gmail.com
मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



